श्री दिवाकर बुरसे

??

☆ सवाई – एक मराठी काव्यप्रकार ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

सवाई – एक मराठी काव्यप्रकार

स्पष्टीकरण:- 

सवाई – एकवचन, सवाया – अनेकवचन.

जसे.. शेवई – एकवचन, शेवया – अनेकवचन

सवाई हा एक दुर्मिळ काव्यप्रकार समर्थ रामदासस्वामी महाराजांनी प्रथम उपयोगात आणला. सवाई ह्या काव्यप्रकाराचे जनकत्व निःसंशयपणे त्यांच्याकडेच जाते.

भक्ती व वीर रसातील समाज प्रबोधन करणाऱ्या बहुतेक सवाया स्वतः समर्थांनी, समर्थ सांप्रदायातील संत आणि भक्तांनी रचलेल्या आढळतात. इतर सांप्रदायांनी, त्यातील व संत आणि कवींनी हा प्रकार हाताळलेला दिसत नाही.

समर्थांच्या वेळी भारतभर यावनीराज्य होते. मुसलमान फकीर गावोगाव फिरून मोठमोठ्याने पदे म्हणत धर्मप्रचार करीत, धर्मांतरे करीत. भयभीत हिंदु मात्र गप्प बसून ते चुपचाप सहन करीत असत. त्या काळात धर्मजागरणासाठी समर्थांनी आपल्या सहस्रावधी शिष्यांकरवी या सवायांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हिंदुधर्माचा व राष्ट्रधर्माचा प्रसार व प्रचार केला. जनजागृती केली.

सवाया अत्यंत आवेशाने म्हणतात. तो आवेश एखाद्या सैन्याच्या अधिकाऱ्याने आपल्या सैन्याला दिलेल्या आज्ञेसारखा असतो. त्यात आत्मविश्वास, अश्वासन, प्रभुत्व, स्फूर्ती, पौरुष, वीरता, भक्ती, समर्पण इ. भाव व उदात्त जीवनमूल्ये ठासून भरलेले असतात. सवाईच्या ओवीची पहिली ओळ दोनदा म्हणायची. पुढची प्रत्येक ओळ सव्वावेळा म्हणायची. अशी सवाई म्हणण्याची विशिष्ट पद्धत आहे.

यात कल्पना अशी आहे….

राजाची (रामरायाची) राजसभा भरली आहे. सिंहासनावर राजे विराजमान झाले आहेत. सभामंडपात सिंहासनासमोरील मार्ग रिक्त ठेऊन दोन्ही अंगाला आपापल्या योग्यतेनुसार योद्धे व राजमंत्री, निमंत्रित अतिथी बसले आहेत. त्यामागे सामान्य जनता उभी आहे. आता एकेक व्यक्ती राजासमोर येणार आहे. राजासंमुख येणाऱ्या व्यक्तीच्या नावाने, त्याच्या बिरूदासह, पदव्यांसह द्वारपाल ललकारी देत आहे. येणारी व्यक्ती राजासंमुख येवून, आदराने झुकून राजाला अभिवादन करीत आपले निवेदन, म्हणणे, गा-हाणे सादर करीत आहे. त्या ललकाऱ्या, ते निवेदन म्हणजे “सवाई”. या सवाया राजराजेश्वर रामरायासमोर सादर करण्याची सज्जनगडावर प्रथा आहे.

सज्जनगडावर सायंप्रार्थनेनंतर रामरायासमोर रामदासी या सवाया उच्चरवाने, धीरगंभीर आवाजात जेव्हा म्हणतात तेव्हा उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहतात!

गडावर विशिष्ट क्रमाने सवाया सादर केल्या जातात. प्रथम गणपतीची “वंदिला गजवदन, सुखसुखाचे सदन। जेणे जाळिला मदन त्याचे अंतर धरा।” ही सवाई होते. नंतर मारुतीची, “रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती”, त्यानंतर “नाम श्रीराम सुंदर। ध्याती उमामहेश्वर।” नंतर “नयनी पाहता हनुमंत। ज्यासी वर्णिती महंत।” ही सवाई म्हटली जाते. पाचवी सवाई समर्थांची. “श्री समर्थ मुख्यप्राण। सच्चिदानंदाची खाण।जगदोद्धारासी ठाण। मांडिली जेणे।” असा क्रम असतो.

प. पू. श्रीधरस्वामीकृत सवायांचाही त्यात समावेश असतो. प्रत्येक वारासाठी असलेली सवाई त्या त्या दिवशी म्हणतात. शिवाय विठ्ठल, खंडोबा, भवानीमाता, सद्गुरु इ. देवदेवतांच्या सवाया प्रसंगोपात म्हटल्या जातात.

शेवटी “साचा उपदेश देत। भली भली मती देत।समता समबुद्धि देत। कुमतीकु हरत है।” ही सवाई म्हणून “परम सुंदर रूप शामळ। इंद्रनीळकिळ कांतिकोमळ” हा “जोहार” म्हणण्याची प्रथा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची एक सवाई किंवा प्रार्थनाही आहे. मात्र हे पद लळितात व उत्सवातील दररोजच्या कथेच्या शेवटी म्हणावयाचे असते. ती प्रार्थना अशी…

जय हो महाराज गरीबनवाज।

बंदकमीना कहना के तू साहेब तेरीही लाज। 

हो महाराज।।

मै सेवक बहु सेवा मांगू।

इतना है सब काज। हो महाराज।।

छत्रपती तुम, सेकदार सिव। इतना हमारा अर्ज। हो महाराज।।

हनुमंताच्या दोन वैशिष्ठ्यपूर्ण सवाया

सद्गुरू समर्थ रामदासस्वामीविरचित मारुतीच्या दोन सवाया पुढे देत आहे.

रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती

जो नरात वानरात भक्ति प्रेम वित्पती

दासदक्ष स्वामिपक्ष नीजकाजसारथी

वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती।।

म्हणावा जय जय राम।।१।।

वरील सवाई सर्वपरिचित असून सज्जनगडावर रोज संध्याकाळच्या आरतीच्या वेळी म्हटली जाते.

ही खालील अप्रचलित सवाई संत वाङमयच्या ‘समर्थांचे समग्र वाङमय खंड ६ मधे आढळली.

जब हनुमंत जनकदुहिता शुद्ध लेनेकू गभार दौर दौर आये है।

तब कंठ गुरगुरगुरीत नेत्र गरगरगरीत रोम थरथरथरीत पुच्छ झारे।

तब लंका घरघरघरीत बनमो दरदरदरीत सीता शोक हरत झरझरझरीत बन उफारे। 

तब कंठ कुचकुचकुचीत ईंद्रजीत चकचकचकीत रावण थकथकथकीत

कर नगर ज्यार ज्यार मखमखमखीत दास लियो जय तु राम मिले तब कपि भुःभुःकारे ।।

 म्हणावा जय जय राम।।२।।

-समर्थ रामदासस्वामी 

।।जय जय रघुवीर समर्थ।।

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

खूप छान!सवायाबद्लची माहिती माझ्याकरिता नवीन.