श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १९ आणि २० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

॥ श्री नारद उवाच ॥

नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति || १९ ||”

अस्त्येवमेवम् || २० ||

अर्थ: नारदाचे मत, आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला (भगवंताला) अर्पण करणे आणि त्या भगवत्स्वरूपाचे थोडेही विस्मरण झाले असता परमव्याकुल होणे हीच भक्ती आणि हीच भक्ति आहे असे नारद मुनी पुढील सूत्रात सांगतात. ( हा त्यांचा अति आत्मविश्वास नाही तर तो त्यांचा अधिकार आहे.)

विवेचन: महर्षी व्यास, गर्ग, शांडिल्य यांचे मत सांगितल्यावर देवर्षी नारद आपलेही मत प्रदर्शित करीत आहेत. येथे नारद स्वतःच एक सूत्रकार आहेत. सूत्रग्रंथात अनेकांची नाना मते सांगितल्यानंतर स्वतः सूत्रकार आपलेही मत सांगत असतो, असे अनेक सूत्र ग्रंथावरून दिसून येते. नारदही येथे आपले मत या सूत्राच्या द्वारा प्रदर्शित करीत आहेत.

जन्माला आलेला मनुष्य (जीव) कर्म केल्याशिवाय जिवंत राहूच शकणार नाही. गीतेत भगवंत देखील म्हणतात की मी सेकंड भर कर्म केलं नाही तर पृथ्वीवर हाहाकार होईल…! ( उदा. समजा सृष्टीतील वारा एक मिनिट वाहायचा थांबला तर काय होऊ शकेल याची कल्पना करून पहावे?) थोडक्यात मनुष्याला कर्म केल्याशिवाय रहाणे शक्य नाही आणि दुसरे म्हणजे निव्वळ कर्म करण्याचाच अधिकार त्याला प्राप्त आहे, त्यापासून निर्माण होणाऱ्या कर्मफळावर त्याचा अधिकार नाही, नियंत्रण नाही. पंचवीस लोकांनी प्रत्येकी दहा आंबे खाल्ले, तर  त्या आंब्यांचा प्रत्येकावर होणारा परिणाम हा स्वाभाविकपणे वेगवेगळा असेल….!

अहो, वेगवेगळ्या बढाया मारणारा मनुष्य आपल्या स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचे शरीर तो स्वतः चालवू शकत नाही. आणि कर्मावर अधिकार हवा अशी अपेक्षा करीत असतो, हे नवल नव्हे काय?

श्री तुकाराम महाराज सांगतात,

“चालें हे शरीर कोंणाचिये सत्ते। कोण बोलवितें हरी विण॥१॥

देखली ऐकवी एक नारायण।तयाचें भजन चुकों नको॥२॥

माणसाची देव चालवी अहंता। मीची एक कर्ता म्हणोनिया ॥३॥

वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता। राहिली अहंता मग कोंठे ॥४॥

तुका म्हणे विठोे भरला सबाह्य।उणें काय आहे चराचरी॥५॥”

(अभंग क्रमांक ३०६६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

थोडक्यात, भगवंताच्या कृपेने, त्याच्या सत्तेनेच प्रत्येक मनुष्य कर्म करीत असतो. त्याच्याशिवाय मनुष्य काहीही करू शकणार नाही.  म्हणून नारद मुनी आपल्याला सांगतात की प्रत्येक कर्म त्या भगवतांच्या चरणी अर्पण करावे.

” जे खासी होमासी देसी, जे जे आचरिसी तप|

जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण || “

(गीताई ०९.२७)

मनुष्याने आपली सर्व कर्मे भगवंताला समर्पण करावीत, इथे नारद मुनी थांबत नाहीत, तर ते पुढे सांगतात की अतिव्याकुळ होऊन मनुष्याने समर्पण वृत्ती अंगिकारावी. त्याचा क्षणभर विसर सुद्धा होऊ नये. सतत त्याचेच स्मरण असावे. गर्भवती स्त्री  वावरताना सतत तिच्या गर्भाचा विचार करीत असते. आपल्या गर्भाला बिल्कुल त्रास होऊ नये असा तिचा प्रयत्न असतो. तिच्या मनात कायम गर्भाचा विचार असतो. त्या गर्भाच्या निकोप वाढीसाठी ती अनेक बंधने, नियम आनंदाने पाळते…..! त्यासाठी ती कितीही काकुळतीला जाऊ शकते. साधकाने अशा प्रकारे भक्ति करून आपले हित साधावे असे नारद मुनी सुचवीत आहेत.

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात..

” हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा “

भक्ताला जसा भगवद्वियोग सहन होत नाही तसा विसरही खपत नाही. विस्मृती हाही एक मानसिक वियोगाचाच प्रकार आहे असे म्हटले तर काही बाधक नाही. तात्पर्य, मानापमान, लाभ, हानि, सुख-दुःख इत्यादिकांची पर्वा न करिता कर्तृत्वाभिमान व फलेच्छा टाकून, शरीर व शरीरसंबंधी असलेल्या अहंता, ममतेचा त्याग करून एकमात्र भगवंताला परमप्रियतम मानून त्यासच परमआश्रय, परमगती, परमसुहृद समजून अनन्य भावाने अत्यंत श्रद्धायुक्त होऊन प्रेमपूर्वक तैलधारेप्रमाणे त्याच्याच नामगुण प्रभाव व स्वरूपाचे चिंतन करीत परमानंदात निमग्न राहाणे व केवल त्या प्रियतमाकरिता त्याच्या इच्छेनुसार त्याच्याच करिता निःस्वार्थ भावाने समस्त दैहिक, वाचिक, मानसिक कर्माचे आचरण करीत राहाणे, काही प्रतिकूल निमित्ताने क्षणभरही त्याचे विस्मरण होईल तर पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीपेक्षाही अधिक व्याकुलता उत्पन्न होणे हीच भक्ती असे नारद महर्षी आपले स्वतःचे मत सांगतात.

असा भक्त देवाला म्हणतो, “तू जसा ठेवशील, तसा राहीन, पण तुझा बनून राहीन…”

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्रे क्र. १९/२०

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted