श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे क्र. ७४ आणि ७५ – –

वादो नावलम्ब्य: ||७४||”

बाहुल्यावकाशादनियतत्वाच्च||७५||

अर्थ : भक्ताने वादाचा आश्रय घेऊ नये कारण वादामध्ये मतभिन्नतेला भरपूर वाव असतो आणि केवळ तर्कावर आधारलेले कोणतेही मत अथवा विधान अंतिम सत्य नसते. (म्हणून भक्ताने वादापासून दूर रहावे)

विवेचनजगाच्या प्रारंभापासून सांगणारे व ऐकणारे कोट्यावधी होऊन गेले आहेत, पण वाद विवाद काही मिटले नाहीत. पण ज्या वादांत संशयाचे ढग व वादाची वादळे एकामागे एक अशी असंख्य उठत असतात ते वाद निव्वळ दंभ वाढवितात. म्हणून भक्ताने त्यांच्या मागे न लागता सत्संगातील संवादसुख तेवढे घेत जावे.

सर्व संत सांगतात की वाद टाळावा. जर सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर वाद होण्याची परिस्थिती निर्माण होणारच नाही याकडे लक्ष द्यावे. “व्यक्ती तितक्या प्रकृती” तसेच “जितकी मने तितके विचार” हे सूत्र ध्यानी ठेवून तसे वागायला शिकावे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या तिथल्या तिथे सोडून द्याव्या, तसेच पूर्व घटना आठवून त्याचा शोक करू नये. साधना करताना वाद विवाद टाळून सद्गुरुंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून साधन करीत राहावे, योग्यवेळी सद्गुरू खात्रीने कृपा करतात, हा विश्वास बाळगावा.

आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी छोटेसे देवघर, देव्हारा किंवा एखादया देवाची प्रतिमा तरी नक्की असते. आपण रोज देवाची यथामती पूजा देखिल करतो. आपल्या घरात आपण कसे राहतो? कसे वागतो? आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपले सबंध कसे असतात? हे सर्व पाहून देवाला आपल्या घरात राहावेसे वाटेल का? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. खरंतर, आपल्या घरात देव राहतो असे वाटण्यापेक्षा आपण देवाच्या घरात (मंदिरात) राहतो असे वाटले पाहिजे आणि आपण तसे वागले पाहिजे. हाच खरा सत्संग होईल.

आपल्याशी संवाद साधल्यामुळे समोरची व्यक्ती अंशत: तरी समृद्ध व्हावी.  किमान तसा आपला प्रयत्न असावा, असे झाले नाही तर आपण आपण निव्वळ वाचाळवीर ठरू. “बोले तैसा चाले…. ” असा आपला प्रयत्न असावा. नेमके आणि मोजके बोलणे हे सुसंवांद होण्यास उपयुक्त ठरते, नाही का? आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू.

“तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं।

वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः॥

वादे वादे जायते तत्त्वबोधः।

बोधे बोधे भासते चन्द्रचूडः॥”

“मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥”

(दा. ११. ०२. २५)

दैनंदिन व्यवहार करताना अनेक विचारांची माणसे भेटतात. कधी एका विचाराच्या माणसांची चलती असते तर कधी दुसऱ्या… लोकं जातात पण विचार तिथेच रहातात. अर्थात दोन विचारांमधील वाद तसेच राहतात. अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अनेक वाद (विचार) आहेत. द्वैत-अद्वैत हा तर प्रमुख वाद आहे. त्यानंतर शैव वैष्णव हा सुद्धा एक वाद आहे…. साधकाने या वादात फसू नये असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. कुठे वाद घालायचा आणि तो कुठे थांबवायचा ह्याचे तारतम्य कळले नाही, तर संवाद न होता तो फक्त वाद होतो आणि वादातून काहीही निष्पन्न होत नाही, असे इतिहास सांगतो. अध्यात्म क्षेत्रात तरी मनुष्याने वादविवादाच्या भानगडीत न पडता सद्गुरू आज्ञेचे पालन करावे. एक गुरू आणि एक नाम, एक प्रमाण ग्रंथ इतक्या भांडवलावर मनुष्य आत्मारामाची प्राप्ती करून घेऊ शकतो.

संत्संग आपल्याला देवाकडे काय मागावे हे शिकवितो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला मागतो आणि दुर्योधन श्रीकृष्णाचे सैन्य. आपल्याला नवीन काही शिकायचे असेल तर आपली पाटी कोरी हवी. आपण आपला अभिमान घेऊन देवाकडे गेलो तर देव सांगेल ते कधीच आपल्याला पटणार नाही. संवाद होणारच नाही मग हाती काय लागणार? म्हणून देवळात जाताना पायातील चप्पल आणि डोक्यावरील टोपी काढून जावे असे आपल्याला शिकविले जाते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

टीप : अधिक अभ्यास करायचा असल्यास मनाच्या खालील श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

वरील दोन्ही सूत्रांचे सुलभीकरण करून आपल्यापुढे मांडण्याचे कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले असल्याचे आपल्या लक्षात येईल. मनाच्या श्लोकांत ते म्हणतात,

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

*
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

*

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

*

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

*

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

*

– – – – –   

भक्ति सूत्रे क्र. ७६ – – – 

भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधककर्माण्यपि करणीयानि||७६||

अर्थ : भक्तीविषयक शास्त्राचे मनन करावे आणि भक्तीला सहाय्यभूत होणारी कर्मे करावी.

विवेचन :

“विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी | तेणे पथ्ये सांभाळावी” असे संत वचन आहे. भक्ति करताना मनुष्याने अधिकाधिक शुद्ध होण्याची अनिवार्यता असते. शुद्ध म्हणजे किती शुद्ध? तर जगात सर्वात शुद्ध आणि पवित्र कोण असेल तर तो एकमात्र भगवंत. त्याच्या इतके शुद्ध होण्यासाठी देहधारी साधकाची देहबुद्धी क्षीण होणे आवश्यक असते. एकदा सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज यांनी आपल्या पट्टशिष्याला अर्थात ब्रम्हानंद बुवांना प्रश्न विचारला की तू तर विद्वान आहेस. वेद, वेदांत यांत पारंगत आहेस. मी कसा तुझा गुरू झालो? आणि नंतर स्वतःच म्हणाले की कदाचित तुझ्यापेक्षा मी कणभर जास्त देहाला विसरलो असेन….! कथेतील भावार्थ इतकाच की देहबुद्धि क्षीण नव्हे, तर पूर्णपणे नष्ट होणे ही साधकाच्या भक्तीचे प्रमाण मानता येईल.

आता ही देहबुद्धि समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यक त्या आणि तितक्याच शास्त्रांचा किंवा ग्रंथांचा अभ्यास साधकाने करावा. अन्यथा साधक साधक न रहाता शास्त्री होतो आणि पुन्हा कर्मठपणाचा दोष त्याच्या अंगी निर्माण होऊन तो पथभ्रष्ट होऊ शकतो.

श्रीमहाराज म्हणायचे की फार वाचू नये. जितके वाचावे तितके साधकाने आधी आचरणात आणावे, अन्यथा मी इतके इतके ग्रंथ वाचले, इतक्या शास्त्रांचा अभ्यास केला याचा वृथा अभिमान बळावू शकतो.

भक्ति शास्त्र म्हणून समजून घेण्यासाठी एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करण्यास हरकत नाही. आजपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्या सर्वांचे ग्रंथ अभ्यास करायचा म्हटले तर अनेक जन्म घ्यावे लागतील आणि मूळ हेतू मात्र विसरला जाईल. यावर सर्व संतांनी एक उपाय सांगितला. एक गुरू, एक ग्रंथ आणि एक नाम. या तिघांच्या सहाय्याने मनुष्य भगवतांची प्राप्ती करून घेऊ शकतो.

साधकाने आपले प्रत्येक कर्म अशा पद्धतीने करावे की जेणेकरून त्यातून भक्तीची वाढ होईल.

भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील आपल्याला झेपेल अशी व्याख्या प्रमाण मानावी. मला भावलेल्या दोन व्याख्या इथे देत आहे.

१. “जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।” (ज्ञाने. 10. 18)

२. प्रपंचात जेवढी आसक्ती | तेवढी भगवंतावर प्रीती || याचे नाव भक्ति”

साधकाने आपल्याला भावणारा ग्रंथ निवडावा आणि त्याचा साक्षेपाने अभ्यास करावा, त्यावर चिंतन, मनन करावे, म्हणजे त्याला पुढील मार्ग आपसूक दिसू लागेल.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७४, ७५, ७६..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted