श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘आधी करते वेणी-फणी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
आधी करते वेणी-फणी
मग सजते लक्षुमीवाणी!
प्रास्ताविकः-
आपले शरीर सजवणे, शृंगारणे ही माणसाची एक विशेष आवड आहे. माणूस जेव्हापासून टोळ्या करून राहू लागला तेव्हापासून ही प्रवृत्ती अधिक वाढीस लागली असावी. तरुण वयात दुस-याला आकर्षित करण्यासाठी तरुण- तरुणी, आपण अधिक आकर्षक दिसावे म्हणून असे प्रयोग करू लागले असावेत.
आरंभी आदिमानव निसर्गात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तूंचा शरीर शृंगारण्यासाठी उपयोग करी होता. त्यात पाने, फुले, फळे, झाडांच्या साली, शंख, शिंपले, माशांचे खवले, रंगीत खडे- दगड-गोटे, माती, प्राण्यांच्या त्वचा, केस, हाडे, दात, नखे, शिंगे इ. वस्तूंचा समावेष असे. या वस्तू तो अलंकार म्हणून वापरू लागला. यात हजारो वर्ष गेली असतील. वस्त्रे आणि धातूंचा शोध लागल्यानंतर विविध धातू आणि वरील नैसर्गिक सामग्री यापासून अलंकार घडवण्याची कला विकसित होत होत पुढे तर संस्कृति विकासाबरोबर हे स्वतंत्र, समृद्ध, नेत्रदीपक असे कलाक्षेत्रच विकसित झाले!
यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ कसा होता, या काळात स्त्रिया कोणते अलंकार परिधान करीत हे समजून घेणे रंजक ठरेल.
फणेरपेटी
रोजच्या प्रसाधनासाठी स्त्रियांकडे एक आयताकृती ‘फणेरपेटी’ (मेकप बाॕक्स) असायची. ती सागवान, शिसम, चंदन अशा सुंदर लाकडाची असायची. तिचे लाकडी झाकण पितळी, रुपेरी, चांदीची फुले, पाने बसवून सुशोभित केलेले असे. पेटीच्या पुढे पितळी कडी-कोयंडा असे. झाकणाला मधोमध आडवी बिजागिरी असायची. अर्धे झाकण उघडले की आतले दर्पण बाहेर यायचे. ते पेटीच्या पुढील फळीवर कोन साधून उभे केले की त्यात सहज मुखावलोकन करता यायचे.
पेटीमध्ये विविध आकाराचे कप्पे असायचे. त्यात वस्तूंच्या आकारमानाप्रमाणे विविध प्रसाधनद्रव्ये व साधने ठेवली जायची.
या फणेरपेटीत केस विंचरण्याच्या विविध आकाराच्या फण्या असायच्या. या फण्या लाकूड, हस्तिदंत अशा पदार्थापासून घडवलेल्या असत. पेटीत पिंजर, मेण, काजळाच्या चांदीच्या डब्या, केसांचे आकडे, चाप, सोन्या-रुप्याची नाजुक फुले, वेण्यांची टोके बांधण्यासाठी लागणारी रेशीम-लोकरीची अगुळे, आंबाड्यावर घालायच्या जाळ्या, आत्तराच्या कुप्या असे साहित्य ठेवलेले असे. स्त्रिया त्यांची वेणीफणी एकांतात, एका ठराविक वेळी, ठराविक जागी बसून करीत. वेळीअवेळी, पुरुषांसमोर, चारचौघात, कुठेही करीत नसत.
आता स्त्रियांचे अलंकार, आभूषणे कशी होती ते पाहू.
यादवकालीन समृद्ध महाराष्ट्रः-
एके काळी महाराष्ट्रातील स्त्रिया नखशिखांत आभूषणे ल्यायच्या. थोडक्यात म्हणजे त्या वेळच्या ‘गृहलक्ष्या’ दागिन्यांनी अक्षरशः लगडलेल्या असायच्या. नदीवर धुणीभांडी करताना त्यांच्या हातातले सोने घाटाच्या दगडी पाय-यांवर जायफळासारखे झिजायचे! (ब. मो. पुरंद-यांची उपमा- पहा ‘राजा शिवछत्रपती’)
स्त्रिधनः-
विवाहात वधुपिता यथाशक्ती आपल्या कन्येला विविध अलंकारांनी मंडित करून मग जामाताला तिचे ‘सालंकृत कन्यादान’ करीत असे. पित्याने विवाहात दिलेले हे मौल्यवान अलंकार हेच तिचे स्त्रिधन. विवाहानंतर पतीही वेगवेगळ्या सणवारांच्या निमित्ताने, मंगल प्रसंगी, विजयप्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी आपल्या पत्नीला कौतुकाने वेळोवेळी यथाशक्ती अलंकार भेट देत असे. अशा रीतीने तिचे स्त्रिधन वाढत राही. या स्त्रिधनावर पती सहसा आपला अधिकार सांगत नसे.
या गृहलक्ष्मीची कन्या जेव्हा उपवर होई तेव्हा तिच्या विवाहात तिची आई आपल्या माहेरकडून मिळालेले स्त्रिधन कन्येला देत असे. एकापेक्षा आधिक मुली असतील तर ते स्त्रिधन त्या मुलींमधे समान प्रमाणात वाटले जाई. अशा रीतीने स्त्रियांच्या आर्थिक सुरक्षिततेची, स्थैर्याची समाजव्यवस्था आणि आर्थिक शिस्त पिढ्यानपिढ्या पाळली जात होती.
अलंकार द्रव्येः-
विविध आभूषणांची सूची पुढे दिली आहे. हे अलंकार सोने, चांदी, रुपे, तांबे, रेशीम यापासून घडविले जात. काही अलंकारात मौल्यवान रत्ने, प्रवाळ, मोती, दुर्मिळ खडे जडविलेले असत. ज्याच्या त्याच्या वर्णाप्रमाणे, सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे विविध दागिने वापरले जात.
पुढे दिलेली अलंकारसूची वाचल्यावर कळेल आपल्या पूर्वजांची समृद्धी, संपन्नता, सुसंस्कृतता, रसिकता, कलात्मकता, कलासक्तता!
अलंकारसूची
शिरोभूषणे :-
केतकीपत्र, मागच्या बाजूस मूद, राखडी, अग्रफूल, चूडामणी, सोनवेणी.
केशसंभार/ केशकलापावर धारण करण्याचे अलंकारः-
केसांची तिपेडी, पाचपेडी, सातपेडी वेणीच्या शेपट्यावर चांदीसोन्याचे घुंगरांचे रेशमी गोंडे, वरपासून टोकापर्यंत खोचायची सोन्याची गुलाबपुष्पे, फुलाची वेणी, वेणीत सीस फूल, मोर (सोन्याचा वा रत्नांचा), बोर, वेणीऐवजी अंबाडा असल्यास पाणीदार नाजुक मोत्याची जाळी.
भाळ/कपाळ:-
फरा, पिंपळपान, बिंदी, बिजवरा
कर्ण भूषणे :-
लोंबते भोकर, त्यावर कासव, मासा, कुडी, बुगड्या, बाळ्या, लवंगा, झुबे, वेल, मासबाळी, चंद्रबाळी, चौफुले, सर्वमान्य लटलटणारे पाचू-माणकाचे डूल. कानातील आभूषणांच्या भाराने कानाच्या पाळीची छिद्रे ओघळू नयेत म्हणून एक साखळी कानापासून केसांवर खोचलेली असे.
नासिका आभूषणे :-
सुंकले, चमकी, मोरणी, नथ वा नथनी. नाकापासून कानापर्यंत वेल.
कंठ/गळा :-
हंसली, चोकर, पोत, दूड, मंगळसूत्र, मोतीसर अनेकपदरी, कंठी, साज कोल्हापुरी, कंठी बहुकोनी, मणिमाळ आखूड वा लांब, लफ्फा, पेट्या, तन्मणी, चंद्रहार, चंद्रहार- टिकल्यांचा बहुपदरी, दोन किंवा पाच पदरी चपलाहार, छोटा चंद्रहार, मोहनमाळ, बोरमाळ, रायणमाळ, एकदाणी, राणीहार, सरी, गळसरी, टिका, ठुशी, वज्रटीक, श्रीमंतहार, लक्ष्मीहार, चिंचपेटी, सावित्रीहार. एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार चपलाकंठी, चपलाहार, कोल्हापुरी साज, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, मंगळ सूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, बन बव शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, हार, वाघनखे, फलकमाला (कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)
बाहुभूषणे :-
दंडपट्टा, वाकी, नागफणी, बाजूबंद
मणिबंध/मनगट :-
बांगड्या, गोठ, पाटल्या, बिलवर, तोडे, कंगन, कडे, शिंदेशाही तोडे, पिछोडी, पोहोची
हाताची बोटे :-
पवित्रक, अंगठी, अंगुळबंध (चार अंगठ्यांचा), नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी.
कटिबंध/कंबर :-
करगोटा किंवा करदोटा, कंबरपट्टा, माजपट्टा, छल्ल्ला, मेखला, शृंखाला.
अलंकार धारण करण्याचा संकेतः-
मस्तकापासून कटीपर्यंत सुवर्णालंकार आणि कटीपासून पायापर्यंत चांदी, रुपे, तांब्याचे अलंकार धारण करावेत असा संकेत कटाक्षाने पाळला जात असे. राजाला मात्र पायात सुवर्णालंकार धारण करण्यास शास्त्राची अनुज्ञा होती. चांदी शीतगुणी असल्याने ती पद्मभागी धारण करावी हे याचे आयुर्वेदीय शास्त्रिय कारण आहे.
पद्मभूषणे :-
पैंजण, वाळे, घुंगरू, साखळ्या, तोरड्या
पायाचा अंगठा :-
पोतदार (पोल्हार), अनवट
पायाची बोटे:-
वळे, जोडवी, मासोळ्या, विरोली, मंजीर
अन्य अलंकारः-
बाळलेणीः –
कडे, कमर साखळी, कांडवळे (कांडोळे), कुयरी, घुंगरू, सुंकले, चुटक्या, डूल, ताईत, तांबोळे, दसांगुळे, बिंदल्या, बेडी, मनगट्या, वाकडा ताईत, वाघनखे, वाळा (एक दागिना), साखळी, हंसळी, दृष्ट मण्यांची माळ, आस्वलाच्या केसांचा ताईत.
पुरुषांचे अलंकारः-
शिरपेच, कुंडले, भिकबाळी, कंठा, कडे, सलकडे, वेढे, वाघनखे, कमरसाखळी, अंगठी, कलगी, कांडवाळे, मौलमणी, शिरस्त्राण
अलंकार संग्रहाची रीत-
हे अलंकार सहसा पितळी पेढेघाटी डब्यात, लाकडी पेट्यात, रेशमी वस्त्रात गुंडाळून, केवडा, कापूर, चंदनचूर्ण अशा सुगंधी जंतुनाशक द्रव्यांच्या सहवासात, तिजोरी, बळद, कपाट अशा ठिकाणी कडी-कुलुपात सुरक्षित ठेवले जायचे. दरवर्षी सगळ्या दागिन्यांना तसेच रेशीम, लोकर व जरीच्या महावस्त्रांना चैत्रातले ऊन दाखविले जाई. झळाळीसाठी धातूचे अलंकार शिकेकाई आणि रिठ्याच्या कोमट पाण्याने धुऊन कोरडे केले जात. मोत्यांच्या अलंकारांना मात्र भाताच्या साळीच्या कोरड्या भुश्श्यात हलक्या हाताने चोळून, घोळवून चमकवले जायचे.
समारोपः-
काय मग? कशी वाटली ही अलंकारांची नेत्रदीपक दुनिया? मजा आली ना वाचताना? यातला कुठला आयटम सिलेक्ट करताय या वर्षी तुम्ही आपल्या स्वतःसाठी, आपल्या आई, पत्नी, लेक, भगिनीसाठी? म्हणजे तशी पु. ना. गाडगीळ, किंवा चंदूकाका किंवा रांका, किंवा अष्टेकर किंवा लागू बंधू किंवा तनिष्काकडे आर्डर द्यायला हो!
गमतीचा भाग सोडू द्या.
लेखाचा समारोप करताना मात्र मला समर्थांच्या दासबोधातील ओव्या आठवतात. समर्थ म्हणतात माणसाने बाह्य शरीर शृंगारले तसे अंतरंगही सजवावे. विविध विद्या, कला, कौशल्ये, संपादन करुन गुणसंपन्न व्हावे. आपले व्यक्तिमत्व गुणांनी सजवावे, चतुर, बहुगुणी व्हावे. लोक त्याकडे अधिक आकृष्ट होतील. समाजोद्धारासाठी त्याची अधिक आवश्यकता आहे. समर्थ म्हणतात….
देहे नेटकें श्रुंघारिलें l
परी चातुर्येविण नासलें l
गुणेंविण साजिरें केलें l
बाष्कळ जैसें ll
अंतर्कळा श्रुंघारावी l
नानापरी उमजवावी l
संपदा मेळऊन भोगावी l
सावकाश ll
चातुर्ये श्रुंघारे अंतर l
वस्त्रे श्रुंघारे शरीर l
दोहिमधे कोण थोर l
बरे पाहा ll
बाह्याकार श्रुंघारिलें l
तेणे लोकांच्या हातास काये आलेंl
चातुर्ये बहुतांसि रक्षिलें l
नाना प्रकारें ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll
(दासबोध द. १४ स. ६)
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






