श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १२७ आणि १२८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. १२७ – – –
जगी धन्य तो रामसूखें निवाला ।
कथा ऐकता सर्व तल्लीन झाला ।
देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ।।१२७।।
अर्थ : रामनामातच आपले सुख आहे अशा भावनेने जो समाधान पावतो, तो खरोखरच धन्य आहे. भगवंताची कथा ऐकताना जो तल्लीन होऊन जातो आणि आपले देहभान विसरतो असा भक्त खरोखरच धन्य होय. रामनामाच्या बोधाने (ज्ञानाने) त्याला हे कळते की आपण म्हणजे देह नाही आणि मग त्याच्या सर्व वासना रामरूपातच लय पावतात.
विवेचन : संतांच्या चार ओळींच्या सांगण्यात केवढा गहन अर्थ भरलेला असतो, त्याचे प्रत्यंतर या श्लोकातून आपल्याला येते. आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला पापी कोण, चांडाळ कोण ते सांगितले. या श्लोकात ते धन्य कोणाला म्हणावे ते सांगताहेत. व्यावहारिक जगात आपल्या धन्यतेच्या कल्पना वेगळ्या असतात. ज्याच्याजवळ भरपूर पैसा, गाडी, बंगला, नोकरचाकर इ. आहेत, तो आपल्या दृष्टीने जगात धन्य होय. ज्याने भरपूर यश संपादन केले आहे, जो मोठ्या अधिकारपदावर आहे अशा व्यक्तीला देखील आपण जीवनात धन्य समजतो. पण संतांच्या धन्यतेच्या कल्पना वेगळ्या असतात. या श्लोकातील पहिल्याच ओळीत समर्थ म्हणतात ‘ जगी धन्य तो रामसूखें निवाला. ‘रामनामात ज्याला सुख वाटते, त्यातील आनंदाने जो निवाला आहे म्हणजे समाधानी किंवा तृप्त झाला आहे, तो जगात धन्य होय. संतांच्या दृष्टीने अशी व्यक्ती म्हणजे परम भाग्यवान! मीराबाई म्हणतात, ” मैने रामरतन धन पायो. ” रामनामाचं हे धन ज्याच्या बँकेत जमा आहे अशी व्यक्ती धनवान, धन्य. आधीच्या श्लोकांत समर्थांनी म्हटलेच आहे की ‘ जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ‘ एखाद्या मोठ्या संस्थेचा, कारखान्याचा मालक होण्यापेक्षा त्या सर्वोत्तमाचा दास होणे ही अधिक धन्यतेची गोष्ट आहे. तो सर्वोत्तम कोण? सर्वात उत्तम कोण असू शकेल? एका रामरायाशिवाय दुसरे कोण?
ज्याचे मन रामस्वरूपी रंगून गेले आहे त्याला रामकथेची गोडी वाटणारच! त्यात तो तल्लीन होऊन जातो. स्वतःला विसरतो. आपण सामान्य माणसे एखादा चित्रपट पाहताना तल्लीन होतो. आपल्याला वेळेचे भान उरत नाही. चित्रपट संपल्यानंतर आपण म्हणतो, ” अरेच्या, एवढा वेळ झाला. वेळ कसा गेला हे कळलेच नाही. ” जो रामभक्त किंवा भगवंताचा भक्त असतो त्याचे चित्त भगवंताच्या नामस्मरणात, कथाकीर्तनात अशा प्रकारे रमते. त्याचे देहभान हरपते. आपण असे म्हणतो की जिथे जिथे रामकथा सुरु असते तिथे स्वतः मारुतीराय उपस्थित असतात. का? तर त्यांना एका रामनामाशिवाय दुसरे काहीच प्रिय नाही. सीतामातेने जेव्हा त्यांना अमोलिक असा मोत्यांचा हार दिला, तेव्हा त्यात माझा राम, माझे स्वामी कुठे आहेत असे म्हणून त्यांनी तो फोडून नष्ट केला. आपल्याही जीवनात सगळीकडे असा राम जेव्हा आपल्याला दिसू लागेल, तेव्हा आपले जीवन खरोखरच धन्य होईल.
जो नित्य नामस्मरणात राहतो त्याला रामस्वरूपाचा बोध होतो. आपणही रामस्वरूप आहोत अशा प्रकारची भावना जागृत होऊ लागते. तेच आपले मूळ स्वरूप आहे. आपण जिथून आलो तिथे आपल्याला जायचे आहे. अशा प्रकारचे ज्ञान जेव्हा होते, तेव्हा देहबुद्धी नष्ट होऊ लागते. आपण म्हणजे देह नाही ही भावना उत्तरोत्तर दृढ होत जाते. भगवंत मुळात आनंदस्वरूप आहे. आपणही मूलतः आनंदस्वरूपच आहोत. पण देहबुद्धीमुळे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडला आहे म्हणून आपण आपला आनंद दुसरीकडे शोधू लागतो. पण तो आनंद शाश्वत नसतो.
मी म्हणजे देह अशी जी सुरुवातीपासून आपली भावना असते, त्यातूनच देहसुखाच्या कल्पना निर्माण होतात. या कल्पना म्हणजेच नाना प्रकारच्या वासना. या वासना आपल्या भगवंतापासून दूर नेतात. पण ज्याचे चित्त रामनामी, रामस्वरूपी आणि रामकथेतच समाधान पावते, त्याच्या या ऐहिक वासना हळूहळू लय पावतात. रामरूपातच त्यांचा विलय होतो.
स्वसंवाद
१. माझी ‘धन्यतेची’ कल्पना केवळ पैसा, गाडी, बंगला आणि अधिकारपद मिळवण्यापुरतीच मर्यादित आहे, की मला ‘रामनामात’ (सत्कर्मात आणि भक्तीत) खरी तृप्ती मिळते?
२. एखादा चित्रपट पाहताना किंवा मनोरंजनाच्या गोष्टीत मी जसा स्वतःला विसरून तल्लीन होतो, तशी तल्लीनता मला चांगल्या विचारांचे श्रवण करताना किंवा भगवंताच्या नामस्मरणात कधी अनुभवता येते का?
३. “मी म्हणजे केवळ हा नश्वर देह नसून मुळात एक आनंदस्वरूप आहे, ” या खऱ्या स्वरूपाचा बोध मला झाला आहे का, की मी अजूनही देहबुद्धीतच अडकलो आहे?
४. मारुतीरायांप्रमाणे, ज्या गोष्टीत भगवंताचे (किंवा चांगुलपणाचे) नाम नाही, ती कितीही मौल्यवान असली तरी तिचा त्याग करण्याची वृत्ती माझ्यामध्ये आहे का?
=====
श्लोक क्र. १२८ – – –
मना वासना वासुदेवी वसो दे ।
मना कामना कामसंगी नसो दे ।
मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनीं वस्ती कीजे ।।१२८।।
अर्थ : हे मना, तुझी वासना एका वासुदेवाप्रतीच असू दे. कामवासना तृप्त करणाऱ्या गोष्टीत माझी वासना नसू दे. कामना पूर्ण करण्यासाठी निराधार गोष्टींची कल्पना करीत बसू नको. हे सज्जन मना, यासाठी तू संतांचा सहवास कर.
(कामसंगी – कामवासना तृप्त करणाऱ्या गोष्टी, वाउगी – निराधार/निरर्थक)
विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला धन्य कोणाला म्हणावे ते सांगितले. या श्लोकात ती धन्यता जर आपल्याला प्राप्त करायची असेल, तर काय करायला हवे ते समर्थ सांगतात. आपण संसारी आणि व्यवहारी माणसे. हे जग आणि संसार खरा मानून आपण चालतो. त्या जगात सुख मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या वासना निर्माण होतात. वासना म्हणजे इच्छा. माणूस आहे तिथे वासना असणारच. पण समर्थ म्हणतात की वासना जर करायचीच असेल तर ती वासुदेवाची का नको? कामना ही कधीही चांगल्या गोष्टीची असावी. ती चांगली गोष्ट म्हणजे परमेश्वर. या श्लोकात समर्थांनी ‘रामाची ‘ असा शब्द न वापरता ‘ वासुदेवाची ‘ असा शब्द वापरला. खरं तर श्रीराम हे समर्थांचं उपास्य दैवत. पण समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यांच्यात भेद नाही. एकाच परमेश्वराची ती रूपे आहेत. रामाचे भक्त श्रेष्ठ आणि कृष्णाचे भक्त कनिष्ठ असा फरक करता येत नाही. भगवंताची नावे आणि रूपे भिन्न भिन्न असली तरी तो भगवंत एकच आहे. जो भगवंताचा खरा भक्त असतो, तो परमेश्वरात असा भेदभाव करीत नाही. ” राम कृष्ण हरी ” या मंत्राचा वारकरी मोठ्या भक्तीभावाने जप करतात. यात राम आणि कृष्ण ही दोन्ही दैवते सामावली आहेत. तेव्हा आपल्याला जर काही प्राप्त करण्याची वासना असेल तर ती भगवंत प्राप्तीची का असू नये? म्हणून समर्थ म्हणतात की वासना असलीच तर वासुदेवाची असावी.
या श्लोकात समर्थांनी वासना, कामना, कल्पना असे तीन शब्द वापरले आहेत. आधी कल्पना निर्माण होते. एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे म्हणजे वासना. कामना ही हवेनकोपणाला आसक्तीचे रूप देते. म्हणून समर्थ म्हणतात की हे मना, तुझी वासना, तुझे हवे नको पण वासुदेवाकडे असू देत कामभावना ठेवू नकोस. तू कल्पना कर पण वेडीवाकडी करू नकोस. कल्पना, कामना, वासना चांगल्या ठेव. त्यासाठी सज्जन संगतीत तू रहा. तर पवित्र विचारामुळे तुझ्या विचारात बदल होईल,
परंतु आपली देहबुद्धी प्रबळ असल्यामुळे देहाच्या सुखासाठी आपल्या मनात नाना प्रकारच्या वासना वास करीत असतात. त्या वासनापूर्तीसाठी मन नाना प्रकारच्या कल्पनांत रमत असते. मला यामुळे सुख मिळेल, त्यासाठी असे करू या वगैरे वगैरे. मनोराज्यात रमणाऱ्या शेखचिल्लीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अशा प्रकारे कल्पना करीत राहणे याला समर्थांनी ‘ वाउगे ‘ हा शब्द वापरला आहे. म्हणजे निराधार किंवा वास्तवाशी फारकत घेतलेल्या गोष्टी. तेव्हा समर्थ म्हणतात, ‘ हे मना अशा वाउग्या गोष्टीत रमू नकोस. ‘ त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. ‘ तेच आपल्या हिताचे आहे.
पण हे सगळे साध्य करण्यासाठी समर्थ आपल्याला सज्जनांचा सहवास करायला हवा असे सांगतात. इथे पुन्हा ‘ सज्जन ‘ म्हणजे व्यवहारातील चांगली माणसे किंवा जीवनात यशस्वी झालेली माणसे असा अर्थ नसून सज्जन म्हणजे साधुसंत. तेच आपल्याला खरे समाधान कशात आहे ते सांगतील. आपल्या ज्या जन्मजात वासना आहेत, त्या भगवंताकडे कशा वळवाव्या याचे मार्गदर्शन करतील. जसे विचारांना वळण लावावे लागते, तसे वासनांना देखील चांगल्या मार्गाने जाण्यासाठी एक प्रकारचे वळण लावावे लागते. साधुसंत आपल्या वासनांना तसे वळण लावण्यास मदत करतात. आज समाजातील भोंदू बाबांचा भरलेला बाजार पाहून असे मार्गदर्शन कोण करील? कोणत्या साधुसंताकडे जावे असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पण त्यासाठी संतांचे ग्रंथ आणि त्यातून त्यांनी केलेला उपदेश यांचे पालन करणे म्हणजे एक प्रकारे संतांचा सहवासच आहे. नित्य ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकाराम गाथा किंवा भगवद्गीता यासारखे ग्रंथ आपल्या वाचनात त्यासाठी असावेत.
स्वसंवाद
१. माझ्या मनातील ‘वासना’ केवळ ऐहिक सुख आणि ‘कामना’ पूर्ण करण्यासाठीच धडपडत आहे, की मी तिला चांगल्या मार्गावर (वासुदेवाकडे) वळवण्याचा प्रयत्न करत आहे?
२. शेखचिल्लीप्रमाणे मी केवळ ‘असे झाले तर तसे होईल’ अशा निराधार आणि ‘वाउग्या’ कल्पनेत माझा बहुमूल्य वेळ तर वाया घालवत नाही ना?
३. भगवंताच्या वेगवेगळ्या नावांत किंवा रूपांत (राम-कृष्ण इ.) मी माझ्या मर्यादित बुद्धीने व्यर्थ भेदभाव तर करत नाही ना?
४. आजच्या भोंदू बाबांच्या दांभिक बाजारात न अडकता, मी खऱ्या ‘सज्जनांचा सहवास’ मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा तुकाराम गाथा यांसारख्या ग्रंथांचे नित्य वाचन करतो का?
– क्रमशः श्लोक १२७ आणि १२८
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





