श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “प्रभाकरन विरुद्ध प्रभाकर !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
जयो वा वधो संग्रामे….
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा अंत कसा आणि कधी होईल, हे नियतीने ठरवून ठेवलेलं असतं आणि मृत्यू नावाचा हा सोहळा त्यानुसारच पार पडत असतो!
युद्धात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वीराला हे ठाऊक असतं!
१९८७…भारताला शेजारच्या श्रीलंकेत राजकीयदृष्ट्या लक्ष घालावे लागले. आपले सैन्य हे देशाच्या राजसत्तेच्या अधीन असते. श्रीलंकेत मूळचे सिंहली आणि कित्येक वर्षांपूर्वी भारतातून तिथे जाऊन स्थायिक झालेले तमिळवंशीय यांच्यात उफाळून आलेल्या सत्ता संघर्षात दोन्ही बाजूंना काबूत ठेवत शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याला सोपवण्यात आली. श्रीलंकेतील तमिळ मूळचे भारतीय आहेत, ते भारतीय सैन्याच्या विरोधात शस्त्र उचलणार नाहीत, हा अंदाज शंभर टक्के खोटा ठरला! आणि LTTE अर्थात Liberation Tigers of Tamil Elam या तामिळ संघटनेच्या बंडखोरांशी भारतीय सैन्याच्या लढाईचे श्रीलंकेतील रामायण सुरू झाले. गुरिल्ला पद्धतीचे युद्धकौशल्य आत्मसात केलेल्या या बंडखोरांनी भारतीय सैन्यास प्रचंड विरोध आणि प्रतिहल्ला करण्यास आरंभ केला. आधी पाठवलेली फौज आणि युद्धसामग्री अपुरी ठरली. मग अधिकची कुमक पाठवली गेली. ऑपरेशन पवन नावाची युद्ध कारवाई सुरुवातीला अत्यंत मोठ्या संकटात सापडली! भारतीय सैन्याचे इलेक्ट्रॉनिक संदेशवहन जाळे बंडखोरांनी भेदण्यात यश मिळवले होते. यातून त्यांनी सैन्याच्या हालचालींची माहिती आधीच मिळवत आपल्या मोठ्या सैन्याला जेरीस आणले होते! तमिळ बंडखोरांना स्थानिक तमिळ जनतेचा फार मोठा पाठिंबा होता. श्रीलंकेतील दाट जंगल,हवामान भारतीय सैन्याला पुरेसे परिचित नव्हते. त्यात त्यांनी प्रतिकाराच्या नव नव्या पद्धती अवलंबल्या होत्या. त्यांचे खबऱ्यांचे जाळे खूप मजबूत होते. सैन्याच्या रस्त्यात छोटी स्फोटके पेरण्यात ते नेहमीच यशस्वी होत असत. वरवर सामान्य दिसणारे नागरिक हत्यारबंद असत. पकडले गेले तर हे बंडखोर गळ्यात बांधलेली सायनाईड गोळी खाऊन थेट आत्महत्या करीत असत…त्यामुळे त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळणे अशक्य होई. अगदी आठ दहा वर्षांची मुले बंडखोरांना साहाय्य करीत असत. गस्तीवर,कारवाईसाठी निघालेल्या आपल्या भारतीय सैन्य तुकडीत नेमके किती सैनिक आहेत, याची माहिती त्यांना अचूक मिळे आणि गावातील मंदिरे,चर्चेस यांतील घंटेचे टोल त्या संख्येत वाजवून दूर लपून बसलेल्या बंडखोरांना सूचना दिली जाई. लहान मुले पुढे पळत जात आणि पुढे उभे असणाऱ्या सायकलस्वार मुलाला निरोप देई…आणि तो पुढे जाऊन आणखी दुसऱ्या व्यक्तीला निरोप देत असे! जंगलात लपून बसून अचूक निशाणेबाजी करण्यात बंडखोर निपुण होते. त्यांनी आपले अनेक अधिकारी टिपले होते. एका भयावह घटनेत आपल्या काही कमांडो सैनिकांना एका सामान्य दिसणाऱ्या नागरिकाने.. एका दुकानाचा पत्ता दाखवतो म्हणून थेट बंडखोरांच्या तावडीत नेऊन सोडले होते…या सर्व सैनिकांची त्यांनी अत्यंत निर्दय,अमानुषपणे हत्या केली!
रेडिओ फ्रीकवेन्सी बाबतही त्यांच्याकडे अचूक यंत्रणा होती…एकूण भारतीय सैन्यापुढे अनपेक्षित असे आव्हान उभे राहिले होते..पण भारतीय सैन्य मागे सरणाऱ्या पैकी नव्हते!
अन्नाई- कोट्टई नावाचे ठिकाण. भारतीय सैन्याची एक मोठी तुकडी जाफना किल्ला ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर होती. त्यापूर्वी दोन दिवस भारतीय सैन्याने आक्रमण स्थगित केले होते. आणखी युद्धसाहित्य मागवून घेऊन जोरदार प्रतिहल्ला चढवण्याची तयारी सुरू होती. अपरिचित प्रदेश,जंगल. मात्र या तुकडीला बंडखोरांनी सर्वच बाजूंनी घट्ट वेढा घातला…आणि गोळीबाराचा फास आवळत आणला..एवढा की सर्व तुकडीच नष्ट होण्याच्या मार्गावर होती. या कारवाईत हलकी शस्त्रे सोबत नेलेली होती आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणात लागणार नाही असा अंदाज होता. पण युद्धात कधीही काहीही होऊ शकते. सैन्याने त्वेषाने प्रतिकार सुरू ठेवला….पण दारूगोळा संपत आला होता! तुकडीने तातडीचा संदेश पाठवला…दारूगोळा पाठवा! हेलिकॉप्टर मधून दारूगोळा पाठवण्याचे प्रयत्न तमिळ बंडखोरांनी मोठा गोळीबार करून हाणून पाडले! यावर पायदळ सैनिकांच्या हातून हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले. ८,महार रेजिमेंट यावेळी तिथे हजर होती. लष्करी वाहनातून रस्ते मार्गे दारूगोळा न्यायचे ठरले.
पंधरा सैनिक, एक अधिकारी यांचे एक आत्मघातकी पथक पाठवायचे ठरले. कॅप्टन सुनील चांदेर यांना नेतृत्व दिले गेले. शत्रूचा वेढा भेदून आपल्या सैनिकांना दारूगोळा पोहोचवायचा होता..छोटी वाहने वापरून शक्य तितके अंतर कापायचे होते….वाटेत तमिळ अतिरेकी दबा धरून बसलेले होते. यातून मार्ग काढत पुढे जायचे होते. शत्रूला आपल्या या मोहिमेची खबर लागली होती…त्यांनी सापळे रचून ठेवले… मात्र आपल्या सैनिकांना थांबून चालणार नव्हते…वेढ्यात अडकलेल्या सैनिकांना वेळेत दारूगोळा मिळाला नाही तर ते मरणाच्या जबड्यात अलगद जाणार होते!
त्यांच्या या वेढ्याला जबरदस्त धडक दिली तरच पुढे जाता येणार होते. या तामिळ वाघांच्या अंगणात भारतीय वाघांना घुसून त्यांचे दात पाडायचे होते. कामगिरी अशक्यप्राय होती…वाहने निघाल्याची खबरही बंडखोरांना मिळालेली असावी! त्यांनी या वाहनांना लक्ष्य करीत हल्ले चढवायला सुरुवात केली. पंधरा पैकी आठ सैनिक धारातीर्थी पडले…खालून आग वर..आग आग बाजूंनी..अशी स्थिती होती….पण या गनिमांना थेट भेट देऊन पुढे जाणे त्या परिस्थितीत अनिवार्य झाले होते!
वाहनातून उतरून कॅप्टन सुनील साहेब आणि उर्वरित सैनिक पुढे सरसावले…त्यांच्यावर सर्व बाजूंनी गोळीबार सुरू झाला. कॅप्टन साहेबांचा एक पाय हातगोळ्याच्या माऱ्यात निकामी झाला. तरीही साहेब गोळीबार करीत पुढे जात राहिले …हातांच्या कोपरांवर सरपटत राहिले! वेढ्यात सापडलेली तुकडी आता थोड्याच अंतरावर राहिली होती. तिला वेढा घातलेल्या बंडखोरांनी आपला मोर्चा सुनील साहेबांच्या तुकडीकडे वळवला…प्रचंड गोळीबार सुरू केला..पण साहेब मागे हटले नाहीत!पण आपला हा वाघ जखमी झाल्याने नाईलाज होता!
आणि….बंडखोरांचा सर्वांत घट्ट वेढा आता तोडावाच लागणार होता….आपल्या त्या तुकडीवर मोठा गोळीबार सुरू होता….फक्त दोन हातगोळे आणि सहाच गोळ्या शिल्लक राहिल्या होत्या…चार दोन मिनिटांत आपले ते सैनिक मृत्यूच्या दाढेखाली जाणार हे उघड होते…प्रभाकरन…LTTE चा म्होरक्या…ज्याने भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली होती…तो जिंकत आला होता!
८,महार चे कॅप्टन सुनील चंदेर साहेब जबर जखमी होते….हाताशी केवळ आठ जवान उरलेले होते…आता वेढा तोडायलाच हवा होता….आणि याच क्षणी महाराष्ट्राचा वाघ डर काळी फोडत पुढे झेपावला…बोलो हिंदुस्थान की जय! यश सिद्धी हे रेजिमेंटचे ब्रीद खरे करून दाखवण्याची ही वेळ होती! १ जून १९६७ रोजी सोलापूरच्या वागदरीत जन्मलेला हा वाघ..प्रभाकर यमाजी पात्रे …वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी लष्करात शिपाई म्हणून भरती झाला होता आणि दोनच वर्षात त्याला श्रीलंकेत Indian Peace Keeping Force सोबत नेमणूक मिळाली होती!
प्रभाकर हातातील रायफल घेऊन थेट बंडखोरांवर चालून नव्हे…धावत गेले….रायफल धडाधडत होती….पण समोरून ऑटोमॅटिक मशीन गन मधून, रॉकेट लाँचर मधून हल्ला सुरू होता…प्रभाकरन थांबले नाहीत…छातीत गोळ्या घुसत राहिल्या….प्रभाकर यांचा गोळीबार थांबला नाही…बंडखोरांना या प्रतियुत्तराची अपेक्षा नव्हती…त्या सर्वांनी प्रभाकर यांच्यावर लक्ष केंद्रित केले…प्रभाकर यांनी कौरवांची फळी कापून काढली… वेढ्याला खिंडार पडले..त्यातून वाट काढत उरलेले सैनिक पुढे गेले…दारूगोळ्याचे वाहन पुढे सरकले…कॅप्टन सुनील साहेबांच्या कुडीत प्राण शिल्लक होते…त्यांनी गोळीबार थांबवला नव्हता..ते ही सरपटत वेढ्यात शिरले….केवळ सहा राऊंड गोळ्या आणि दोन हातगोळे शिल्लक असलेल्या तुकडीला दारूगोळा मिळण्याचा मार्ग अगदी मोक्याच्या क्षणी मोकळा झाला..जणू अखेरचा श्वास घेताना प्राणवायू धावून आला….कॅप्टन सुनील चंदेर आणि शिपाई प्रभाकर बयाजी पात्रे आपल्या suicide squad चे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी ठरले होते…. पण त्यांचे प्राण घेण्यात LTTE ला दुर्दैवाने यश मिळाले… रणात विजय मिळेल पण वीरगती सुद्धा मिळणार हे नियतीने ठरवून ठेवले… नियतीची ही योजना शिपाई प्रभाकर पात्रे यांनी प्रत्यक्षात आणली. श्रीलंकेच्या त्या परक्या युद्धभूमीत हे आणखी दोन मोहरे गळाले…जिथे पुढे धारातीर्थी पडलेल्या सैनिक ,अधिकाऱ्यांची संख्या एकूण ११५७ झाली…३००० पेक्षा अधिक वीर जखमी झाले!
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना भारतीय सैनिक प्राणांची पर्वा करीत नाहीत.. हे सिद्ध झाले.
वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रभाकर पात्रे कर्तव्यासाठी मरून अमर हुतात्मा झाले. या कार्यासाठी कॅप्टन सुनील चंदेर आणि शिपाई प्रभाकर पात्रे यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान केले गेले! या वीर सैनिकांस भावपूर्ण श्रद्धांजली..जय हिंद!
(यानंतर IPKF ने जाफना किल्ला जिंकला…LTTE चा बिमोड करून ही शांतिसेना भारतात परतली! महाराष्ट्राच्या प्रभाकर यांनी प्रभाकरन याच्याशी प्राणांतिक झुंज दिली..असेच म्हणावेसे वाटते.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






