कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २९० – विजय साहित्य
☆ विचारगाथा…! ☆
☆
माणूस नाही,धर्मा करीता
धर्म पाहिजे, माणूसकीचा
गेले सांगून, बाबासाहेब
मार्ग दावीला, विश्व शांतीचा.
*
मानव मूल्ये, हवी एकता
भाव असावा, विश्वबंधुता
संघर्ष न्यारा, मार्ग अनोखा
नको कुणाच्या,मनी कटूता.
*
शिका लढा नी, संघटीत व्हा
शिका लोकहो, सुशिक्षीत व्हा
करा स्वतःला, पदवीधर
दिली प्रेरणा, संरक्षीत व्हा.
*
शिक्षण आहे, वाघीण माया
जाईल कैसे, पोषण वाया
हक्क माणसा, मिळवायाला
स्वावलंबनी, झिजवा काया.
*
लोकशाहीची, तंत्र प्रणाली
कसे जगावे, तत्व कळाली
जबाबदारी, कर्तव्ये सारी
मानवतेच्या, पदी वळाली.
*
आत्म बलाने, वावरणारी
सक्षम व्हावी समाज नारी
माया ममता, शांती करूणा
बुद्धिनिष्ठता, जगता भारी.
*
नको कुणाची, साहू गुलामी
संविधान ही, घटना नामी
वैज्ञानिकता, ध्येय ठेवूनी
रहा सुखाच्या, सदैव धामी.
*
महामानवी, विचार गाथा
आठवताना, झुकतो माथा
शब्द बोलती, भीमरायाचे
नका खाऊरे, जुलमी लाथा.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






