डॉ. शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ११ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
विस्तीर्ण, ओसाड माळावरचे सप्तपर्णीचे दोन प्रचंड वृक्ष पाहून रविंद्रनाथांच्या वडिलांनी तो माळ विकत घेतला व तिथे ‘शांतिनिकेतन’ नावाची छोटीशी बंगली बांधली. तिथे ते दोघे, रविंद्रनाथ व त्यांचे वडिल राहू लागले. वडिलांबरोबर रविंद्रनाथांनी हिमालयात भ्रमंती केली. या तीन महिन्यांच्या प्रवासात ते त्यांच्याकडून खूप कांही शिकले. शाळेच्या भिंतींतून मुक्तता झाल्यानंतरच शिक्षणातील आनंद त्यांना गवसला. आणि शांतिनिकेतन च्या निर्मितीचं बीज त्यांच्या मनात रुजले.
शाळा सुरू करण्यासाठी ते १९०१ साली पत्नी व दोन मुलांसह शांतिनिकेतनात आले. तिथला शाळेचा व कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी त्यानी; जग्गनाथपुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या हौसेने बांधलेला बंगला विकून टाकला. त्यांच्या पत्नीने आपले सर्व दागिने विकले.
निसर्गाला गुरू मानून, मुलांच्या मनातलं कुतूहल जिवंत ठेऊन, मुलांना समजणाऱ्या भाषेतून, त्यांच्या ओळखीच्या, आवडणाऱ्या प्रसंगवर्णनातून दिलेलं शिक्षण जास्त उपयुक्त ठरेल याबद्दल गुरूदेवांना खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वतः पाठ्यपुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेले ‘सहज पाठ’ आजही प. बंगालमधील शाळांत शिकविले जातात.
‘साधन’ असणाऱ्या पुस्तकांना ‘साध्य’ मानणाऱ्या परिक्षा पद्धतीचा त्यांना तिटकारा होता. त्यांच्या मते बुद्धीचा विकास म्हणजे कल्पनाशक्ती, सर्जनशील मुक्त विचार व जिज्ञासा यांचा विकास!
विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असले पाहिजे यावर ते ठाम होते. एखादी व्यक्ती व्यावसायिक शिक्षण किंवा बौद्धिक शिक्षण किंवा मानवता केंद्रित शिक्षण निवडेल किंवा कुणी एखादा ब्रह्मचर्य पाळून आत्मसाक्षात्कार, व्यक्तित्वाचा व चारित्र्याचा विकास हे उद्देश ठेऊ शकतो. यासाठी त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम सुरू केले होते. निरोगी शरीराचे महत्त्व ओळखून योग, खेळ यांचे शिक्षण अनिवार्य हवे अशी त्यांची धारणा होती.
अध्यापन वास्तविक व व्यावहारिक असले पाहिजे; कृत्रिम आणि सैद्धांतिक नको, यावर त्यांचा भर होता. टागोरांच्या मते, व्यक्ती स्वतःला मातृभाषेत जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकते व योग्यरित्या संवाद साधू शकते. म्हणून त्यांनी शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेवर जास्त भर दिला आहे.
ग्रामीण लोकांच्या गरिबीची चिंता त्यांना होती. शिक्षणाद्वारे गरिबी दूर झाली पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी संबंधित क्षेत्रातील विषयात त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर ते कुशल कारागीर बनू शकतात. याचसाठी त्यांनी श्रीनिकेतन ही संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू केली.
—–
☆ गीत : ३१ ☆
“PRISONER, tell me, who was it that bound you? ”
“It was my master, ” said the prisoner. I thought I could outdo everybody in the world in wealth and power, and I amassed in
my own treasure-house the money due to my king. When sleep overcame me I lay upon the bed that was for my lord, and on waking up I found I was a prisoner in my own treasure-house. “
“Prisoner, tell me who was it that wrought this unbreakable chain? ”
“It was I, ” said the prisoner, “who forged this chain very carefully. I thought my invincible power would hold the world captive leaving me in a freedom undisturbed. Thus night and day I worked at the chain with huge fires and cruel hard strokes. When at last the work was done and the links were complete and gunbreakable, I found that it held me in its grip. “
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत ३१ ☆
संपत्तीने मिळवीन सत्ता
सत्ता देईल आणिक मत्ता
दुनिया होईल गुलाम माझी
हीच कल्पना सदैव चित्ता॥
*
याचसाठी झटलो रात्रंदिनी
वन्ही तापवुनि, घाव घालुनि
अभेद्य केल्या मीच साखळ्या
लोह कड्या चातुर्ये गुंफुनि॥
*
स्वतःसाठी तिजोरी भरता
इतरांसाठी बंध निर्मिता
दमुनि निजलो, स्वप्नी रमलो
हताश झालो, जागा होता॥
*
मनाजोगती करुनि व्यवस्था
अशी कशी हो माझी अवस्था
साखळदंडा मीच निर्मिले
बंधक झालो मीच सर्वथा॥
*
मूढ असे मी, फिरली मती
तुझीच सत्ता या देहावरती
ऐहिक माया ती क्षणभंगुर
हे रघुराया, तूच निरंतर॥
☆
भावानुवाद © शोभना आगाशे
संपर्क: ९८५०२२८६५८
—–
☆ गीत ३२ ☆
BY all means they try to hold me secure who love me in this world. But it is otherwise
with thy love which is greater than theirs, and thou keepest me free.
Lest I forget them they never venture to leave me alone. But day passes by after day and thou art not seen.
If I call not thee in my prayers, if I keep not thee in my heart, thy love for me still waits for my love.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत ३२ ☆
*
जे जे प्रेम मजवरी करिती
जखडून देती मज त्या प्रीती
*
सावली सम येती मागुनी
भय हे जाईन मी विसरुनी
*
तुझी प्रीत त्याहुनि मोठी
मुक्त ठेविसी मज जगजेठी
*
मी नच करिते तुझी प्रार्थना
हृदयी माझ्या तुझी मूर्त ना
*
वाट पाहते प्रेम तुझे परी
जागेल का मम प्रीत हरी
☆
भावानुवाद © शोभना आगाशे
संपर्क: ९४५०२२८६५८
—–
☆ गीत ३३ ☆
WHEN it was day, they came into my house and said, “We shall only take the smallest room here. ”
They said, “We shall help you in the worship of your God and humbly accept only our own share of his grace”; and then they took their seat in a corner and they sat quiet and meek.
But in the darkness of night I find they break into my sacred shrine, strong and turbulent, and snatch with unholy greed the offerings from God’s altar.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत ३३ ☆
☆
गरिबाच्या वेशात अतिथी आला
रात्रीपुरती थोडी जागा दे म्हणाला
*
तुझ्याबरोबर मी ही देवासमोर बसेन
प्रार्थनेचे फळ तुलाच द्यायला सांगेन
*
धन्य झालो मी उच्च विचार ऐकून
शांत झोपलो, शेजेला पाठ टेकून
*
रात्र होताच त्याची मती फिरली
आणि वासना उफाळून आली
*
देवाला वाहिलेली दाने सारी
ओढून झाली पसार स्वारी
*
कशी पोचेल प्रार्थना कुणाची
विवेकावर जर सत्ता षड्रिपूंची
☆
– क्रमशः भाग ११.
*
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






