सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – १ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

आज पहिल्या भागात : लष्करी सेवेतील दुर्गा (सशस्त्र दलातील सेवेची प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायक)

१) शिवांगी स्वरूप

बिहार मधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात शिक्षक असणारे भूषण सिंह व गृहिणी असणारी प्रियांका सिंह यांच्या घरी  हिचा जन्म झाला.सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मेकॅनिकल मधील बी टेक डिग्री प्राप्त केली. ती शॉर्ट सर्विस कमिशन एसएससी पायलट प्रवेश योजनेतून भारतीय नौसेनेत दाखल झाली. जून 18 मध्ये सहा महिन्यांचे दोन कोर्सेस केले एक भारतीय नौसेना अकॅडमी मधून नेव्हल ओरिएंटेशन कोर्स व दुसरा वायुसेना अकॅडमी मधून एम के आय आय विमानावर प्रशिक्षण घेतले. नंतर डिसेंबर 19 मध्ये भारतीय नौसेना एअर स्कॉड्रन 550 येथे डॉरनियर विमान उडविणे शिकली आणि पहिली महिला पायलट झाली. भारतीय तटरेखा सुरक्षेचे काम करते. तिने नौदलाच्या स्थापनादिनी डोरनियर DO -228 S विमान उडवून किर्तीत भर टाकली आहे.

२) शिवांगी सिंह

वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असताना NCC एअर  विंग  ची ती एक भाग झाली होती. 2017 मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली. एकदा लहान असताना नवी दिल्लीतील वायुसेना संग्रहालय पहायला गेली होती.  तिथली विमाने पाहून तिने पायलट होण्याचं स्वप्न पहायला सुरुवात केली. पहिल्यांदा कॉकपीटमध्ये बसली तेव्हा खूप नर्व्हस झाली होती. जेव्हा तिने मिग 21 लढाऊ विमान चालवले तेव्हा तो क्षण खूप रोमांचक होता असे ती म्हणते. लढाऊ विमानासाठी नियंत्रण मिळविण्याचे कौशल्य लागते. राफेल लढाऊ विमान उडविणाऱ्या त्या पहिल्या महिला वैमानिक आहेत. भारत अंतरिक्षात एक मानव मिशन योजना बनवत आहे, याचा एक भाग होणे हे आपले पुढचे स्वप्न आहे असे ती म्हणते.

३) अंजली सिंग

बिहार च्या असून एरोनॉटिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत.

विंग कमांडर अंजली सिंग परदेशातील कोणत्याही भारतीय मिशनमध्ये तैनात होणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सशस्त्र लष्करी राजदूत बनल्या आहेत. रशियातील भारतीय दूतावासात उपहवाई ॲट्याची म्हणून रुजू झाल्या. त्यांनी मिग 29 लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले आहे. सशस्त्र लष्करी दल अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्या सतरा वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या ए ई (एल) अधिकारी आहेत.

४) भावना कस्तुरी

लेफ्टनंट भावना कस्तुरीने २०१९ साली ७० व्या रिपब्लिक डे च्या परेड मध्ये १४४ जवानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी ती पहिली महिला ठरली. सहा महिन्यांच्या सरावानंतर हे यश मिळाले. हिने हैदराबादच्या ओस्मानिया युनिव्हर्सिटीतून मायक्रोबायोलॉजी या विषयातून डिग्री मिळवली आहे. आर्मी सर्विस काॅर्प मध्ये कार्यरत आहे. शाळेत एनसीसी मध्ये होती तेव्हापासूनच तिला परेडची आवड निर्माण झाली होती.

५) ज्योती शर्मा

भारतात, न्यायाधीश एडवोकेट जनरल अधिकारी पद सेनेतील लेफ्टनंट ला दिले जाते. तो सेनेचा न्यायिक प्रमुख असतो. यापूर्वी लग्न झालेल्या महिलांना कठीण ट्रेनिंग पूर्ण करणे शक्य नाही या कारणावरून हे पद दिले जात नसे. यावर कोर्टात केसही सुरू होती. आणि पहिल्यांदाच लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा या महिलेला ही संधी दिली आहे. त्या भारतीय सेनेच्या पहिल्या महिला न्यायाधीश, एडवोकेट जनरल म्हणून नियुक्त केल्या गेल्या. त्या सैन्याच्या कायदा विशेषज्ञ म्हणून आफ्रिकी देश व इतर परदेशांशी संबंधित गोष्टी पाहतात.

६) शालिझा धामी

पंजाब मधील लुधियानात जन्म झाला. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विषयात इंजिनियर पदवी संपादन केली. 2003 मध्ये HAL HPT— 32 दीपक या विमानातून एकल उड्डाण केले. 20 डिसेंबर 2003 ला हवाई दलात शॉर्ट सर्विस कमिशनर फ्लाईट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. 2005 ला फ्लाईट लेफ्टनंट म्हणून, 2009 ला स्क्वाड्रन लीडर म्हणून पदोन्नती मिळाली. 2016 ला विंग कमांडर झाल्या तर 2019 ला फ्लाईट कमांडर झाल्या. चेतक व चित्ता हेलिकॉप्टर साठी IAF च्या पहिल्या महिला फ्लाईट  इन्स्ट्रक्टर बनल्या. 2018 ला भारतीय हवाई दलात कायमस्वरूपी कमिशन मिळालेल्या पहिल्या महिला अधिकारी, 2021 पासून ग्रुप कॅप्टन म्हणून निवड झाली. अशा प्रकारे भारतीय सशस्त्र दलात लढाऊ शाखेत निवड ग्रेड रँक मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या. 2023 मध्ये फ्रंट लाईन आयएएफ लढाऊ युनिटचे नेतृत्व करण्यासाठी निवडलेल्या पहिल्या महिला आहेत.

७) यशस्वी सोळंकी

शाळेत असल्यापासूनच हिला खेळाची आवड होती विशेष करून बॅडमिंटन हॉलीबॉल! 2012 साली भारतीय नौदलात सामील झाल्या.नौदलात फ्लाईट लेफ्टनंट  आहेत. एक वर्षाचे ट्रेनिंग घेऊन त्या एडीसी झाल्या. आता या राष्ट्रपतींबरोबर असतात. त्यांच्या सर्व औपचारिक कार्यक्रमात मदत करतात. राष्ट्रपती व लष्कर यामध्ये संवाद साधतात. नेतृत्व कौशल्य, सर्विस रेकॉर्ड, ऑपरेशनल परफॉर्मन्स यावर ही नियुक्ती होते. हा सर्वात सर्वोच्च सन्मान मानला जातो. आत्ता जरी महिला राष्ट्रपती असल्या तरी एका महिलेची या ठिकाणी नेमणूक प्रथमच झाली आहे.

८) शिवा चौहान

सामान्य घरातून आलेल्या खडतर पण प्रतिष्ठेच्या लष्करी सेवेत जिद्दीने दाखल झालेल्या जगातील सर्वात उंच सियाचीन युद्धभूमीवर तैनात भारतीय लष्करातील कॅप्टन शिवा चौहान या पहिल्या महिला आहेत.त्यांना सियाचिन  बॅटल स्कूल मधून कठोर प्रशिक्षण देण्यात आले.त्या राजस्थानच्या असून उदयपूर मधील NJR इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून सिव्हिल इंजिनिअर ही पदवी प्राप्त केली आहे. संवेदनशील पूर्व लडाख मध्ये आघाडीवरील स्वतंत्र युनिटची धुरा खांद्यावर घेणाऱ्या गीता राणा, भूतानमध्ये रस्ते बांधणी प्रकल्पावर कार्यरत होणाऱ्या सीमा रस्ता संघटनेतील कॅप्टन सुरभी जाखमोला या सर्वांनी आघाडीवर आव्हानात्मक जबाबदारी सांभाळली आहे. ही जबाबदारी स्त्रियांना प्रथमच मिळाली आहे.

९) सोफीया कुरेशी

यांचा जन्म  1971 मध्ये उत्तर प्रदेश  लखनऊ येथे झाला. वडील सिव्हिल इंजिनिअर, आई गणित प्राध्यापक अशा सुशिक्षित घरात त्यांनी बायोटेक्नॉलॉजी मध्ये पदवी मिळवली. लष्करी शिक्षण महू, दिल्ली,इंग्लंड अशा विविध ठिकाणी झाले. 1994 मध्ये आर्मी सिग्नल काॅर्प्स मध्ये नियुक्ती झाली. बंडखोरी विरोधात कारवायांमध्ये काम केले. 2001 मध्ये लष्कराचे पहिले मोबाईल डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2008 मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून सेना मुख्यालयातील सिग्नल इंटेलिजन्स विंग मध्ये आधुनिकीकरणाचे नेतृत्व केले. 2016 मध्ये मोनूस्को डी आर सी येथे 500 पेक्षा जास्त भारतीय सैन्याचे नेतृत्व केले. पुरुष जवान असलेल्या शांती सेनेचे नेतृत्व करणारी पहिली महिला ठरली. त्यांच्या युनिटने अस्थिर उत्तर किवू मध्ये शांतता राखली, निःशस्त्रीकरण  केले, मानवतावादी मदत केली. 2017 ला सायबर डिफेन्स कमांडचा ब्रिगेडियर व उपमहासंचालक म्हणून नियुक्त झाल्यावर भारतीय लष्करी सायबर सिद्धांताची व्याख्या करण्यास, प्रशिक्षण श्रेणी विकसित करण्यास, धोका शोधण्याच्या उपक्रमास मदत केली. 2022 ला मेजर जनरल झाल्या. इलेक्ट्रॉनिक्स युद्ध व सायबर ऑपरेशनच्या एकत्रिकरणावर देखरेख करून स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन डिव्हिजनचे नेतृत्व केले. 2025 ला पश्चिम आघाडीवर सायबर इंटिग्रेटेड रॅपिड डिप्लॉयमेंट युनिटचे नेतृत्व केले. धोरणात्मक प्रणालींवरील सायबर हल्ले परतवून लावले व लष्करी संप्रेषण सुरक्षित केले.

– भाग पहिला

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted