सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ ग्रंथोपचार : भावनिक सक्षमतेचा एक मार्ग… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. कलामसरांचं वाचनप्रेम सर्वश्रूत आहेच. त्यांना पुस्तकं आवडायची. त्या यादीतलं ‘लाईट फ्राॅम मेनी लॅम्प्स’ हे एक पुस्तक. ते म्हणतात, “अपयशी कथा वाचायला हव्यात. त्यातून यशस्वी होण्यासाठीच्या कल्पना सुचतात. ” त्यांचं ‘अग्निपंख’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं आहे. पुस्तकं फक्त आपलं आयुष्यच बदलत नाहीत तर आपल्याला मानसिक सक्षम करतात. भावनिक संतुलन शिकवतात. पुस्तकं म्हणजे कायम साथ देणारे सोबती आणि जगणं अर्थपूर्ण करणारे जवळचे मित्र. पुस्तक म्हणजे नव कल्पनांचा उद्गाता आणि प्रेरणादायी जीवनाचा मार्ग. पुस्तक म्हणजे दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची शक्ती. वाचन म्हणजे मनमोकळेपणानं भटकू शकणारं, हवं तिथं, हवं तसं रमू शकणारं, भावनांना वाहू देणारं, मनाची अनेक रहस्य उलगडणारं, मनाची हिरवळ टिकवून ठेवणारं, दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या समस्यांची उत्तरं देणारं, आयुष्यभर शिकवणारं, वैचारिक समृद्ध करणारं, योग्य मार्गदर्शन करणारं शांत, निर्मळ, मनस्वी अशा सुंदर बागेतलं आत्मिक समाधान.

अशा बागेत फेरफटका मारल्यानं वाचकांना त्यांच्या भावना समजायला मदत होते. बहिणाबाईंच्या कवितांनी आजही समाजमन हळवं होतं. प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी मराठी मनाला खळखळून हसवलं. नाच ग घुमा, नाॅट विदाऊट माय डाॅटर, गार्गी अजून जिवंत आहे, आत्ता अलिकडचं फिंद्री, एक भाकर तीन चुली अशा अनेक पुस्तकांनी वाचकाला रडवलं आहे. अच्युत गोडबोले यांची पुस्तकं दैनंदिन जीवनातील, समाजालाआवश्यक अशा सर्वच विषयांचं सखोल ज्ञान देतात. वाचकांचा आत्मविश्वास वाढवतात. त्यांचं ‘मुसाफिर’ पुस्तक वाचून व्यसन सोडतात. आत्महत्येपासून परावृत्त होतात. ‘गाथा स्वराज्याची – पैलू शिवचरित्राचे’ हे सदानंद कदम यांचं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत फारशा माहीत नसलेला इतिहास सांगतं. ते वाचून वाचकाला एक अनोखी सकारात्मक ऊर्जा मिळते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच एक हजार पुस्तकं वाचली होती. सजग वाचकाला प्रत्येक पुस्तकातून विलक्षण जग अनुभवायला मिळतं. पुस्तकातलं एखादं पान, एखादं वाक्य माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. पुस्तकं प्रेरणा, अध्यात्माचे धडे, आंतरिक शक्तीची जाणीव, लढण्याची क्षमता, जीवनाकडं बघण्याचा नवा दृष्टिकोन देतात. मंगेश पाडगावकर म्हणतात, ‘या ग्रंथाच्या तेजामधूनी जन्मा येते क्रांती.. ग्रंथ शिकविती माणुसकी अन् ग्रंथ शिकविती शांती. ‘ 

पुस्तक वाचनाचे मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक – सामाजिक परिणाम अधोरेखित करता येतील…

मेंदूवर होणारे परिणाम : मेंदूच्या डाव्या भागात टेम्पोरल काॅर्टेक्स असतं. ते भाषा आणि आकलन यासाठी महत्त्वाचं असतं. त्या भागाला वाचनानं चालना मिळते. मेंदूतील संपर्क जाळं वाढतं. विचारांची स्पष्टता वाढते. विश्लेषण कौशल्य वाढतं. शब्दसंग्रह वाढतो. मेंदूची क्षमता वाढत जाते. वाचन आपले विचार, भावना आणि धारणा यांना आकार देतं.

 मानसिक परिणाम : ताण कमी होतो. भावनिक बुद्धिमत्ता वाढते. एकाकीपणा कमी होतो. मानसिक आरोग्याचा सामना सहज करता येतो. व्यक्तिगत विकास होतो. आत्मसन्मान, आत्मजागरूगकता, कार्यक्षमता या भावना सुधारतात. सकारात्मक दृष्टिकोन विस्तारतो. वर्तनदोष सुधारते. सहानुभूती, कृतज्ञता या गुणांची वाढ होते. चांगलं आणि वाईट यातील समज वाढते. भावनिक गरजा पूर्ण होऊ शकतात. वाचनामुळं हृदयाचे ठोके कमी होतात. स्नायूंवरचा ताण कमी होतो.

सामाजिक परिणाम : पुस्तकातील पात्रांशी एकरूप व्हायला होतं. मनाशी संवाद वाढतो. त्याचबरोबर सामाजिक संवाद साधण्यात सहजता येते. नातेसंबंध सुधारू शकतात. कौटुंबिक समस्या, मित्रांची कमतरता याबाबत पुस्तकं सुरक्षितता देतात.

न्युरोसायन्स सांगतं की, वाचनामधे मेंदूचं रसायनशास्र बदलण्याची क्षमता आहे. एफएमआरआय स्कॅन केल्यानंतर असं लक्षात येतं की, ‘आत्मचरित्राचं किंवा आवडीच्या अशा पुस्तकाचं वाचन करताना मेंदूतील आनंद भावनाचं क्षेत्र उसळी मारतात. ‘ वाचन मेंदूला परिपूर्ण व्यायाम देतं. मेंदू एखादा अनुभव वाचणं आणि प्रत्यक्षात जगणं असा फरक करत नाही. वाचताना आणि प्रत्यक्ष जगताना त्याच न्युराॅलाॅजिकल क्षेत्रांना उत्तेजन मिळतं. म्हणूनच पुस्तकं वाचणं ही एक उपचारपद्धती म्हणून उदयाला आली.

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात मानसिक आरोग्य ही एक प्रमुख चिंता झाली होती. लोकांची मन अस्थिर झाली होती. भीती, काळजी, नैराश्य, मूड डिसऑर्डर, आघात, व्यसन, दु:ख, घटस्फोट, बिघडलेले नातेसंबंध, शारीरिक अक्षमता अशा अनेक समस्या जगासमोर आवासून उभ्या होत्या. त्यासाठी अनेक उपचार पद्धतींचा शोध या काळात लागला. त्यापैकीच एक ‘ग्रंथोपचार’ आहे. ‘ग्रंथोपचार’ हा शब्द साधारणपणे शतकापूर्वी पाद्री सॅम्युयल क्रोथर्स यांनी पहिल्यांदा वापरला असला तरी प्राचीन काळापासून हा उपचार अस्तित्वात आहे. प्राचीन ग्रीसमधील थेब्ज येथील ग्रंथालयाच्या दारावर लिहिले होते, ‘आत्म्याचे उपचार करण्याचे ठिकाण. ‘ तेथील वाचकांनी ओळखले होते की, कथा जितकं मनोरंजन करतात, माहिती देतात तितक्याच त्या सांत्त्वन आणि मार्गदर्शन ही करतात.

ग्रंथोपचार म्हणजे वाचनाद्वारे मानसिक संतुलन राखण्याची कला विकसित करणे. त्याचबरोबर भावनिक विकारांवरील उपचारपद्धती सहज आणि सुलभ करणे. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, हृदयविकार आणि पीटीएसडीच्या रूग्णांसाठी या थेरपीचा यशस्वीपणे वापर करण्यात आला होता. कथा हा प्रकार ग्रंथोपचाराच्या पारंपरिक पद्धतीची शैली आहे. यात कविता दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर आत्मचरित्र, चरित्र, ललित, कादंबरी असे साहित्य प्रकार येतात. लहान मुलांकरीता चित्रपुस्तकं उपयुक्त ठरतात.

बिउला कांतेर एफ्राॅन यांनी ‘ इमोशनल डिफिकल्टिज इन रिडिंग: अ सायकॉलॉजिकल अप्रोच टू स्टडी प्रॉब्लेम्स’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते, ‘मानसोपचार तज्ज्ञानी उपचारात्मक वाचन थेरपीचा वापर वाढवला पाहिजे. वाचनातील अडचणीमुळे व्यक्तिमत्त्व समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. ‘

व्हिक्टर नेल यांनी त्यांचं पुस्तक ‘लाॅस्ट इन अ बुक : द सायकाॅलाॅजी ऑफ रीडिंग फाॅर प्लेजर’ यात ग्रंथोपचारावर विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘वाचन शांती मिळवण्याची, अधिक शक्तिशाली होण्याची, धाडसी आणि शहाणं करण्याची दुर्मीळ संधी देतं. वास्तविक जगात असलेल्या इतर कोणत्याही गोष्टींइतकंच पुस्तकं उत्साहवर्धक, मनोरंजक असतात. ‘ सुप्रसिद्ध ग्रंथोपचार तज्ज्ञ बिजल शहा यांनी ‘बिब्लिओथेरपी: द हीलिंग पाॅवर ऑफ रीडिंग’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात या उपचारपद्धतीची सविस्तर माहिती वाचायला मिळते.

‘घराबाहेर चपलांची रांग आणि घरात पुस्तकांचा ढीग’ असं चित्र ज्या घराचं असेल ते घर श्रीमंत आणि अभ्यासू माणसांचं असतं. तिथं ‘ग्रंथोपचाराची’ वेगळी गरज भासत नाही. या उपचारात पुस्तकं दिली जातात. सुचवली जातात. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. घरोघरी ग्रंथालय असावं. ज्यामुळं भावी पिढीचं मानसिक आरोग्य उत्तम राहील. हा उपचार म्हणजे सकारात्मकतेचा, भावनिक साक्षरतेचा, सुंदर जगण्याचा एक मार्ग आहे. त्याचा उपयोग मात्र सर्वानी करून घ्यायला हवा.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted