श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७३ – – 

देहेदंडणेचे महा दुःख आहे।

महादुःख ते नाम घेता न राहे।

सदाशिव चिंतीतसे देव देवा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७३।।

अर्थ : देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.

(देहेदंडणे – देहाला कष्ट/यातना देणे )

विवेचन : अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या पाण्यात उभे राहून. असे अनेक प्रकार होते. या सगळ्या गोष्टींचा उद्देश देहाबद्दलची आसक्ती नाहीशी व्हावी आणि परमेश्वर प्राप्तीकडे मनाचा कल व्हावा असा असायचा. परंतु देहाला एवढे कष्ट देऊन सर्वांनाच परमेश्वर प्राप्ती होईल अशी शाश्वती नव्हती. शिवाय काही कारणाने तप करणे मध्येच थांबले तर सर्वच व्यर्थ जायचे.

परंतु नामसाधनेत असे कष्ट देहाला पडत नाहीत. नामसाधना सोपी आहे. तुकाराम महाराज देखील सांगतात, “नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. “मग एवढे सोपे साधन सोडून देहाला ताडन करणारी इतर साधने का अवलंबावीत ?

या संसारात देखील मानवी देहाला अनेक प्रकारचे कष्ट होतात. नानाविध त्रासांना सामोरे जावे लागते. प्रारब्धाने वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. या सगळ्या गोष्टीत शरीराला प्रचंड त्रास होतो. आपण म्हणतो की कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही. हे खरेच आहे. प्रारब्धाने आलेले दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. पण सगळ्या परिस्थितीत रामनाम औषधाचे काम करते. देहाला वेदना होतील पण रामनामामुळे तो त्रास मनापर्यंत पोहोचत नाही. देहाच्या दुःखावर इतर औषधे तात्पुरती काम करतात पण रामनाम त्यावर मात करण्याची शक्ती देते. मात्र ते औषध नियमितपणे घोट घोट पोटात जायला हवे.

रामनामाचे इतके महत्व समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट सांगून, समजावूनही पटली नाही तर त्याला एखाद्या मोठया व्यक्तीचे उदाहरण देऊन समजवावे लागते. समर्थ म्हणतात, ” हे मना, अरे तुला किती आणि काय सांगू ? प्रत्यक्ष योगियांचा राणा असलेले भगवान शंकर देखील श्रीरामाचा जप करतात. त्याचेच चिंतन करतात. मग तुला करायला काय हरकत आहे ?” श्रीराम हे देवांचे देव आहेत. त्यांनीच देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले आहे. आदी आणि अंत तेच आहेत. तेव्हा हे मना, प्रभात समयी रामाचे चिंतन कर.

स्वसंवाद :: 

१. मी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा समाधानासाठी केवळ बाह्य कष्टांचे (उपासतापास, कठीण व्रतवैकल्ये) अवडंबर माजवत आहे का?

२. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे माझ्या देहाला ‘दुःख’ होते, तेव्हा मी निराश होतो की रामनामरूपी औषधाचा आश्रय घेतो?

३. “कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही” हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून, मी माझ्या मनाला नामस्मरणाने खंबीर बनवले आहे का?

४. जर प्रत्यक्ष भगवान शंकर (देवाधिदेव) निरंतर रामनामाचे चिंतन करतात, तर मग संसारी असलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?

============== 

श्लोक क्र. ७४ – – 

बहुतांपरी संकटे साधनाची।

व्रते दान उद्यापने ते धनाची।

दिनाचा दयाळू मनी आठवावा।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७४।।

अर्थ : परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.

(बहुतांपरी – अनेक प्रकारचे, साधनांची – ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन – एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी )

विवेचन : ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम असतात. त्यांचे व्यवस्थित पालन झाले पाहिजे. व्रत व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर त्याची विधिपूर्वक सांगता करावी लागते. त्यासाठी पुरोहितांना बोलावून धार्मिक विधी, दानधर्म, दक्षिणा आदी गोष्टी कराव्या लागतात.

व्रत, दानधर्म आणि उद्यापने या गोष्टी करायच्या तर पैशाची व्यवस्था आधी करावी लागते. बरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठीचे बाह्य मार्ग झाले. हे सगळे करीत असताना माणूस यातच गुंतून पडतो. परमेश्वर प्राप्तीसाठी अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. तो आपल्या अंतर्यामीच वसलेला असतो. सगळे लोक व्रतवैकल्ये, उद्यापन सोहळे, दानधर्म आदी गोष्टी समारंभपूर्वक करतात म्हणून आपल्यालाही असे करायलाच हवे नाहीतर लोक काय म्हणतील अशी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. बऱ्याच वेळा मग इतरांना दाखवण्यासाठी देखील असे विधी मोठे समारंभपूर्वक करावे लागतात. यात आर्थिक आणि मानसिक कुतरओढ होते ती सर्वसामान्य माणसाची. त्याचा गोंधळ होतो. नेमके काय करावे ते कळत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण परमेश्वर यापैकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करत नाही.

समर्थांसारख्या संतांना या गोष्टीची अचूक जाणीव असते. समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस जपतप, अनुष्ठान, व्रते, उद्यापने यासारख्या कर्मकांडात अडकून पडला होता. तो बहिर्मुख झाला होता. त्याला अंतर्मुख करणे आवश्यक होते. समर्थांसारखे सद्गुरू लोककल्याणाचा कळवळा असल्यानेच नामस्मरणासारखा सोपा मार्ग सांगत आहेत. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. त्याची दीन होऊन म्हणजेच आर्ततेने भक्ती केली, तर तो आपल्या दासांवर कृपा करतो. ‘ नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ‘ असे समर्थांनी सांगितलेच आहे. आपणही तो मार्ग अनुसरावा. दीनांचा दयाळू असलेल्या भगवंताला मनी आठवावे. त्याचे रूपगुण अंतरी साठवावे. अशा या भगवंताचे प्रभात समयी चिंतन करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ” आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. “

स्वसंवाद :: 

१. मी करत असलेल्या धार्मिक गोष्टी (व्रतवैकल्ये किंवा पूजा) केवळ ‘इतरांना दाखवण्यासाठी’ किंवा एक सामाजिक प्रथा म्हणून करत आहे का?

२. भगवंत माझ्या अंतर्यामीच आहे हे ठाऊक असूनही, मी त्याला शोधण्यासाठी बाह्य कर्मकांडात आणि सण-समारंभांच्या अवडंबरातच गुंतून पडलो आहे का?

३. जेव्हा माझ्याकडे आर्थिक मर्यादा असतात, तेव्हा मी देवाचा कोप होईल या भीतीने व्याकुळ होतो, की “तो दीनांचा दयाळू आहे” या भावनेने त्याला आर्ततेने साद घालतो?

४. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मी सर्व चिंता त्या लक्ष्मीपतीवर सोडून देऊन कधी ‘आवडीने आणि भक्तीभावाने’ केवळ नामस्मरण केले आहे का?

– क्रमशः श्लोक ७३ आणि ७४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted