श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४३

दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ॥ ४३ ॥

अर्थ : दुष्ट संग हा सर्व प्रकारे (अंतर्बाह्य) टाकला पाहिजे.

विवेचन:- संतांची संगत करताना काही पथ्ये ही पाळली पाहिजेत. काही गोष्टींचा संग प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. पुढील तीन सूत्रात नारद महाराज आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्याग करायचा हे सांगत आहेत.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. त्यामुळे तो एकटा राहूच शकत नाही. त्याला सतत कोणीतरी सोबतीला, संगतीला हवे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच चांगली माणसे येतील असे होत नाही. जशी भेटतील ती माणसे स्वीकारून मनुष्याला जीवन जगावे लागते. त्यामुळे रोजच्या जीवनात त्याला बरेवाईट अनुभव येत असतात. साधक पक्का होत नाही तोपर्यंत याचा त्याला कमीअधिक प्रमाणात त्रास होत असतो. संत तुकाराम महाराज एका अभंगात आपल्याला सांगतात,

*”मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥२॥शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥३॥आली ऊर्मी साहे । तुका म्हणे||४||”*

.. (अभंग क्रमांक ८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

संसारातही संग असतोच व परमार्थातही सत्संग आवश्यक आहेच हे मागील सूत्रांतून स्पष्ट झालेच आहे. पण ती सत्संगती प्राप्त होण्याला प्रतिकूल अशी दुःसंगती असते. अनादि संसारात नित्य विषयसेवनाचेच संस्कार साचलेले असतात. इंद्रिय-तादात्म्य, विकार हे त्या दुःसंगाचे प्रेरक असतात. जोपर्यंत त्या दुःसंगात साधक असतो तोपर्यंत त्याची सत्संगाकडे प्रवृत्ती होत नाही. कदाचित झाली तरी तिचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून प्रथम त्या दुःसंगाचा त्याग करावयास नारद सांगतात. कित्येक वेळी दुःसंगाचे काही अनिष्ट परिणाम भोगावयास मिळाले असता काही दुःसंग टाकले जातात असे दिसून येते. पण तो खरा त्याग नव्हे. एका प्रकारचा टाकला तर अन्य प्रकारचा राहतोच. कारण दुःसंग एकच प्रकारचा नसतो. म्हणून सूत्रात ‘सर्वथैव’ असे महत्त्वाचे पद घातले आहे. संगाचा चांगलेपणा व वाईटणा त्या संगाच्या विषयावर अवलंबून असतो. दुःसंग हा बाह्य व आंतर असा दोन प्रकारचा आहे. निषिद्ध शब्द स्पर्शादि पंचविषय हे बाह्य असतात, पण ते तमोगुण कार्य म्हणून मोहशक्तीने युक्त असतात. अनादिकालीन विषय इंद्रियतादात्म्यामुळे विषयाचे ठिकाणी अनुकूल बुद्धी निर्माण होते. अंतःकरण राग व द्वेषयुक्त असते, त्यामुळे ते सहज विषयाकडे प्रवृत्त होते. पण ते परिणामी किती बाधक असतात याचे विवेचन मागे सूत्र पस्तीसमध्ये आलेच आहे. सर्व संतांनी पर धन, परस्त्रीचा त्याग करायला सांगितले आहे. परस्त्री माते समान मानावी असे सांगितले आहे.

साधकांस स्त्रीसंगया बाधक होतो याचे अनेक दाखले देता येतील. मोठे तपस्वीही या संगात अडकून पडले असल्याचे आपल्या लक्ष्यात येईल.

दैनंदिन व्यवहार करताना मनुष्य त्याच्या इंद्रिद्वारे करीत असतों. ज्याला भगवतांची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने सर्व इंद्रिये, मन, देह निव्वळ शुद्ध करुन चालणार नाही, तर पवित्र करणे तितकेच आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज प्रापंचिक लोकांसाठी विशेष आदर्शवत असे आहेत. साधनेच्या प्रत्येक टप्प्यातील स्थितीवर त्यांनी मार्मिक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात,

*”पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥२॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥ नको मज कधी परस्त्रीसंगति । जनातुन माती उठता भली ॥४॥ तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळा आवडसी ॥५॥”*

 – संत तुकाराम

‘मनुष्य संतांच्या संगतीत राहील तर तो तसाच बनतो. असंताच्या संगाने असंत, तपस्व्याच्या संगतीत तपस्वी व चोराच्या संगतीत चोर बनतो, वस्त्राला जो रंग द्यावा तो चढतो तसेच माणसाचे आहे. ‘ म्हणून बुद्धिमान पुरुषाने दुष्टांची संगती टाकून देऊन संतांची संगती धरावी. संत हे आपल्या संगतीत असणार्‍याच्या मनातील विषयासक्तीचा आपल्या अमृतमय वाणीने नाश करतात.’

अशा रीतीने दुःसंग सर्वथा त्यागावा हे सांगितले. पण त्याचा त्याग का करावा? तर तो सर्वथा जीवाचा सर्वनाश करणारा आहे. तो कशा कशा प्रकारे मानवाचा सर्वनाश करण्यास कारण होतो हे सांगण्याकरिता पुढील सूत्राची रचना केली आहे.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद भक्तिसूत्रे ४४

कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुद्धिनाशसर्वनाशकारणत्वात् ॥४४॥

अर्थ : दु:संग हा भोगवासना, राग आणि मोह निर्माण करून स्मृतिनाश करतो, तसेच विवेक नष्ट करून मनुष्याच्या सर्वनाशास कारणीभूत होतो.

म्हणून साधकाने दु:संग प्रयत्नपूर्वक टाळावा.

विवरण : मागील सूत्रात दुःसंग हा सर्व प्रकारे त्याज्य आहे व तो दुःसंग अंतर व बाह्य असा दोन प्रकारचा आहे असे म्हटले होते. मनुष्याच्या मनात येणारे वाईट विचार आणि त्याच्या हातून घडणारी कृति, या दोन्हीचा परिमाण मनुष्यावर होत असतो.

संग करणे म्हणजे त्या गोष्टीच्या सहवासात रहाणे. कामक्रोधादी सहा विकार मनुष्याला त्याच्या मूळ ध्येयापासून दूर नेत असतात. म्हणून त्यांच्या त्याग करावा असे आपल्याकडे सांगितले जाते. श्री. गोंदवलेकर महाराज इथे व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन हाच विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतात. ते म्हणतात, की विकार भगवंताने निर्माण केले आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात निश्चित असे स्थान असले पाहिजे. स्वयंपाक करताना नुसते तिखट वापरले, किंवा नुसती हळद वापरली तर स्वयंपाक स्वादिष्ट होण्याची शक्यता अगदीच कमी. स्वयंपाक स्वादिष्ट होण्यासाठी हळद, तिखट आणि इतर जिन्नस योग्य त्या प्रमाणात त्यात घातले पाहिजेत. हेचं सूत्र आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. ह्या सहा विकारांचा विवेकाने विनियोग करता आला तर मनुष्य, साधक त्यांच्या सहाय्याने प्रगती करू शकतो. उदा. आपल्याला राग येतो, याचा मनुष्याला राग आला पाहिजे. साधना करण्याचा कंटाळा न येता, साधना करताना येणाऱ्या कंटाळ्याचा कंटाळा मनुष्याला आला पाहिजे… , पटतंय ना?

अनेक संत स्त्रीसंग करू नये असे म्हणतात. यातील मर्म नीट समजून घेतले गेले नाही तर संभ्रम होऊ शकतो. एकटी स्त्री अथवा स्त्रिया काहीही करू शकत नाहीत. पण स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातृत्वाचा नसेल तर मात्र गोष्टी बिघडू शकतात, असे सर्व संताना सुचवायचे असावे.

कित्येकाना असे वाटते की, ईश्वरच सर्व कर्माचा प्रेरक असल्याने ईश्वरप्रेरणेनेच पाप होते. कित्येकाची अविवेकमूलक भावना अशी असते की अदृष्टाने पाप होते. ईश्वर जर पापप्रेरक होईल तर त्याचेवर विषमता व क्रूरता हे दोष येतील. ज्या ईश्वराच्या कृपेने जीव उद्धरून जातो तो ईश्वर जीवास पाप करावयास कसे लावील? तसेच अदृष्टही पापास प्रेरक नाही. अदृष्ट हे भोगाला नियामक आहे. सुखदुःखादि भोग अदृष्टजन्य असतात.

कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे. ‘स्वतंत्र कर्ता’ असे पाणिनीचे सूत्र आहे. शुभसंस्काराने सद्‌बुद्धीचा जीव अंगीकार करतो तेव्हा त्याच्याकडून पुण्यकर्म होते व अशुभ संस्कार, दुर्बुद्धी व विकाराच्या स्वाधीन झालेला मानव पापकर्मात प्रवृत्त होतो म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात,

*”काम हा आणि क्रोध हा घडीला जो रजोगुणे |*

*मोठा खाादाड पापिष्ट तो वैरी जाण तूं इथे ||”*

(गीताई. ३. ३७)

काम-क्रोधाच्या आधीन झालेल्या माणसास जरी काही पूर्वसंस्कार परमार्थाचे असले तरी मोहाने ते झाकले जातात हा मोहाचा प्रभाव आहे. या स्मृतिभ्रंशाच्या पुढची पायरी ‘बुद्धिनाश’ ही आहे. बुद्धिनाश म्हणजे दुसर्‍या अध्यायात गीतेमध्ये जी सद्‌बुद्धी म्हणून सांगितली आहे किंवा गीतेच्या अठराव्या अध्यायात तीन प्रकारची सात्त्विक, राजस, तामस, अशी बुद्धी सांगितली आहे त्यात ‘प्रवृत्ती-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बंध-मोक्ष यांना यथार्थ रूपाने जी जाणते ती सात्त्विक बुद्धी होय. ‘ असे श्रीकृष्णानी अर्जुनास सांगितले आहे. अशी आपल्या हिताला जी बुद्धी जाणत नाही तोच तिचा नाश होय. कारण वर सांगितलेली बुद्धी हीच मानवाना उद्धारास अनुकूल आहे, हिलाच सद्‍बुद्धी असे म्हणतात. अशा या बुद्धीचा नाश झाला म्हणजे पुढची पायरी सर्वनाशाचीच आहे असे नारद म्हणतात.

‘अंतःकरणात विषयांची नुसती आठवण असेल तरीही संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्यामुळे विषयेच्छा प्रगट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड आधीच ठेवलेले असते, व जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे संमोह प्रगट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला असता प्राण्याची दशा होते. मग सर्वत्र केवळ अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते, अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. त्यामुळे जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते. ‘ 

श्रीनारद महाराज या दोन सूत्रातून त्याचा त्याग व बाधकता सांगून गेले. पुढील पंचेचाळीसाव्या सूत्रात आणखी एका दृष्टीने या कामक्रोधादिकांची बाधकता दृष्टान्त द्वारा पटवून देतात.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४३ आणि ४४.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments