श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

“सा न कामयमाना निरोधरूपत्वात ॥ ७ ॥”

अर्थ : ती (भक्ती) कामनायुक्त नाही; कारण ती निरोधस्वरूपा आहे.

विवरण –  आपण भक्ति सूत्रांच्या दुसऱ्या भागात प्रवेश करीत आहोत. मागील भागात आपण भक्तीची व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. 

इच्छा नसलेला मनुष्य शोधूनही सापडणार नाही  आणि जर तो असलाच तर तो मृत असेल, नाही का ? सर्वसाधारण मनुष्य जेव्हा भक्तिमार्गात येतो, तेव्हा देवाने आपले अमुक अमुक काम करावे अशी त्याची सुप्त इच्छा असते. अशी इच्छा मनुष्य म्हणून असणे वावगे नक्कीच नाही, पण जर तो साधक असेल तर त्याच्या इच्छेत बदल झालेला असावा. भगवंताची भेट होणे ही यातील सर्वात आदर्श आणि उच्चकोटीचि इच्छा म्हणता येईल….! साधनेच्या अंतिम टप्प्यात तर ही इच्छा सुद्धा मरून जाते कारण साधकाच्या लक्षात येते की भगवंत आणि मी दोन नसून एकच आहोत. असो.

भक्ती ही प्रेमस्वरूप, अमृतस्वरूप, सिद्धिस्वरूप आहे, असे या पूर्वीच्या सहा सूत्रातून स्पष्ट केल्यानंतर पुन्हा ती कामनायुक्त नाही हे सांगण्याचे प्रयोजन काय ? याचे विवेचन आपण पाहू. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात देवाला म्हणतात,

“माझे मज कळों येती अवगुण । 

काय करूं मन अनावर ॥१॥

आतां आड उभा राहें नारायणा ।

दयासिंधुपणा साच करीं ॥२॥ 

वाचा वदे परी करणें कठीण ।

इंद्रियां अधीन जालों देवा ॥३॥ 

तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । 

न धरीं उदास मायबापा ॥४॥”

साधकाला साधन करू लागला की त्याला त्याच्यातले अवगुण तर समजू लागतात पण त्यांच्यावर मात  करता येतेच असे नाही. मनुष्याच्या वासना, इच्छा, आकांक्षा या अगदी खोलवर मुळं रुजलेल्या झाडासारख्या असतात. त्यांच्या मुळावर घाव घातला तरी त्यांना तोडणं काय सोपी गोष्ट आहे? ते झाडं तोडलं तर ते नव्यानं तरारून येऊ शकतं,  नव्हे ते येतच. साधकाला स्वतःला काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ हे सारे अवगुण जाणवत असतात. आपल्या वागण्यात ते नसावेत, असंही त्याला प्रामाणिकपणे वाटत असतं, पण मनाचा निश्चय वेळ येताच टिकत नाही. पूर्वीच्याच चालीप्रमाणे मनुष्य वागून मोकळे होतो आणि नंतर त्याला वाईट वाटतं रहात. 

श्रीमहाराजांना एकानं विचारलं,  माणसातला सर्वात मोठा गुण कोणता ? श्रीमहाराज म्हणाले, आपले अवगुण ओळखता येणं, हाच सर्वात मोठा गुण आहे! तेव्हा हा गुणही साधनेनंच आला आहे. हे भगवंता, मी वाईट आहे, पापी आहे, हे जाणवत आहे. पण काय करू. मन अनावर आहे. मनाला आवर घालता येत नाही. प्रसंग उद्भवताच हे मन अनावर होऊन जे बोलू नये ते बोलून जाते, करू नये ते करून जाते. माझी वाचा तुझे नाम घेते खरी, तोंडाने मी उच्च तत्त्वज्ञान बोलतो खरा, पण त्यानुसार जगणं, वागणं मला साधत नाही. मी तुझा नव्हे तर इंद्रियांचा दास आहे, हेच मला पदोपदी उमगतं. तरीही कसा का असेना, मी स्वतला तुझा दास म्हणवतोच आहे ना? मग हे मायबापा तू मला दूर करू नकोस. हे नारायणा, तूच आता आड उभा राहा आणि दयासिंधूपणा सार्थ कर. इथे जो आड शब्द आहे तो कशासाठी आला आहे? या आड शब्दाला दोन छटा आहेत. आपण एखाद्याच्या आड लपतो तेव्हा आड शब्द मागे या अर्थानं येतो आणि आपल्यात आणि एखाद्या गोष्टीत आडपडदा येतो तेव्हा आड हा मध्ये येतो! इथे ‘नारायणा’ला आड उभं राहायला सांगितलं आहे. म्हणजे या दुनियेच्या प्रत्येक गोष्टीच्या आड तू लपला आहेस, याची जाणीव मला करून दे. ते आकलन मला शक्य नसेल तर माझ्या मनावर प्रभाव पाडणाऱ्या, माझ्या मनाला अधिकच अनावर करून इंद्रियांच्या गळानं मला खेचणाऱ्या दुनियेच्या आणि माझ्या मध्ये तू उभा राहा, अशी ही विनवणी आहे. ही विनवणी कुणाला आहे? ती ‘नारायणा’ला आहे. नररूपात आलेल्या परमात्म्याला अर्थात श्रीसद्गुरूंना ही विनवणी आहे. कारण दयासिंधु हे विशेषण त्यांनाच तर लागू आहे. शब्द फार तोकडे असतात. दयासिंधु या चार अक्षरांतूनही त्यांच्या दयेची कल्पनाही येत नाही. तेव्हा महाराज, या दुनियेत तुम्हीच आहात, हे जाणण्याची दिव्य शक्ती तरी द्या नाही तर या दुनियेचा प्रभाव माझ्यावर पडू नये यासाठी तिच्या व माझ्यामध्ये उभे राहा!

{संदर्भ :- अभंग क्र. 1175, सार्थ तुकाराम गाथा (धार्मिक प्रकाशन संस्था)}

मनुष्य भक्ति करू लागला की त्याला अनेक प्रश्न पडू लागतात. सामान्य मनुष्याची एक वेगळीच खोड असते. भौतिक जगतात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी उशीर झाला तर तो धीर धरतो, पण अध्यात्मात मात्र त्याला लगेच फळ  हवे असते. एका हातात नाम आणि दुसऱ्या हातात मुक्ति……!

भौतिक जगतातील कायदे, आध्यात्मिक जगतात अधिक कठोरपणे आचरणात आणले जातात असे आपल्या लक्षात येईल. एखादा मुलगा नववीत आहे, तो त्यावर्षी अनुत्तीर्ण झाला तर त्याच इयत्तेत राहतो, पण अध्यात्माच्या शाळेत मनुष्य नववीत अनुत्तीर्ण तर त्याला पुन्हा बालवाडीत  प्रवेश घ्यावा लागतो…..! त्यासाठी समर्थांनी अखंड सावधान असावे असे सांगितले आहे.

मनुष्याच्या मनात सतत विचार येत जात असतात. ते कधी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक असतात. गंमत अशी आहे की मनांत विचार येऊ नयेत यासाठी जेव्हा मनुष्य प्रयत्न करतो, अर्थात नामस्मरण करू लागतो, ध्यान लागावं म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा हे विचार हटकून येत असतात, त्यांना थोपवणे शक्य होत नाही…..! मनुष्य त्या विचारांचेच चिंतन करू लागला तर विचारांचा प्रवाह कमी न होता वाढत जातो…..! आता यातून बाहेर कसे पडावे असा प्रश्न साधकाला पडतो. म्हणून वरील अभंगात संत तुकाराम महाराज प्रार्थना करतात की भगवंता तूच या सर्वांच्या आड ये आणि मला पुढील रस्ता दाखव.

साधना करून मनुष्याची बुद्धि शुद्ध होऊ लागते. त्याच्या मेंदूतून सात्विक विचार प्रगट होऊ लागतात. मनातील विचार ( बरेवाईट कोणतेही असोत) थोपविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. एक म्हणजे त्यांच्यावर बळजबरी करून बाहेर काढणे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे अस्तित्व नष्ट करणे…..! थोडक्यात त्यांचा निरोध करणे… याचा विचार पुढील सूत्रात पाहू.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

!!! नारद महाराज की जय !!!

– क्रमशः लेख क्र. ७ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
विवेक मंडलिक
0

खूप छान विवेचन केले आहे जय जय रघुवीर समर्थ 🙏