शालिनी जोशी
विविधा
☆ मेघदूत -आषाढस्य प्रथम दिवसे ☆ शालिनी जोशी ☆
संस्कृत काव्यात अजरामर झालेले, कालिदासाच्या उतुंग प्रतिभेतून निर्माण झालेले विरहगीत म्हणजे मेघदूत. नावावरूनच लक्षात येतो की येथे कवीने मेघालाच दूत बनवले आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ हेच खरे म्हणूनच समर्थ रामदास कवीना कवीश्वर म्हणजे ‘शब्दसृष्टीचे ईश्वर’ म्हणतात. काल्पनिक कथेवर आधारित हे काव्य अनेकांना भुरळ पाडणारे खंड काव्य झाले.
कालिदास एका सुशिक्षित शास्त्रनिपुण राजकन्येचा पती होता. अगदी साधाभोळा होता. तेव्हा पत्नीने त्याला ज्ञान प्राप्तीसाठी पाठवले. तो परत आल्यावर तिने विचारले, ‘अस्ति कश्चित् वाग् विशेष:? ’ आपल्या वाणीत काही विशेष आहे? तेव्हा बुद्धिमान कालिदासांनी प्रश्नाच्या प्रत्येक शब्दाने सुरुवात होणारे काव्य रचले. अस्ति- कुमार संभव, कश्चित्- मेघदूत आणि वाग् विशेष- रघुवंश. मेघदूत हे अस्तिने सुरुवात होणारे १११ ओव्यांचे अप्रतिम विरहगीत, ज्याच्या दुसऱ्या श्लोकातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दयोजनेमुळे आषाढ प्रतिपदा हा दिवस ‘कालिदास दिवस’ म्हणून ओळखला जातो. असा हा एकमेव कवी.
मेघदूत ही हेमामाली आणि विशालक्षी या यक्ष दांपत्याची कथा आहे. यक्ष हा कुबेराचा सेवक. अलका नगरी ही कुबेराची राजधानी. कुबेराला पूजेसाठी फुले आणून देणे हे यक्षाचे काम. पण एकदा यक्षाच्या हातून कळी तोडली जाते. या चुकीची शिक्षा म्हणून एक वर्ष त्याला पत्नी विरह सहन करावा लागतो. खरं तर कळी तुटणे ही आपल्यासाठी शुल्लक गोष्ट. पण पत्नी विरहाच्या शिक्षेतून, कळीला झाडापासून तोडण्यामुळे होणाऱ्या वेदना सांगायच्या आहेत. विरहाला विरहाची शिक्षा ही कालिदासाची प्रतिमा. ही शिक्षा भोगण्यासाठी तो रामगिरीवर फिरत होता.
कश्चित् कांता विरह गुरूणा स्वाधीकारान् प्रमतः
शापेनास्तंगतमहिमा वर्ष भोग्येषा भर्तु:
यक्षश्चक्रे जनकतनयास्नान पुण्योदकेषु
स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु १
कोणी एक यक्ष शापाने, जो सहन करण्यासाठी कठिण, एक वर्ष पत्नीपासून दूर जाण्यासाठी रामगिरीवरती झोपडी करून राहू लागला. तेथे वृक्षांची घनदाट सावली होती. जनककन्यासीतीने स्थान केल्याने जलाशयतील पाणी पवित्र झाले होते. पण शापाने यक्षाचे सर्व अधिकार नष्ट झाले. (रामगिरी म्हणजे नागपूर जवळचे सध्याचे रामटेक) अशा बाह्य सौंदर्याने अंतरंगातील वेदना कशा कमी होणार?
अशा दुःखाच्या प्रसंगी त्याला आकाशातील मेघाचा आधार वाटतो. मेघासारख्या निर्जीव घटकाला संदेशवाहक बनवण्याची कल्पना कालिदासाची. त्यातून रसपूर्ण, भावकाव्य मेघदूत तयार झाले. प्रेम वेड्या माणसाला चेतन अचेतन भेद कुठून असणार? . आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुम्
वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयं ददर्श
काळा मोठा ढग हत्तीप्रमाणे पर्वत शिखरावर धडका मारत होता. आलींगन देत होता. यावरून त्या ढगाच्या ताकदीची त्याला कल्पना आली. तो दूत म्हणून योग्य वाटला.
आषाढाची सुरुवात त्यामुळे ढग सजल आहे, दयाळू आहे. यक्षात इतक्यात पत्नीभेट शक्य नाही म्हणून त्याच्या जीवाची तगमग. तिला निरोप देऊन आधार देण्यासाठी तो ढग.
त्याला जाण्याचा मार्ग, वाटेत येणाऱ्या अडचणी, आपले घर या सर्वांचे व स्थानांचे मोठे रसभरीत वर्णन केले आहे. वाटेल तू काय कर हे ही सांगितले आहे. वेली वरच्या कोमेजलेल्या फुलासारखी माझी पत्नी, भाऊ होऊन तिला आधार दे. कमल तंत्तूची शिदोरी घेतलेले राजाहंस तुला सोबत करतील. पर्वत शिखरावरचे ताजे पाणी तू पिऊन तहान भागव. वेळूच्या वनात रेंगाळू नको. इंद्रधनुष्य, मोराचे नृत्य, अमृत गंध तुला सुखावेल. त्यात गुंतू नको. विदिशा, उज्जैनी, अवंती मार्गे कैलास, मानस, गंगादर्शन मग अलका नगरी. तेथे नगरीच्या कुरळ्या केसांवर मोत्याच्या माळेप्रमाणे शोभून दिसशील. असे वर्णन करणारे मेघदूत हे प्रेमकाव्य, विरहगीत त्याचबरोबर उपमा, रसिकता, विज्ञान, निसर्ग, पक्षी झाडे इत्यादी सर्व वर्णन सौंदर्याने परिपूर्ण आहे. मुळात पाच ओळींची कथा १११ श्लोकात रंगवली आहे.
यातून माणसाची निसर्गाबरोबरची जवळीक स्पष्ट होते. तोच मित्र, देव होतो. त्याच्याबरोबर सुखसंवाद होतो. कारण तो ‘अरेला कारे’ करत नाही. ज्ञानोबांच्या देवाच्या विरहात कावळा, सावरकरांना मातृभूच्या विरहात सागर, विवाहितेला माहेरच्या विरहात वारा साहाय्य होतो. त्यातून भावपूर्ण काव्यनिर्मिती होते. (पुण्यातील डॉक्टर भावे यांनी रामटेकहून निघून हेलिकॉप्टरने अलका नगरीपर्यंत प्रवास केला.) यावरून कालिदासाच्या अचूक भौगोलिक ज्ञानाची कल्पना येते. हे काव्य चौथ्या ते सहाव्या शतकातील असावे. धन्य तो कालिदास आणि मेघदूत!
© शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





