सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
आजच्या चौथ्या भागात मळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेने जाणाऱ्या दुर्गा, नव्या पिढीच्या वाटसरु ठरतील.
१) स्नेहा पार्थिवराजा
वेल्लोर येथील ३५ वर्षीय वकील स्नेहा पार्थिवराजा ‘धर्म नाही, जात नाही’ असे अधिकृत प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
स्नेहा ही तिरुपत्तूर येथील एक वकील, कार्यकर्त्या व एक प्रेरणादायी व्यक्ती आहे, जिच्या शब्दांनी श्रोते मंत्रमुग्ध होतात. वर्ण व्यवस्थेच्या अविवेकीपणाविरुद्ध तिचे प्रभावी युक्तिवाद, सामाजिक न्यायाप्रती तिची अढळ वचनबद्धता दिसते. ती एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते, “आपल्या धार्मिक ओळखी किंवा जातीने आपण का स्वतःला परिभाषित केले पाहिजे? आपण फक्त अभिमानी भारतीय असू शकत नाही का?” सरकार कास्ट सर्टिफिकेट देऊ शकतं, पण ‘नो कास्ट’ सर्टिफिकेट नाही, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. अखेर फेब्रुवारी २०१९ रोजी बहुप्रतिक्षित ‘नो कास्ट नो रिलिजन’ प्रमाणपत्र मिळालं. त्यासाठी स्नेहाला ९ वर्षांची न्यायालयीन लढाई लढावी लागली.
२) अनुप्रिया लाक्रा
आकाशाला स्पर्श करण्याच्या तिच्या स्वप्नामुळे ओडिशाच्या माओवादग्रस्त मलकानगिरी जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेला मागास प्रदेशातील पहिली महिला वैमानिक बनण्याची संधी मिळाली आहे.
तेवीस वर्षीय अनुप्रिया लाक्रा हिचे पायलट होण्याचे स्वप्न सात वर्षांनी पूर्ण झाले. तिने २०१२ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून एका विमान अकादमीत प्रवेश घेतला. आणि
आदिवासी बहुल जिल्ह्यातील ही महिला एका खाजगी विमान कंपनीत सह-पायलट म्हणून रुजू होण्यास सज्ज झाली .
३) सुरेखा यादव
सुरेखाचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे सोनाबाई आणि रामचंद्र भोसले यांच्या पोटी झाला. तिचे वडील स्वर्गीय रामचंद्र भोसले शेतकरी होते. तिचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तिने सातारा जिल्ह्यातील कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. भारतीय रेल्वेत नोकरीची संधी मिळाली.सुरेखा मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक ठरल्या. इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम केल्यानंतर यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली.
मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाईनवर तसेच हार्बर लाईनवर त्या लोकल चालवतात. त्यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली व त्यानंतर ८ मार्च २०११ मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजला जातो. त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत. १३ मार्च २०२३ रोजी, सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणारी ती पहिली महिला होती.
मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी, ३६+ वर्षांच्या दीर्घ सेवा कारकिर्दीनंतर, त्या वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच आपली प्रार्थना!!
४) शीला डावरे
या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. शीला यांनी १२वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुणे शहरात ऑटोरिक्षा चालवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भाड्याने ऑटोरिक्षा घेऊन चालवत असे. पण महिला असल्यामुळे त्यांना लोक भाड्याने ऑटोरिक्षा देत नसत. मग पैसे जमवून त्यांनी स्वतःची ऑटोरिक्षा खरेदी केली. १९८८ मध्ये त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. रिक्षाचालकांमध्ये पुरुषांची मक्तेदारी, सामाजिक दृष्टिकोन यामुळे त्यांना सर्वच पातळ्यांवर संघर्ष करावा लागला. योग्य प्रशिक्षण, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या या कृतीची नोंद त्यावेळी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली.
४) योगिता सूर्यवंशी
ट्रक चालवणे म्हणजे अत्यंत कष्टाचे काम. घरापासून सतत दूर राहायचे असल्यामुळे ही फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. योगिता ही पहिली महिला, दहा चाकांचा 73 टनाचा ट्रक चालवणारी. एका दुर्घटनेत पतीचे निधन झाले. त्यांची ट्रान्सपोर्ट कंपनी होती. चार ट्रक ड्रायव्हर होते. त्यातील एक त्या अपघाताच्या वेळी ट्रक सोडून पळून गेला. स्त्री ट्रान्सपोर्ट कंपनी चालवणार म्हणून नवीन ट्रक ड्रायव्हर मिळेना व त्याचा खर्चही परवडणार नाही असे वाटून तिने स्वतः चौथा ड्रायव्हर व्हायचे ठरविले . हे काम तेवढे सोपे नव्हते. मुलांची संसाराची जबाबदारी सांभाळून, रात्रभर ट्रक चालवायचा, माल भरायचा, अशी अवजड कामेही करायची. त्यातच महिला असल्यामुळे वाटेत झोपण्याचा, स्नानाचा, सुरक्षेचा प्रश्न होता. पण ती डगमगली नाही. सर्व अडचणींवर मात करुन उभी राहिली.
६) मदुरै सुब्बुलक्ष्मी
मदुरै या १६ सप्टेंबर १९१६ ला जन्म झालेल्या तामिळनाडू मधील,कर्नाटक परंपरेतील शास्त्रीय आणि अर्ध शास्त्रीय गीत गायिका. तसेच त्या संगीतकारही होत्या. त्या काळात गायिका असणे ही फार चांगले मानले जात नव्हते. संगीतकार हे क्षेत्र तर स्त्रियांसाठी नव्हतेच. पहिली भारतीय महिला संगीतकार म्हणून त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरीक सन्मानाने सन्मानित केले आहे. १९७४ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला संगीतकार! १९६६ च्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आपली कला सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला होत्या व पहिल्या भारतीय शास्त्रीय संगीतकार होत्या.
७) कल्पना चावला
जन्म १७ मार्च १९६२ रोजी, हरियाणा येथील कर्नाल येथे टायर उत्पादन कारखान्याचे मालक, बनारसी लाल चावला आणि संजोगता खरबंदा यांच्या पोटी झाला. जे १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी निर्वासित म्हणून पूर्व पंजाबमध्ये गेले होते. लहानपणी, तिने एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये रस दाखवला, परंतु तिच्या वडिलांनी त्यासाठी नकार दिला, कारण फक्त पुरुषच [एरोस्पेस अभियांत्रिकी] हे करू शकतात आणि त्याऐवजी तिला डॉक्टर किंवा शिक्षिका बनण्याचे सुचवले. तिने कर्नालमधील टागोर बाल निकेतन वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि १९७६ मध्ये ती वर्गात प्रथम आली.
चावला यांनी करनालमधील दयाल सिंग कॉलेजमधून मूलभूत अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी चंदीगडमधील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातील वैमानिक अभियांत्रिकी शाळेत प्रवेश घेतला , जिथे त्यांनी सैद्धांतिक वायुगतिकीच्या तत्त्वांचा अभ्यास केला. त्या या कार्यक्रमातील चार महिलांपैकी एक होत्या आणि महाविद्यालयात एरोस्पेस अभियांत्रिकी घेणाऱ्या पहिल्या महिला विद्यार्थिनी होत्या. काही प्राध्यापकांनी त्यांना एरोस्पेस अभियांत्रिकी शिकण्यापासून परावृत्त केले, कारण ते महिलांसाठी योग्य नाही आणि त्याऐवजी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी सुचवली. पण त्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत.
भारतात पुढील विशेष एरोस्पेस अभियांत्रिकी अभ्यासक्रम घेऊ न शकल्यामुळे, १९८२ मध्ये अमेरिकेत गेल्या. तिथे MSc व PhD पदवी मिळवली.१९९० ला तिला अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.१९ नोव्हेंबर १९९७ रोजी चावलाची पहिली अंतराळ मोहीम सुरू झाली, ती सहा अंतराळवीरांच्या क्रूचा भाग म्हणून, ज्यांनी स्पेस शटल कोलंबिया फ्लाइट STS-87 मधून उड्डाण केले. तिने टेकऑफ दरम्यान मिशन स्पेशालिस्ट आणि बॅकअप फ्लाइट इंजिनिअर म्हणून काम केले. जेव्हा STS-87 लाँच केले गेले तेव्हा चावला अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला बनली.
८) कार्नेलिया सोराबजी
१५ नोव्हेंबर १८६६ ला नाशिक मध्ये तिचा जन्म झाला. १८९२ ला ‘नागरिक विधी’ या विषयाचा परदेशात अभ्यास करून १८९४ ला ती भारतात परत आली. पण त्या काळात महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून तिने महिलांसाठी स्वतंत्र सल्ला केंद्र स्थापन केले. विशेषतः ज्यांच्याकडे पडद्यात राहणे बंधनकारक होते अशा स्त्रियांना ती त्यांचे अधिकार सांगत असे. पण त्यांना न्याय देऊ शकत नव्हती. तिने महिलांना या क्षेत्रात सामावून घेण्यासाठी लढा आरंभला. अखेर तिची १९०७ नंतर बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम या ठिकाणी महिला वकील म्हणून नियुक्ती केली. तिच्या या लढ्यामुळे महिला या व्यवसायात उतरू शकल्या. १९२९ मध्ये ती हायकोर्टाची वरिष्ठ वकील या पदावरून सेवानिवृत्त झाली. ती पहिली भारताची महिला वकील ठरली.
९) वनिता बोराडे
२५ मे १९७५ रोजी बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबात वनिताचा जन्म झाला.त्यांच्या शेतात तिने वयाच्या बाराव्या वर्षी पहिला साप पकडला. कोणता साप विषारी असतो, कोणता बिनविषारी असतो,विषारी साप चावला तर काय करायचे, या सर्वांची उत्तरे तिच्याकडे आहेत. तिला सर्पमित्र म्हणतात. सापांच्या प्रजाती वाचविण्यासाठी, वाढविण्यासाठी ती काम करते. तसेच वने व वन्यजीव यांचे संरक्षण, संवर्धन व संशोधनाचे कार्य करते. तिने आजपर्यंत वनविभागाच्या सहाय्याने 51 हजार पेक्षा जास्त साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. त्यासाठी सापांचे कधीही दात तोडले नाहीत. त्यांना यासाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावे सरकारने टपाल तिकीटही काढले आहे. त्या देशातील पहिल्या सर्प रक्षक महिला आहेत. सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन ही पर्यावरण संस्था त्यांनी स्थापन केली आहे.
– भाग ४
☆
संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





