संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माझा साहित्यिक प्रवास… ☆ संगीता कुलकर्णी ☆

☆

माझ्या आयुष्याच्या अनेक रूपांना स्पर्श करणारा एक साहित्यिक प्रवास

आयुष्य कधीच एका रंगात जगता येत नाही… त्याच्या कॅनव्हासवर सकाळच्या कोवळ्या उन्हासारखी स्वप्नं असतात, दुपारच्या उन्हासारखी धग असते, संध्याकाळच्या सावल्यांसारखी हुरहूर असते आणि मध्यरात्रीच्या आकाशासारखी गूढ शांतताही असते.. कधी हातात आलेल्या सुखाची फुलं असतात तर कधी नकळत ओंजळीत साचलेली दुःखाची पानगळ… या सगळ्या रंगांना, ऋतूंना आणि स्पंदनांना शब्दांच्या ओंजळीत जपण्याचा माझा प्रयत्न म्हणजे माझा साहित्यिक प्रवास.

हा प्रवास कधी सुरू झाला हे सांगताना माझ्याकडे एखादी ठाम तारीख नाही.. कारण काही प्रवासांची सुरुवात दिनदर्शिकेवर नोंदली जात नाही ती मनाच्या एखाद्या गुप्त कप्प्यात हळूच उमलते… कदाचित एखादी गोष्ट ऐकताना, एखादं जुनं गाणं मनात साठवताना, पावसाच्या थेंबांकडे खिडकीतून पाहताना किंवा एखाद्या न बोललेल्या भावनेने मनाला स्पर्श करताना त्या प्रवासाची पहिली अक्षरं उमटली असावीत…

लहानपणी शब्द माझ्यासाठी केवळ संवादाचं माध्यम होते.. मोठं होत गेलो तसं जाणवलं

शब्दांमध्ये माणसं राहतात, आठवणी राहतात, ऋतू राहतात, काळ राहतो आणि कधी कधी संपूर्ण आयुष्यही सामावलेलं असतं.

एखादं साधं वाक्यही मनाच्या तळाशी कितीतरी वर्षं तरंगत राहतं. एखादी हाक अचानक बालपणाच्या अंगणात घेऊन जाते.. एखादा सुगंध विस्मरणाच्या कप्प्यात बंद केलेलं एखादं दार उघडतो. एखाद्या जुन्या रस्त्यावरून जाताना पावलांपेक्षा आठवणी आधी चालू लागतात.. साहित्याने मला या सूक्ष्म स्पंदनांकडे पाहायला शिकवलं.

माझ्या आयुष्यात माणसांचं स्थान शब्दांइतकंच महत्त्वाचं आहे.

काही माणसं आयुष्यात आली आणि त्यांनी जगण्याला अर्थाची नवी किनार दिली. काही भेटी क्षणभराच्या होत्या पण त्यांचा ठसा आयुष्यभराचा झाला.. काही नाती रक्ताची नसूनही रक्ताच्या नात्यांपेक्षा जिव्हाळ्याची वाटली… काही माणसं जवळ असूनही दूर राहिली तर काही दूर असूनही मनाच्या अगदी जवळ राहिली…

या सगळ्या नात्यांनी मला माणूस समजून घेण्याची भाषा दिली…

कुणाच्या डोळ्यांतलं न बोललेलं दुःख, कुणाच्या हसण्यातली लपलेली अस्वस्थता, कुणाच्या शांततेमागची घालमेल हे सगळं वाचायला साहित्याने शिकवलं.. त्यामुळेच माझ्यासाठी लेखन म्हणजे केवळ शब्दांची रचना राहिली नाही ते माणसांच्या मनात डोकावण्याचं एक निमित्त बनलं…

कधी कधी एखादा अनुभव इतका खोलवर स्पर्शून जातो की त्याला शब्द देणं म्हणजे स्वतःच्याच जखमेवर हात ठेवण्यासारखं वाटतं.. तरीही शब्दांकडे परतावंसं वाटतं कारण दुःखाला विसरता येत नसलं तरी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहता येतं.. आठवणी पुसता येत नसल्या तरी त्यांना अर्थ देता येतो.. अपूर्णता बदलता येत नसली तरी तिच्यातही एक सौंदर्य शोधता येतं..

माझ्या साहित्यिक प्रवासाने मला हेच शिकवलं प्रत्येक वेदना ही फक्त वेदना नसते तिच्या तळाशी एखादी जाणीव दडलेली असते…

माझ्या लेखनात म्हणूनच केवळ आनंद नाही आणि केवळ दुःखही नाही. तिथे दोघांचं एकत्र वास्तव्य आहे. पावसासोबत मातीचा गंध आहे आणि उन्हासोबत सावलीची आस आहे.. भेटीसोबत विरह आहे आणि विरहासोबत पुन्हा भेटण्याची अस्पष्ट आशा आहे…

आयुष्याच्या एका टप्प्यावर मला जाणवलं आपण जगतो त्यापेक्षा आपण जे आठवतो त्यातही आपल्या अस्तित्वाचा मोठा भाग दडलेला असतो…

आठवणी म्हणजे मनाच्या घरात ठेवलेल्या जुन्या पेट्या.. त्या उघडल्या की त्यातून कधी बालपणाचा सुगंध बाहेर पडतो, कधी एखाद्या आवाजाची चाहूल लागते, कधी एखाद्या व्यक्तीची सावली दाराशी येऊन उभी राहते. साहित्याने मला त्या पेट्या जपायला शिकवल्या.. विसरून जाण्याऐवजी स्मरण करण्याची, गमावलेल्या क्षणांकडे कृतज्ञतेने पाहण्याची दृष्टी दिली..

माझ्या प्रवासात एकटेपणाचाही मोठा वाटा आहे.

एकटेपणा सुरुवातीला रिकामा वाटतो पण त्याच्याशी मैत्री झाली की त्यात अनेक आवाज ऐकू येतात स्वतःच्या मनाचा, आठवणींचा, स्वप्नांचा आणि कधी काळाच्या शांत पावलांचा… त्या शांततेतच अनेक शब्द जन्माला आले. बाहेरच्या जगाचा गोंगाट कमी झाला की आतली भाषा अधिक स्पष्ट ऐकू आली…

कागदासमोर बसताना कधी असं वाटतं की मी लिहित नाही माझ्यात साचलेलं काहीतरी स्वतःहून शब्दांचा मार्ग शोधत आहे. एखादं वाक्य येतं आणि त्यामागून दुसरं, मग तिसरं. कधी शब्द धावत येतात तर कधी एक शब्दही हातात येत नाही.. अशा वेळी कोरं पान माझ्याकडे पाहत राहतं आणि मी त्याच्याकडे…

पण त्या शांततेतही एक संवाद असतो..

कारण साहित्याने मला शब्दांपेक्षा मौन ऐकायला शिकवलं आहे..

कविता लिहिताना मन अधिक हळवं होतं.. कथा लिहिताना माणसांच्या जीवनात शिरावं लागतं.. लेख लिहिताना स्वतःच्या विचारांना प्रश्न विचारावे लागतात. प्रत्येक साहित्यप्रकाराने माझ्यातील वेगवेगळ्या व्यक्तीला जागं केलं. कधी मी स्वप्नाळू झाले, कधी निरीक्षक, कधी प्रश्न विचारणारी, कधी स्वतःशीच वाद घालणारी..

अशा रीतीने साहित्याने माझ्या आयुष्याच्या अनेक रूपांना स्पर्श केला.

माझ्यातली मुलगी त्याला बालपणाच्या अंगणात घेऊन गेली

माझ्यातला स्वप्नाळू त्याला न पाहिलेल्या क्षितिजांकडे घेऊन गेला.

माझ्यातला संवेदनशील माणूस नात्यांच्या सूक्ष्म धाग्यांना स्पर्श करू लागला.

माझ्यातला एकटा जीव रात्रीच्या शांततेत स्वतःला शोधू लागली

आणि माझ्यातली लेखिका कवयित्री या सगळ्यांना एका पानावर एकत्र आणू लागली.

या प्रवासात मला प्रसिद्धीपेक्षा आत्मिक समाधान अधिक महत्त्वाचं वाटू लागलं. एखाद्या वाचकाने एखादा शब्द वाचून स्वतःचीच आठवण त्यात शोधली, एखाद्या वाक्याने त्याच्या मनाला स्पर्श केला, एखाद्या कथेत त्याला स्वतःचा चेहरा दिसला तर लेखनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं कारण साहित्य हे लेखकाचं एकट्याचं नसतं. एकदा शब्द कागदावर उतरले की ते वाचणाऱ्याच्या अनुभवांचेही होतात.

माझ्या साहित्यिक प्रवासाने मला स्वतःपासून दूर नेलं नाही उलट स्वतःजवळ आणलं. मी जे लिहिलं त्यातून मी मला अधिक ओळखत गेली.. माझ्या कमतरता, माझी स्वप्नं, माझ्या भीती, माझी माणसं, माझ्या आठवणी

सगळं शब्दांच्या आरशात दिसत गेलं.

आता मागे वळून पाहताना वाटतं हा प्रवास एखाद्या नदीसारखा आहे. त्याचा उगम कुठे झाला हे सांगता येत नाही पण त्याने अनेक किनारे स्पर्शले आहेत. काही ठिकाणी त्याला खडक भेटले, काही ठिकाणी फुलांनी भरलेले काठ, काही ठिकाणी अथांग शांतता तरीही त्याचा प्रवाह थांबला नाही…

आजही एखादं कोरं पान समोर आलं की मनात एक हळवी उत्सुकता जागी होते.

या वेळी कोणता अनुभव शब्द होईल?

कोणती आठवण पुन्हा दार ठोठावेल?

कोणतं नातं नव्याने अर्थ देईल?

कोणती वेदना कवितेत रूपांतरित होईल?

आणि कोणतं स्वप्न अजूनही मनाच्या आकाशात आपली जागा शोधत असेल?

मला उत्तरं माहीत नसतात पण कदाचित साहित्यिक प्रवासाचं खरं सौंदर्य उत्तरांमध्ये नसतंच ते प्रश्न जिवंत ठेवण्यात असतं..

म्हणूनच हा प्रवास मला प्रिय आहे. कारण या प्रवासात मी केवळ लिहित गेली नाही.. मी जगत गेली, अनुभवत गेली, हरवत गेली, सापडत गेली आणि प्रत्येक वेळी नव्याने स्वतःला वाचत गेली

माझ्या आयुष्याच्या अनेक रूपांना स्पर्श करणारा हा साहित्यिक प्रवास म्हणजे माझ्या अस्तित्वाचीच एक दीर्घ कविता आहे.

काही ओळी आनंदाच्या, काही अश्रूंच्या, काही आठवणींच्या, काही स्वप्नांच्या आणि काही अजूनही न लिहिलेल्या… आणि त्या न लिहिलेल्या ओळींचीच तर सर्वांत सुंदर प्रतीक्षा आहे कारण आयुष्य अजून संपलेलं नाही..

म्हणून माझ्या शब्दांची वाटही अजून संपलेली नाही.

उद्याच्या कोऱ्या पानावर कदाचित माझंच एखादं नवं रूप माझी वाट पाहत असेल

आणि मी, हातात लेखणी घेऊन,

त्या रूपाला पुन्हा एकदा

शब्दांच्या प्रकाशात भेटत असेन…

☆

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted