वाचताना वेचलेले
☆ श्रीमंत आणि भिकारी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆
☆
एका मोठ्या शहरात, एका व्यस्त रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसायचा. चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत एक वेगळी चमक होती. रोज येणाऱ्या- जाणाऱ्यांकडे हात पसरून, काहीतरी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच असायचा.
एके दिवशी, तिथून एक अतिशय श्रीमंत, सुसंस्कृत आणि प्रभावशाली माणूस गाडीमधून जात होता. त्याचं लक्ष त्या भिकाऱ्याकडे गेलं. काहीतरी वेगळं वाटलं त्याला. गाडी थांबवून तो थेट त्या भिकाऱ्याजवळ गेला.
“काय रे बाबा, ” तो म्हणाला, “तू चांगला सशक्त आणि तंदुरुस्त दिसतोस, मग भीक का मागतोस?”
भिकारी थोडा संकोचून म्हणाला, “साहेब, हातात कसलीच संधी नाही. कुणी काम देत नाही. नशीब फाटलेलं आहे. जर तुम्ही मला एखादी नोकरी दिलीत, तर मी ही भीक मागणं कायमचं सोडून देईन. “
त्या श्रीमंत माणसाने हसत म्हटलं, “मी तुला नोकरी नाही देणार… पण त्यापेक्षाही जास्त काहीतरी देणार आहे. “
भिकारी गोंधळला, डोळे विस्फारले. “काय म्हणालात?”
“माझ्याकडे एक तांदुळाची गिरणी आहे. मी तुला गिरणीचा माल विकायला देईन. बाजारात योग्य दर मिळव. विक्रीतून होणाऱ्या नफ्याचा ९०% तुझा, फक्त १०% माझा. बघ जमतं का तुला?”
भिकारी गहिवरला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या नशिबात असा एखादा दिवसही लिहिलेला होता.
“साहेब, तुम्ही खरंच माझ्यासाठी देवदूत आहात. तुमच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही!”
त्या दिवशीपासून सगळं बदललं.
भिकारी कामाला लागला. सकाळपासून रात्रीपर्यंत फिरायचा. स्वस्तात चांगला तांदूळ विकायचा. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसायला लागला. व्यापार वाढत गेला. काही महिन्यांत तो एक यशस्वी व्यापारी झाला.
पण… एक दिवस त्याच्या मनात एक विचार आला.
“हे सगळं मी केलं… रात्रंदिवस मेहनत घेतली… तो श्रीमंत माणूस कुठे दिसतोय? केवळ संधी दिली, त्यावर एवढा वाटा का? त्याला १०% का द्यायचं?”
हळूहळू त्याच्या मनात ते १०% देखील खुपायला लागले. अहंकार डोकं वर काढू लागला.
आणि त्या दिवशी, ठरल्याप्रमाणे श्रीमंत माणूस नफ्याचा १०% हिस्सा घ्यायला आला. शांत चेहऱ्यानं विचारलं, “कसा चाललाय व्यापार? माझा हिस्सा तयार आहे का?”
तेव्हा तो माजी भिकारी चेहरा पाडून म्हणाला, “साहेब, अजून हिशोब नीट झालेला नाही. काही कर्ज बाकी आहे. माझं खरंच नुकसान झालंय…”
श्रीमंत माणूस शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला, “माझ्या माहितीनुसार तुला चांगलाच नफा झालाय. मी फक्त १०% मागतोय. वाटा ठरलेला आहे. आठवतंय का?”
भिकारी थोडा चिडून म्हणाला, “साहेब, मेहनत मी केलीय, धंदा मी उभा केलाय. तुम्ही फक्त सुरुवात केलीत. आता त्या नफ्यावर तुमचा काही हक्क नाही. “
त्या क्षणी, तो श्रीमंत माणूस फक्त एक स्मित करत निघून गेला.
—
ही गोष्ट फक्त त्या श्रीमंताची आणि भिकाऱ्याची नाही… ही आहे आपली आणि भगवंताची.
भगवंत — आपल्याला जन्म देणारा, शरीर देणारा, वाणी, बुद्धी, जाणीव देणारा — आपल्याला जगायला ‘संधी’ देतो. हे जीवन ही त्याचीच ‘गिरणी’ आहे. आपण आपापल्या परीने मेहनत घेतो, प्रगती करतो.
आणि तरीही… जेव्हा तो आपल्याकडे फक्त १०% वेळ, १०% श्रद्धा, १०% उत्पन्न सत्कर्मासाठी मागतो —
तेव्हा आपलं मन देखील म्हणतं, “सगळं काही माझ्यामुळेच झालंय… देवाचा यात काही वाटा नाही!”
हेच तर आपलं अपयश आहे.
म्हणून,
चोवीस तासांपैकी दिवसाचे फक्त १०% भगवंताच्या स्मरणात घालवा.
आपल्या कमाईतून फक्त १०% भाग सत्कर्मासाठी वापरा.
आणि कधीही विसरू नका — संधी दिल्याशिवाय प्रगती शक्यच नव्हती.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



