श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्तिसूत्र ३९ – –
महत्संगस्तुदुर्लभोऽगम्योऽमोघश्च ॥ ३९ ॥
अर्थ : संत महापुरुषांची संगत दुर्लभ, अगम्य व अमोघ – (कधीही व्यर्थ न जाणारी) आहे.
विवरण : मागील सूत्रात महात्म्याची कृपा हे भक्तीप्राप्तीचे अंतरंग साधन आहे असे सांगितले पण तो महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा आहे असे ते म्हणतात. एका सुभाषितकाराने म्हटले आहे, ‘प्रत्येक पर्वतावर माणिक म्हणजे रत्न सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मौक्तिक (मोती) नसतो. प्रत्येक वनात उत्तम चंदनवृक्ष असतो असे नाही, त्याप्रमाणे सर्वत्र साधू दिसतात, सापडतात असे नाही. ‘ बहुतेक संसारी जीव अनादि अज्ञानमूलक संस्काराने शुभाशुभ पापपुण्याचे फल भोगीत असतात. त्यातही बहुतेकांची ऐहिक पारत्रिक विषयभोगातच अधिक प्रवृत्ती असते. मनबुद्ध्यादिकाना तेच संस्कार असतात. म्हणून त्यांची धाव विषयापावेतोच जाते, विषयसंपादन हाच पुरुषार्थ होऊन बसतो. अशा बहिर्मुखतेमुळे हृदयस्थ सच्चितानंद भगवंताचे यथार्थ ज्ञानही नसते. म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती होत नाही. एखादाच सत्त्वसंपन्न विचारी पुरुष पूर्वसुकृताने परमार्थमार्गात प्रविष्ट होत असतो.
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसर्याच्या संगतीमधे रहावे लागणे अनिवार्य आहे. संगत ही परमार्थाला मारकही असू शकते किंवा पोषकही असू शकते. ऐहिकतेकडे, सुखासीनतेकडे मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. दुर्गुण मनुष्य सहज उचलतो. पण सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक बाणवावे लागतात. मद्यप्राशन कसे करावे? हे शिकवण्याची शाळा कुठेही नाही, परंतु आज मद्यार्क निर्मिती हा सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा उद्योग आहे आणि तोही महाराष्ट्रासारख्या सतांच्या भूमीत, हा दैवदुर्विलास नव्हे काय?
श्रीसमर्थ मनोबोधात संगती कशी असावी याचे वर्णन करतात.
जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येउनि लागे ॥
तये संगतीची जनीं कोण गोडी ।
जिये संगतीने मती राम सोडी ||४५||
ज्या संगतीमुळे मनुष्य रामापासून दूर जातो अशा संगतीची मनुष्याला स्वाभाविक ओढ असते. पण त्यामुळे मनाचे समाधान भंग पावते. मनुष्याचा जन्म होताच त्याची देहबुद्धि जागृत होते. देहबुद्धि नष्ट होणे हे परमार्थ प्राप्तीसाठी अत्यावश्यक असते. एक सुभाषित आहे.
सङ्ग: सर्वात्मना त्याज्य: स चेद्धातुं न शक्यते ।
स सद्भि: सह कर्तव्य: सन्त: सङ्गस्य भेषजम् ॥
सुभाषितकार म्हणतात की मुख्य म्हणजे संगत कुणाचीच करू नये. पण जर करायचीच असेल तर सज्जनांचीच संगत करावी. समाजात राहून पूर्ण नि:संग होणे कुणाही मनुष्यास शक्य नाही. समाजात सज्जन-दुर्जन, चांगली, धूर्त, लबाड, वाईट सर्वच प्रकारची माणसे असतात. या सर्वांची संगत पूर्णपणे टाळणे शक्य नाही, तरीही कोणाच्या संगतीत रहावे व कोणाच्या संगतीत राहू नये य़ाचे स्वातंत्र्य मनुष्याकडे नक्कीच आहे. तेव्हा मनुष्याने विवेकाने नास्तिक, लोभी, दुर्जन यांची संगत टाळावी व संतांचीच संगत धरावी.
संगतीचा विलक्षण परिणाम मनुष्यावर होत असतो. मनुष्याच्या हातात कोणी काठी दिली तर तो काठी कुणाला मारण्याचा प्रयत्न करेल पण काठीऐवजी त्या मनुष्याच्या हातात आपण जपमाळ दिली तर मात्र तो त्या माळेने नामजप करण्याची शक्यता जास्त. काठीच्या संगतीचा परिणाम वेगळा आणि जपमाळेच्या संग लाभला तर मनुष्याच्या वागण्यात किती फरक पडतो आणि जर साक्षात भगवंताचा म्हणजे त्याच्या नामाचा संग लाभला तर त्या मनुष्यात किती फरक पडेल. संतसंगतीमुळे मनुष्याच्या जीवनाचे सार्थक होते.
चोखंदळ वाचकांनी खालील मनाच्या श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.
मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।
परी अंतरी पाहिजे यत्न केले॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।
धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥
*
मना सर्वही संग सोडुनि द्यावा।
अती आदरे सज्जनाचा धरावा॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥
*
मना संग हा सर्वसंगास तोडी।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥
मना संग हा साधका शीघ्र सोडी।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥
*
एकनाथी भागवतात कृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे, त्यात भगवंत म्हणतात,
“ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति कां न करिती ।
देवो म्हणे भाग्येंवीण माझी भक्ति । न घडे निश्चितीं उद्धवा ॥
कोटि जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गांठीं असेल आइती ।
तैं जोडे माझ्या संतांची संगती । सत्संगें भक्ती उल्हासे॥”
(संदर्भ:- एकनाथी भागवत अध्याय ११, १५४९, ५०)
पूर्वसुकृत उदयास आले तरच संतसंग लाभतो. ध्यानीमनी राम असेल तर आपल्या कामात सुध्दा राम दिसतो. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या पायाला कान लावला तर त्यातून रामनाम ऐकायला येई असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते.
माऊली म्हणतात की माझे अनंत जन्माचे पुण्य फळा आले म्हणून माझ्या मुखी नाम आले. साधकाने नाम घेताना हा भाव नित्य ध्यानी ठेवला तर नामाची गोडी खात्रीने चाखायला मिळेल असे वाटते.
लौकिक उदाहरण द्यावयाचे तर विजेचा प्रखर दाब जेथे साठविला गेला आहे त्या विद्युत घटाशी दुरून जरी स्पर्श झाला तरी ती वीज सर्वांगात क्षणात प्रविष्ट होते, तसे संत हे ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेम यानी कायावाचामनाने संपूर्ण व्यापून गेलेले असतात. तसेच सर्वानी याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा व आपले जीवन भगवन्मय बनवावे हीच त्याची धारणा व खटपट असते. याकरिता त्याच्या संगतीत कोणी कसा जरी आला तरी त्याचे गुण दोष याति न विचारिता, सर्व संत त्या व्यक्तीवर कृपा करीत असतात. कोणी कितीही अज्ञानी, दुष्ट, दुराचारी, पापी असला तरी त्याची ती पापशक्ती संतांच्या पापनाशक, तारक अशा करुणाशक्तीपुढे व्यर्थ होते म्हणून महत्संग ‘अमोघ’ आहे असे सूत्रात म्हटले आहे.
भक्तिसूत्र ४० – –
लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥ ४० ॥
अर्थ : केवळ भगवंताच्या कृपेनेच सत्संग लाभतो.
विवेचन : मागील सूत्रात महात्संग दुर्लभ आहे असे सांगितले आहे. दुर्लभ म्हणजे अशक्य नव्हे, अशक्याचा विचारच करावयाचा नसतो. दुर्लभ म्हणजे सामान्य प्रयत्नाने प्राप्त न होणारा. ज्याकरिता काही विशेष अधिकार, विशेष साधन अपेक्षित असते, तसा महत्संग दुर्लभ म्हणजे अगदीच न प्राप्त होणारा असा म्हणता येत नाही, तर त्याचे जे साधन या सूत्रात सांगितले आहे त्यानेच प्राप्त होणारा तो आहे. ते म्हणजे भगवत्कृपा.
जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत सद्गुरू प्राप्त होत नाही असे एक वचन आहे. भगवंताची कृपा कधी होईल याचा काहीही नेम नाही. ज्याप्रमाणे पाऊस कधी पडेल, याचा अंदाज हवामान खाते सांगू शकेल, पण अमक्या वेळी अमुक ठिकाणी पाऊस पडेलच असे सांगणे शक्य नाही. भगवंताच्या कृपेच्या बाबतीत सुद्धा आपण हेच समजू शकतो. आजपर्यंत अनेक संत होऊन गेले, त्यांनी विविध प्रकारे साधन केले आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण इथे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. पण त्यांची स्थिती अमुक अमुक होती म्हणून त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असे म्हणणे चुकीचे ठरू शकेल.
यावन्नानुग्रहस्साक्षाज्जायते परमात्मनः।
तावन्न सद्गुरुं कञ्चित्सच्छास्त्रमपि नो लभेत॥
पूज्य बाबा बेलसरे एका ठिकाणी म्हणतात. साधना करून काहीही साधत नाही. मग, साधना का करायची? साधना अशासाठी करायची की साधनाने साधत नाही हे कळण्यासाठी साधना करायची. शेवटी देवाची प्रार्थना करायची की देवा, मला शक्य ते मी सर्व केलेझ तरी तुझी प्राप्ती झाली नाही. आता तूच काहीतरी कर. असे केले तर मनात शरणागत भाव दृढ होऊ लागतो. ज्याक्षणी साधक संपूर्ण शरणागत होऊन देवाची आळवणी करतो, तेव्हा भगवंताला यावेच लागते…! द्रौपदीने काकुळतीला येऊन भगवंतांची प्रार्थना केली, भगवंत धावत आले. गजेंद्राने अशीच प्रार्थना केली, भगवंत त्याला वाचवायला आले.
संत तुकाराम महाराजांचे चरित्र सामान्य प्रापंचिक मनुष्यासाठी आदर्श आहे, असे श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. संत तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांना साक्षात्कार होण्या आधीचे जे अभंग आहेत, त्यात ते पांडुरंगाला विनवणी करतात की देवा मला सत्संग घडू दे. त्यात ते सत्संगाचा महिमा अधोरेखित करतात.
“तुम्ही संत मायबाप कृपावंत| काय मी पतित कीर्ती वाणू ||१|| अवतार तुम्हां धराया कारण उद्धरावे जन जडजीव ||२|| वाढवाया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे ||३|| तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन ||४||”
भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर एका अभंगात ते म्हणतात,
“आम्ही वैकुंठवासी| आलो याच कारणासी||बोलिले जे ऋषी| साच भावे वर्ताया ||”
या सूत्रात ‘लभ्यते’ हे क्रियापद सहेतुक वापरले आहे. म्हणजे यात ‘लाभ’ होणे हा अर्थ ध्वनित होतो. लाभ हे शब्द अनुकूल व प्रयोजनयुक्त वस्तूच्या प्राप्तीकडेच केला जातो. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग इथे देणे उचित होईल.
“दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥
उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥३॥
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥”
– – सत्संगतीपेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभच नाही, असे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात.
साधकाच्या हातात आपली साधना नियमितपणे करावी आणि आपला शरणागत भाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. भगवंत कृपा केल्याशिवाय रहाणार नाही.
भगवत्कृपा व सत्संग याच्या प्राप्तीचा कार्यकारण संबंध सांगितला तो कसा सिद्ध होणार? याचे उत्तर पुढील सूत्रात दिले आहे.
नारद महाराज की जय!!!
– भक्ती सूत्र क्र. ३९ आणि ४०.
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





