श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

फलरूपत्वात् ॥ २६ ॥

अर्थ : पराभक्ती स्वतःच फलस्वरूप असल्याने ती कर्म ज्ञान,  योग यापेक्षा श्रेष्ठ आहे.

विवेचन: मागील सूत्रात भक्ती ही कर्म-ज्ञान-योग यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले. कर्म-ज्ञान-योग इत्यादि साधनांना भक्तीची अपेक्षा आहे,  पण भक्ती ही स्वतः निरपेक्ष आहे. सहसा मनुष्याची विषय सेवनाकडे प्रवृत्ती असते. ती दूर करून मल म्हणजे पापवासना या दोषातून मुक्त होण्याकरिता वेदाने विहित कर्माचे विधान सांगितले आहे.

भक्ताचे चित्त सदैव भगवंताच्या ध्यानात,  चिंतनातच असते. ज्याची सर्व कायिक,  वाचिक,  मानसिक कर्मे भगवंताप्रीत्यर्थच होतात त्याला पुन्हा वेगळे विहित कर्म करण्याची आवश्यकताच काय?

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥०१॥

विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे जन धन माता पिता ॥०२॥

निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहींच सांकडें पडों नेदी ॥०३॥

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साह्य । घातलिया भय नर्का जाणें ॥०४॥

(संदर्भ: अभंग क्रमांक ७४८,  सार्थ तुकाराम गाथा,  धार्मिक प्रकाशन संस्था)

जो अखंड नामस्मरणात आहे,  त्याच्या प्रत्येक क्षणावर नामाची सत्ता काम करीत असते,  तो श्वास घेताना नाम घेतो,  श्वास सोडताना नाम घेतो,  नव्हे श्वास म्हणून नाम घेत आणि नामच बाहेर सोडत असतो….! अशी स्थिती अन्य मार्गांमध्ये येईलच असे नाही,  पण भक्तिमार्गात मात्र खात्रीनं येऊ शकते,  असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत. संत तुकाराम महाराज आपल्याला वरील अभंगात त्याची साक्ष देतात.

भक्तीचे अनेक मार्ग आहेत. आपण उदा. म्हणून नामस्मरण भक्ति पाहू. नाम घेणारा मनुष्य सुरुवातीला नाम घेऊ लागतो,  त्यावेळी तो निव्वळ नाम घेत असतो. जसजशी त्याच्या मनात नामाची व्याप्ति आणि खोली वाढू लागते,  तसतसे त्याचे स्मरण दृढ होऊ लागते. एकवेळ अशी येते की नाम सुद्धा सुरू असते आणि त्याचवेळी स्मरणही असते. तो साधक ज्याचे नाम घेत असतो,  त्या आराध्याचे,  सद्गुरुंचे सान्निध्य त्याला जाणवू लागते. याची परमोच्च सीमा अशी असते की सर्व सदगुरूच सर्व करत आहे आणि हा निवांत बसला आहे… (असा साधक देहाने सर्व कर्म करीत असतो,  पण त्याच्या चित्तात मात्र अतिव शांतता,  स्थिरता असते…!)

संत कबीर एका ठिकाणी म्हणतात,

“माला जपूँ ना कर जपूँ,  मुख से कहूँ ना राम राम हमारा हमें जपे है,  हम पायो विश्राम ।”

…. आता मला सांगा,  ज्याचा जप स्वतः भगवंत करतो,  (विचार केला तर तोच सर्व काही करत असतो,  त्याची जाणीव साधना केल्याने होत असते…..) त्याला कसली ददात?

इथे भक्ति हेच साधन आणि साध्य असते. सर्व संत म्हणून भगवंताकडे मागणी करतात की जन्मोजन्मी आम्हाला गर्भवास दे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे. कारण तुझी भक्ति करताना होणारा आनंद तुला सुद्धा कळणार नाही. मुक्ति दिलीस तर तुझी भक्ति करता येणार नाही देवा!!

हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ती आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥

तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥४॥

(संदर्भ: अभंग क्रमांक २२२२,  सार्थ तुकाराम गाथा,  धार्मिक प्रकाशन संस्था)

भक्ती ही केवळ आनंदाचे साधन नसून ती स्वतः आनंदरूपच आहे; म्हणजे साध्यस्वरूप,  पुरुषार्थस्वरूप म्हणून फलस्वरूप आहे. भक्ति म्हणजे बीज,  कोंब,  रोपटे,  झाड,  फांद्या,  पान,  फुल,  फळ आहे….! सर्व एकच आहे. भक्तीचे बीज रोवले की यथावकाश भक्तीची फळे खात्रीने मिळणार….!

संत एकनाथ महाराज सांगतात,

भावें करितां माझी भक्ती । भाविकां कोण पां अप्राप्ती । विवेकवैराग्यज्ञानसंपत्ती । पायां लागती मद्भक्तांच्या ॥ ४०४ ॥

माझे निजभजनें तुटे भेद । स्वयेंचि प्रकटे अभेदबोध । तेणें वोसंडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ४०५ ॥

(संदर्भ एकनाथी भागवत अध्याय २६)

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. – २६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
ज्योती कुळकर्णी अकोला
0

खूप छान अर्थ उलगडून सांगितला.