श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २९ आणि ३० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २९ – –
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |
बळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे |
पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं|
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९|
अर्थ : आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर (त्यांच्या डोक्यावर) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी (आणि श्रीकृष्णांनी सुद्धा) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत (त्यांच्या रक्षणासाठी)विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर (राम) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.
(ब्रीद – प्रतिज्ञा, रिपु – शत्रू, कांबी – धनुष्याची कांबीट/कामठा, पुरी – नगरी)
विवेचन: मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण (कोदंडधारी) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात.
सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या सहाय्याने स्वउद्धार करून घेऊ शकतो. संत महंत आपल्या आयुष्यामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करणे आणि समाजातील भक्ती किंवा सात्विकता वाढवणे असे कार्य करीत असतात. ते लोकांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. परंतु दृष्टांचे निर्दालन करणे त्यांना शक्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा – –
जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो ||
– – असे म्हटले आहे. म्हणजे दुष्टांचे दुष्टत्व किंवा वाईट भावना नष्ट होवोत आणि सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड वाढो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् |
धर्मसंस्थापनार्थामि युगे युगे ||
– – हे भगवंताने आपल्या भक्तांना गीतेत दिलेले वचन आहे. जे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत अशा लोकांना सुद्धा तो कधी शासन करत नाही. तो तर अजातशत्रू आहे. पण पण जर कोणी त्याच्या भक्ताला त्रास देत असेल तर ते मात्र तो सहन करू शकत नाही आणि त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अवतार घेतो.
जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजला होता आणि राक्षसांनी सदाचारी लोकांना आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांना त्रास देणे सुरू केले, तेव्हा देवीने देखील अनेक अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. श्रीराम आणि श्रीकृष्णांनी देखील अशा अनेक दुराचारी लोकांचा नाश केला.
परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतो यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात, ” आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उद्धारासाठी, मोक्षासाठी श्रीरामांनी अयोध्यानगरीतील नागरिकांना आपल्या सोबत विमानात बसवून नेले होते. श्रीकृष्णांनी देखील शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्या नगरीतील लोकांना नवीन द्वारकापूरीत नेले होते. असा हा भगवंत भक्तवत्सल आणि सज्जनांचे रक्षण करणारा आहे. एकदा का आपण त्याचे भक्त झालो की आपली सगळी काळजी तोच वाहतो आणि सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये तोच आपला आधार होतो. आपले रक्षण करतो.
समर्थ म्हणतात भक्तांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीदच (कर्तव्य)आहे. आणि भक्तांचे रक्षण करण्याबद्दलचा त्याचा महिमा पदोपदी म्हणजे सर्वत्र गाजतो आहे. राम अत्यंत उदार आहे. आपले भक्त त्याला प्रिय आहेत. त्यांच्यात तो भेदभाव करत नाही. हा माझा तो तुझा असे त्याच्याजवळ नसते. तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तांना तो मोक्ष मार्गावर नेण्यासाठी सहाय्य करतो. तेव्हा आपल्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी अशा रामाला शरण जावे हेच खरे !
स्वसंवाद ::
१) मी परमेश्वराची खरोखरच मनापासून भक्ती करतो का ?
२) संकटसमयी मला ‘तो माझ्या पाठीशी आहे’ ही भावना कितपत बळ देते?
३) मी सज्जनांच्या बाजूने उभा राहतो का, की परिस्थितीनुसार भूमिका बदलतो?
४ “भगवंत भक्तांची उपेक्षा करत नाही” या विचारावर माझा किती दृढ विश्वास आहे ?
– – –
श्लोक क्र. ३० – – –
समर्थाचिया सेवका वक्र पाहे |
असा सर्व भूमंडळी कोण आहे ?
जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०|
अर्थ : एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.
विवेचन : “नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे.
सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा निस्सीम भक्त हनुमान याचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूया.
हनुमंत रामाचा सेवक आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय तो त्याच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपल्या धन्यावर म्हणजे मालकावर ज्याची प्रचंड निष्ठा आहे. असा सेवक म्हणजे हनुमंतराय !मग साहजिकच अशा सेवकावर मालकाचे देखील प्रेम असणारच !
सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीराम हनुमंताला विचारतात की बोल तुझी काय इच्छा आहे ? तेव्हा हनुमंत फक्त त्याची भक्ती मागतात. श्रीराम त्याला उराशी धरतात. आपला लहान बंधू म्हणून आलिंगन देतात केवढे हे प्रेम ! मारुतीरायांची केवढी ही निरपेक्ष सेवा !
समर्थांचा (भगवंताचा) जो भक्त असतो तो देखील त्यांच्या कृपेने समर्थच होतो. त्यामुळे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत नसते. त्याच्यावर संकटे येत नाहीत असे नाही. पण जीवनातील दुःखांना, संकटांना तो धैर्याने सामोरा जातो. हा देह माझा नाहीच. तो भगवंताचा आहे अशी त्याची धारणा झालेली असते. त्याच्या सेवेसाठीच त्याचा उपयोग तो करत असतो. म्हणून देहाला दुःख झाले तरी तो विचलित होत नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे… अशी त्याची वृत्ती होते.
सेवक व्हावे तर अशा व्यक्तीचे व्हावे जो आपली कधीही उपेक्षा करीत नाही. व्यवहारात चाकरी भलेही कोणाची करा. परंतु सेवक मात्र त्या भगवंताचे व्हा. कसा आहे हा भगवंत ? ज्याचा सेवक आपल्याला व्हायचे आहे ? हा भगवंत असा आहे की त्याच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे वर्णन तिन्ही लोक करतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. या तिन्ही लोकांत त्याच्या पराक्रमाचा डंका वाजतो आणि सगळेच त्याचे गुणगान गातात.
एकदा का आपण त्याचे सेवक झालो की तो आपली कधीही उपेक्षा करत नाही. सेवक म्हणजे भगवंताचा भक्त ! खरा भक्त भगवंताकडून काही हवे म्हणून भक्ती करीत नाही. तर मला भगवंत हवा आहे, त्याच्याशिवाय दुसरे काही नको अशा समर्पण भावनेने त्याची भक्ती असते. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त ! असा सेवक, असा भक्त जो असतो, त्याची सुखदुःखे, काळजी, चिंता आपोआप कमी होत जातात. म्हणजे त्याला त्याची पर्वा नसते. भगवंत त्याची काळजी वाहतो. भगवंताच्या नामात तो रंगून गेलेला असतो. अशा या भगवंताकडे भक्ताकडे भगवंत देखील लक्ष ठेवून असतो. तो त्याची उपेक्षा करीत नाही. त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जातो. भगवंत आपल्याला सांभाळतो अशी ज्याची खात्री असते तो निर्भयपणे जीवन जगू शकतो. लोकांनी स्तुती केली किंवा निंदा केली तरी त्याला काही फरक पडत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांपासून असा भक्त कोसो दूर असतो. आपल्या कर्तव्यात रत असताना त्याची आठवण ठेवावी. कर्तेपण आपल्याकडे न घेता राम कर्ता आहे, तोच हे करून घेतो आहे ही भावना ठेवावी.
स्वसंवाद ::
१) मी भगवंताचा “सेवक” आहे की केवळ “अपेक्षा करणारा भक्त”?
२) माझ्या भक्तीत निरपेक्षता आहे का, की काहीतरी मिळवण्याची अपेक्षा आहे?
३) मी माझ्या चिंता खरोखरच परमेश्वरावर सोपवतो का, की फक्त शब्दांत बोलतो?
– क्रमशः श्लोक २९ आणि ३०.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







