प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५. ☆ प्रा.भारती जोगी ☆

(चित्र पुढील माहितीनुसार काल्पनिक.)

निसर्गाने रौद्र रूप धारण केलेले… भयंकर पाऊस सुरू… कालिंदी नदीला महापूर आलेला… आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या रात्री एक तरूण पती माहेरी गेलेल्या पत्नीच्या आठवणीत विरहदग्ध, मिलनातूर, विकल मनाने वेड्यासारखा थेट पोचतो पत्नीच्या माहेरी, तिच्या पुढ्यात… सामोरा!! नदी पार करतांना काष्ट समजून एका मानवी शवाचा आधार घेत, भिंतीवर चढण्यासाठी दोर समजून सापाला धरून… बेभान अवस्थेत!! 

पत्नी चकीत होते… पण दुसऱ्याच क्षणी सत्य कळल्यावर, तिला आपल्या रूप आणि यौवनाचा धिक्कार करावासा वाटला. आणि तिच्या तोंडून उद्विग्न उद्गार बाहेर पडले…

लाज न लागत आपको, दौरे आहे साथ, 

धिक धिक ऐसे प्रेम को, कहा कहौ मैं नाथ !! 

आणि असा धिक्कार करत तिनं पुढे त्याला ही उन्मादावस्थेतून जागं केलं…

अस्थि चर्ममय देह, यांमे ऐसी प्रीती

जो होती रघुनाथ मंह, होती न तो भवभीती!! 

आपल्या पतीला हे असे खडे बोल सुनावणारी ही सुंदर रूप यौवना, युवती होती… रत्नावली!!! 

आणि तो युवक, तिचा पती होता… तुलसीदास उर्फ रामबोला!!! 

रत्नावली… सौंदर्य आणि बुद्धी दोन्हीं लेऊन आलेली एक धर्मपरायण युवती ! जी लावण्यम् अंतर्मन: ही होती. म्हणूनच तिने दाखवून दिले की, भारत देशातील नारी; तिने ठरवलं तर आपल्या पतीला युवावस्थेच्या उन्माद क्षणांमधून ईश्वर भक्तीकडे उन्मुख करण्यास सक्षम असते.

रत्नावली चे हे शब्द तुलसीदास ने ऐकले आणि त्याच्या मनावरील उन्माद, मोह, भ्रांती या सगळ्याचा पडदा दूर झाला. पूर्वजन्मीचे संस्कार प्रदिप्त झाले. आणि आता डोळ्यांसमोर श्रीरामाचे मंगलकारी शुभ रूप, संपूर्ण सौंदर्यासहीत दृग्गोचर झाले. आणि तो निघाला विरक्ती च्या वाटेवर, संन्यस्त वृत्ती ने, प्रभु रामचंद्र च्या कृपादृष्टी च्या लाभासाठी! 

रत्नावली जिने दाखवून दिलं की, प्रेम जेव्हा ईश्वरा प्रती नेणारे असते तेव्हा ते एक गहन परिवर्तन, एक उच्चतम आव्हान स्वीकारायला तयार असते. आणि म्हणूनच समर्पित जीवन स्वीकारायला ही तयार असते.

रत्नावली ने एक चैतन्य तुलसीदास च्या मनात चेतविले. त्याच्या चेतनेला जागवलं… आणि तुलसीदास ला ही… या… समिधेच्या शब्दस्पर्शातलं स्फुल्लिंग जाणवलं! त्याला कळलं… हाच तो क्षण! हीच ती वेळ!!! काम कडून राम कडे जाणाऱ्या भक्ती मार्गावरील जीवनयात्रा सुरू करण्याची!! तुलसीदास पुन्हा वळून न पाहण्यासाठी, निघून गेला त्या वाटेला! एक गृहस्थ, संन्यासी झाला.

त्याच्या हातून रामचरितमानस या महान ग्रंथाचं, आणि अशाच अनेक ग्रंथांचे सृजन झालं. घरा-घरात राम भजन निनादलं! तुलसीदास संत तुलसीदास पदाला पोहोचला.

पण… या सगळ्यात सगळ्यांनाच विसर पडला त्या पहिलं चैतन्य स्फुल्लिंग चेतवणा-या समिधेचा! रत्नावली ख-या अर्थाने गुरू ठरली तुलसीदास ला योग्य मार्गदर्शन करणारी, त्याला राम भेटवणारा योग्य मार्ग दाखवणारी! किती महान स्त्री म्हणावी ती… जिच्या हृदयात अगाध भक्ती भाव तर होताच, पण पतीवर ही प्रगाढ प्रेम होतं! म्हणूनच तर तिच्या दिव्य दृष्टीला आपल्या पतीचं दिव्यत्व जाणवलं ना! 

हे विसरून कसं चालेल की…

रत्ना नसती तर तुलसीदास सारखं रत्न झालंच नसतं, आणि तुलसीदासला ही राम रतन धन प्राप्त झालंच नसतं! 

रत्नावली ने दाखवून दिलं की, खरं प्रेम तेच, जे ईश्वरा जवळ घेऊन जाते. 

रत्नावली चं एकाकी जीवन स्विकारण्याचं पेललेलं आव्हान उपेक्षून नाहीच ना चालणार!! 

शेवटी तीसुद्धा एक स्त्री च होती. तिला ही वाटलंच असेल ना, की पतीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून जीवन आपल्याबरोबर व्यतीत करावे!! तो असा कायमचा त्यागून निघून जाईल, हा तिच्या साठी धक्काच होता. एक आव्हान तिने पेरलं पतीच्या मनात, तर एक आव्हान तिच्या ही वाट्याला आलंच पेलण्यासाठी! एकाकी जीवन, आजीवन जगण्याचं! 

मग रत्नावली ने आपलं एकटेपणाचं दु:ख, ती बोचणारी सल, ती विरह व्याकुळ, झुरणा-या मनाची विकल अवस्था तिने… अनेक, असंख्य दोह्यांत, झरझर वाहणा-या अश्रूंच्या साक्षीने प्रतिबिंबित केली. वियोगाचं दु:ख स्पष्ट दिसतं त्यांत!! इतकंच नाही तर, रत्नावली च्या ज्ञानाचं, विद्वत्तेचे ही प्रतिबिंब दिसतं त्यात! तिचे दोहे, त्यांची भाषा आणि त्यांतील भाव हे दोन्ही उच्च कोटीचे आहेत. काही ठिकाणी तर तुलसीदास पेक्षाही उत्कृष्ट आहे, सरस आहे ती! पण तिची ही काव्यप्रतिभा उपेक्षितच राहिली. मुळात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे, ठामपणे उभी राहणा-या स्त्री चा त्याग, समर्पण, एकाकीपण, तिचं मोठेपण… नेहमीच अलक्षित, उपेक्षित, दुर्लक्षित राहतं! 

तीच उपेक्षा रत्नावली च्या ही वाट्याला आली.

पण हे विसरून चालणार नाही की…

रत्नावली ने पतीला धिक्कारले नसते तर रामबोलागोस्वामी तुलसीदास कसा बरं झाला असता?? 

 पतीच्या मनात रामभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी, चैतन्य जागवणारी, तेजोमयी समिधा च ना ही रत्नावली!! 

रत्ना अगर ना होती तो तुलसी जैसा रतन नहीं होता!

– लेख क्र. ५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments