सौ. ज्योती कुळकर्णी
काव्यानंद
☆ माझिया गीतात वेडे… कवी : सुरेश भट ☆ रसग्रहण – सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
“माझिया गीतात वेडे
दुःख संतांचे भिनावे”
ही कविता मी रसग्रहणासाठी निवडली आहे.
मा. सुरेश भट हे प्रामुख्याने गझल मराठीत रुजविणारे कवी म्हणून ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांचे काव्य देखील उत्कृष्ट असेच आहे. आपल्या कविते मधून मानवतेची मूल्ये त्यांनी अतिशय सुंदर शब्दात मांडली आहेत. हा कवी माणूस म्हणून अतिशय संवेदनाशील होता. मराठीत काव्य लिहिताना संतांचे खूप मोठे योगदान आहे हे त्यांना मान्य आहे. म्हणूनच ते म्हणतात…
“माझिया गीतात वेडे, दुःख संतांचे भिनावे
वाळल्या वेलीस माझ्या, अमृताचे फूल यावे”
संत नेहमीच समाजाचे मार्गदर्शक असतात. आपले जीवन वेचून संघर्ष करून विरोधाचे दुःख पत्करून, ते समाजाचे दीपस्तंभ होत असतात.अशाच अनुभूतीतून संत काव्य ही निर्माण होत असते सुरेश भटांचीही तीच इच्छा आहे की मी संतांप्रमाणे जगेल तेव्हाच ते माझ्या काव्यात येईल.आज मी वाळल्या वेलीप्रमाणे आहे. संतांइतका संवेदनाशील नाहीय. पण मी तसे व्हावे आणि त्याला अमृताचे फूल यावे म्हणजेच मी संतांसारखे दुसऱ्यांचे दुःख जाणणारा झालो तर त्यानंतर मी लिहिलेले वाङ्मय अमृताच्या फुलाप्रमाणे अमर राहील. खरंच त्यांचे काव्य तसेच आहे.
म्हणूनच ते पुढे म्हणतात की आशयाचे खूप मोठे आकाश माझ्या छोट्या शब्दांमध्ये भरले जावे. मी जर समाजाशी एकरूप होऊन जगत नसेल तर आता तरी तसे जगावे समाजाचे देणे फेडले तर जीवनाच्या माधुर्यात मी न्हाऊन निघेल.
याच काव्यात ते पुढे म्हणतात ज्ञानेश्वरांच्या दुःखांची स्पंदने माझ्या वक्षात यावी आणि इंद्रियां वाचून इंद्रिय मी भोगून घ्यावी. म्हणजेच ज्ञानदेवांनी अतिशय कमी वयात खूप मोठी दुनिया बघितली दुःख जगले व त्यातून त्यांचे अक्षर वाङ्मय जन्माला आले तेच मला पण प्राप्त व्हावे असे कवी म्हणतात.
पुढे ते म्हणतात नामदेवांप्रमाणेच जीवनाच्या सगळ्या अंगांना मी स्पर्श करावा एकनाथांनी त्यांच्या पंगतीला मला बसवून घ्यावे व नामदेवांप्रमाणे सर्व समावेशक चविष्ट गोपालकाला माझ्या जीवनाचा व्हावा.
कवी पुढे म्हणतात की तुकाराम महाराजांचे डोळे मला प्राप्त होऊन रंजला गांजल्यांचे दुःख मला बघता यावे. व तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे……
“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेच करी”
असा चोख व्यवहार माझ्यात भिनावा व शेवटी हे ह्या कवितेत ते पांडुरंगाची विनवणी करतात आणि म्हणतात की पांडुरंगा मी वर मांडलेले मागणे तुला मागितले आहे. त्याशिवाय आणखी मला काहीच नको. फक्त एवढीच मागणी तू पूर्ण कर.आणि ही मागणी तू पूर्ण करावी यासाठी मी तुझ्या दारात दंगा मांडलेला आहे.
या पूर्ण काव्यातून कवींची स्वतःची जीवनमूल्ये आपल्याला जाणवतात समाजातली रंजल्या गांजल्यांची दुःखे त्यांनी नेहमी आपलीच मानली व तसेच जगले. याचाच परिपाक म्हणून त्यांनी शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
सुरेश भटांच्या कवितेत आशयाचे सौंदर्य तर असतेच. परंतु त्यांच्या बहुतांश कविता वृत्तबद्धच असतात.आपल्या अतिशय सरळ भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी या काव्यात अतिशय सरल असे मनोरमा हे वृत्त निवडले आहे. या काव्याची भाषा मधुर तर आहेच.परंतु अतिशय सरल सोपी कुणालाही समजेल अशी प्रासादिक आहे. अतिशय सुंदर शब्दांची पखरण काव्यात त्यांनी केली आहे.
जसे की…
” स्पंदने ज्ञानेश्वरांची माझिया वक्षात यावी “
“माझ्यासाठी जगाचे जाते रोज घर्घरावे “
” ह्याच साठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा”
अशा अतिशय सुंदर व सरल शब्दातून काव्य मधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच गझल व काव्यामध्ये येणारी ही वैशिष्ट्ये या काव्यातही येतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काव्य लिहिताना ते वृत्त अतिशय काटेकोरपणे व नीट सांभाळतात. त्याचप्रमाणे काव्यात ऱ्हस्व दीर्घाच्या चुका अजिबात नसणे हे देखील त्यांच्या काव्यातले एक वैशिष्ट्य आहे. याही काव्यात आपल्याला ते जाणवते.
प्रामुख्याने ते गझलकार आहेत.या गझल काराबद्दल शेवटी मी असे म्हणेल की……
“दिली भटांनी मला ओसरी शिकणे कविता आहे
फुटकळ माझे, काव्य तयांचे तर बहुमोली आहे”
© सौ. ज्योती प्रकाश कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






