प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २२ ☆ प्रा.भारती जोगी ☆

ललिता देवी आणि मा. लालबहादूर शास्त्री 

११ जानेवारी १९६६… ताश्कंद मधील ती रात्र… काळ रात्र बनून आली… आणि एका कवीच्या शब्दांतून व्यक्त झाला ; एका अनाथ झालेल्या कुटुंबाचा आणि देशाच्या माऊलीचा आक्रोश…

☆ ताश्कंद की वो सर्द रात ☆

☆

बनकर आयी काल का पैगाम

 लिख दिया विरह का अध्याय

छूट गया मातृभूमी का धाम

 ललिता रोती तडप-तडपकर

सूनी महफिल सूना आंगन

 देश रो रहा खोकर अपना वो…

सबसे प्यारा राजरतन!!!

* 

छोड अचानक चले गये

इस सूनेपन को कौन भरे

ललिता के नयनोंसे हरपल

अविरल नीर की धार बहे…

☆

भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जी ; भारताचे नाव जगात उज्ज्वल करून, ताश्कंद करार यशस्वी करून परतणार होते… आणि अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. आणि त्यांची पत्नी अकल्पित आघात आणि अथांग दु:खाने कोसळलीच!! ललिता के आंसू… जे एका अनमोल अशा परस्पर साहचर्याचं आणि पतिनिष्ठेचं प्रतिबिंबित रूप होते. श्री. एम एल वर्मा या कवीने… मोठ्या संयम आणि सामर्थ्याने त्या प्रवाहाला सामावून घेतलं या महाकाव्यात्मक रचनेत! ललितेच्या अश्रूंना शब्द रूप मिळाले, आणि तिच्या डोळ्यांसमोरून झरझर सरकत गेला तिचा आयुष्य पट!!!

… ललिता… पूर्वाश्रमीची लालमणी! मिर्झापूर ला जन्म. सहाव्या वर्षी शाळेत गेली, पण वडिलांच्या अचानक जाण्याने शिक्षण थांबले.

१० वर्षांची असताना लाल ला पाहिले, आणि एकदा स्वप्नात ही आला. हे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून तिनं शाळिग्राम पाण्यात ठेवला होता… असं म्हणतात.

अखेर लालमणीचा विवाह १९ मे १९२८ रोजी लालशीच संपन्न झाला. लग्नात त्यांनी फक्त दोनच गोष्टी मागितल्या… एक म्हणजे…

लालमणी चे नाव बदलून ललिता ठेवणे. कारण लाल मीरपूर च्या ललिता माता चे परम भक्त होते. ५१ शक्ती पीठांपैकी एक!! आणि लालमणी ची ललिता झाली. जी पुढे जाऊन… स्त्री शक्ती आणि देशभक्ती चं… एक जागृत सिद्ध पीठ ठरली.

… लाल ने मागणी केलेला १ चरखा आणि ३ वार खादीचे कापड… हेच आंदण आणि अस्मिता, स्वाभिमान आणि धैर्य… हे संस्कारांचं मनावरचं गोंदण घेऊन ललिता प्रवेशली आपल्या सासरी.

या विवाहाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे… लाल ने सहजीवनाची प्रतिज्ञा दोघांनीही उच्चारायची अट घातली होती. अग्नीच्या साक्षीने घेतलेली ती प्रतिज्ञा त्याच क्षणी ललिता देवींच्या सहजीवनाचा जणू मूलमंत्र च झाली.

लाल… म्हणजेच… लाल बहादूर शास्त्रीजी त्यावेळी स्वतंत्रता आंदोलनात सक्रिय होते. त्यामुळे त्यांना ९ वर्षे जेलमध्ये जावं लागलं. या संपूर्ण काळात ललिता यांनी अतिशय तुटपुंज्या संसारात, आपल्या ६ अपत्यांचे पालन पोषण अगदी काटकसरीने केले. शास्त्री जींना याची झळ लागू दिली नाही.

 त्या काळात मुलगी आजारी झाली… इलाजासाठी पैसे नव्हते… त्यामुळे दुर्दैवाने मुलगी दगावली. शास्त्रीजी पॅरोल वर सुटून घरी आले. पण ललिता देवींनी आपलं दु:ख बाजूला सारून त्यांना जेलमध्ये परत जाण्याची विनंती केली… कारण ती माऊली जाणून होती की, या क्षणी जेलमध्ये असलेल्या त्यांच्या सोबत्यांना त्यांची जास्त गरज आहे. तेवढं ते परस्पर सामंजस्य दोन जीवांच्या विचारांतलं!! ललितादेवी म्हणजे… सेवा, संयम आणि समर्पणाचं मूर्तीमंत रूप!!

ललिता देवी… उपभोग शून्य स्वामीची स्वामिनी!! “माझे पती माझे दैवत”… हाच बाणा! सधन घरातून निर्धन घरात आल्या… रेशमी वस्त्रांचा त्याग करून थेट शेवटपर्यंत खादीच वापरली. शेवटपर्यंत आपल्या हातानेच स्वयंपाक केला या अन्नपूर्णेने!! प्रत्येक वेळी पती विजयी व्हावा म्हणून झगडत राहिली परिस्थिती शी पराभूत होऊ नये म्हणून. त्यांचं जीवन म्हणजे पंतप्रधानांच्या पत्नीचे जीवन नव्हते ; तर ते भारतीय स्त्री च्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि धैर्याचे एक उत्तम उदाहरण होते.

शास्त्रीजी आणि ललितादेवी यांच्यातलं अद्वैत अगदी ठायी-ठायी जाणवायचं. शास्त्रीजी कुठेही जात तेव्हा ललिता देवी त्यांच्या बरोबर च असायच्या. अगदी… जेथे राघव तेथे सीता… अशाच! शास्त्री जी ही घरातील आणि देशातील प्रत्येक चर्चेत विचारविनिमयात त्यांना सहभागी करून घेत… त्याचं मत विचारत… त्याही अगदी मनमोकळेपणाने चर्चा आणि आपलं मत मांडत.

शास्त्री जी तुरूंगातून ललिता देवींना पत्रं लिहून त्यांच्या आरोग्याची, कुटुंबाची काळजी घेणारी चौकशी करत. मुलांच्या अभ्यासा बाबत काटेकोर सूचना देत. देवींना स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा प्रेमळ आग्रह करत.

 शास्त्रीजींनी तुरूंगातून लिहिलेली ही पत्रे म्हणजे… अतूट विश्वास, ध्येयनिष्ठा याचा जिवंत दस्तऐवज होती. केवळ कौटुंबिक संवादाचे माध्यम नव्हतीच ती पत्रे!!

ललितादेवींची कुटुंब आणि पती प्रती असलेली निष्ठा आणि शास्त्री जींचा स्वाभिमान या दोन्ही गोष्टी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू!! पतीचा स्वाभिमान जपण्यासाठी ललिता देवींची सतत धडपड. त्यासाठी कुठल्याही त्यागाची तयारी.

एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातील जो शास्त्रीजीं विषयीचा आदर किती तरी पटींनी दुणावणारा…

लोकसेवक मंडळाकडून शास्त्री जींना दरमहा ५० रू मिळत. त्यांनी एका पत्रात देवींना हे पैसे पुरतात ना? असे विचारले असता ललिता देवींनी उत्तर दिले की, हो, उलट १० रू. मी वाचवते. हे कळताच शास्त्री जींनी संस्थेला कळवले की, मला ४० रू. पुरेसे आहेत, उरलेले १० रू. दुसऱ्या गरजू कुटुंबाला द्यावेत. “… केवढी ही जाण… केवढा हा प्रामाणिकपणा!! आणि ललिता देवींनी ही ते मान्य करणं… ही केवढी त्यांची पतिनिष्ठा आणि पतीला दिलेली सुयोग्य साथ, परस्पर विश्वास… लग्नाच्या वेळी उच्चारलेल्या प्रतिज्ञेला जागणं!!!

 ललितादेवी जसा आणि जेव्हा वेळ मिळेल तशा स्वतंत्रता आंदोलनात सहभागी व्हायच्या. महिलांना गोळा करायच्या. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत… विदेशी कापड विक्रीच्या दुकानावर चालून ही जात मोठ्या धिटाईने!!

 शास्त्रीजी जेव्हा ताश्कंद ला गेले तेव्हा हाजी पीर आणि ठिथवाल पाकिस्तान ला परत देण्यावरून खूप दबाव होता. ताण होता मनावर. त्यात पहिल्यांदाच कधी नव्हे तो ललितादेवी या ताश्कंद करारावर सही करण्यावरून नाराज होत्या त्यामुळे शास्त्री जींनी फोन केला तरीही त्या बोलल्या नाहीत.. शास्त्रीजीं नी त्यांचे ऐकले नाही म्हणून त्या नाराज होत्या. शेवटी कितीही झाले तरी त्या एक माणूस च होत्या. एक पत्नी होत्या. पण तिथेच जणू नियतीने आपला डाव साधला. शास्त्रीजींची सावली त्यांच्यापासून बाजूला झाली… दूर गेली… आणि शास्त्रीजी गेले… ललितादेवी पार उन्मळून पडल्या. मी बरोबर गेले असते तर शास्त्री जी असे कायमचे सोडून गेले नसते… हा सल… हे शल्य कायमच बोचत राहिलं… टोचत… सलत राहिलं त्यांच्या मनाला!!

 शास्त्रीजींचे पार्थिव दिल्लीत आल्यानंतर… ललितादेवींनी आपली शास्त्री जींना लिहिलेली वैयक्तिक पत्रे त्यांच्या चितेत समर्पित केली. आपल्या आठवणी पतीसोबत विलीन केल्या.

शास्त्रीजीं च्या आठवणी मनात जिवंत ठेवण्यासाठी.. मीठ सोडण्याचा निर्णय घेतला. पतीच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यातील चव… रस… निघून गेला हेच त्यातून व्यक्त होते. पती विषयीच्या आदराचा… निष्ठेचा मूक संकल्प होता तो!!!

मुलांच्या हट्टाखातर फियाट कार घेण्यासाठी ५००० रुपये बॅंकेकडून घेतलेले कर्ज फिटायचे बाकी असताना शास्त्रीजींचा मृत्यू झाला. त्यावेळी ते कर्ज माफ करावे असे बॅंक अधिका-यांनी ठरवले… पण

ललिता देवींनी पतीचा आणि स्वतः चा स्वाभिमान जपत, ठामपणे नकार दिला आणि सांगितले, ” कर्ज माफ करण्याची गरज नाही. माझ्या पतीचे कर्ज मी फेडणे हे माझे कर्तव्य आहे. “”

आणि खरंच पुढील ३-४ वर्षे प्रत्येक महिन्याला पेन्शन मधून हप्ते भरून कर्ज फेडले या मानिनी ने!!

तसंच संस्कार, संयम आणि सेवा हेच जीवन मानणा-या ललिता देवींनी पतीच्या मृत्यूनंतर तीन महिन्यात १० जनपथ येथील पंतप्रधान निवासाच्या हिरवळीवर नांगर चालवून, अन्नधान्याची तीव्र टंचाई दूर व्हावी म्हणून शास्त्री जींनी पेरलेल्या गव्हाची कापणी करायला स्वतः जाऊन, पतिनिष्ठा, पतीचे आदर्श त्यांच्या मृत्यूनंतर ही जपले.

या देवीने गरजू आणि गरिबांसाठी शास्त्री सेवा निकेतन सुरू करून वंचितांसाठी विविध उपक्रम राबविले… जे आजही सुरू आहे.

शास्त्रीजीं च्या समाधी स्थळावर त्यांचे “जय जवान जय किसान” हे घोषवाक्य कोरले जावे म्हणून ठाम भूमिका घेत पतीचा वैचारिक वारसा जपला.

शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर ललिता देवींचे आयुष्य एका तेल संपत जाणा-या समई सारखे झाले ; पण स्वाभिमानाची ज्योत मात्र शेवटपर्यंत तेवत राहिली, झगडत राहिली नियतीशी शेवटपर्यंत तेवती राहण्यासाठी.

१३ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी ही समिधा निमाली… आणि शास्त्रीजींच्या विजय घाट स्मारकाजवळच समाधी रुपात मृत्यूनंतर ही पतीच्या सोबतच राहिली!!!!!!! समईतली शांत ज्योत शांतावली त्या समाधीत!!!!!

– लेख क्र. २२ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted