श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ कली-दुनिया… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
चार पावलांनी दुनियाच संपते
वित्त, प्रतिष्ठा, सत्ता, अहंम, व्यापते.
*
शर्यतीत जीवन पुढेच पळते
सजीवाचे नियम पाळणे छळते.
*
ज्याची त्याची गती पुसून आता गेले
युगासवे धावणे हेची दैव झाले.
*
ज्याने-त्याने रमावे ऐश्वर्यात झोकी
स्वयं सोडला तर ओझे सर्व बाकी.
*
सन्मानाचा डौल विजयाची देतो ग्वाही
जिंकण्यासाठीच आयुष्य संपून जाई.
*
वर्णावे काय या कलियुगाचे क्रमण
क्षणात बदले काळचक्राचे भ्रमण.
*
थांबावे तर संकट, चालणे बिकट
जगणे थांबून राही, मरण निकट.
*
आकाशी हाताचा स्पर्श, कवेत सागर
रात्रंदिनात ना राहिले वेळ अंतर.
*
असत्य, हिंसा, अनिती, असूरीचे पाश
सत्य द्वापार-त्रेता, मात्र कलित-नाश.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




