श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “नवी गुलामी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
भाचीच्या साखरपुड्याला जायचं असल्यानं नाना-नानीची आवराआवर सुरू होती. चटकन आवरून तयार झालेले नाना ओरडले “चल, लवकर किती वेळ? ”
“आलेच, दोन मिनिटं”नानी आल्यावर दोघं घराबाहेर पडले. हॉलमध्ये पोचल्यावर नातेवाईकांच्या भेटी, विचारपूस झाल्यावर नेहमीच्या सवयीनं नानांनी खिशातून मोबाइल काढला आणि एकदम दचकले. चेहरा पडला. खिसे चाचपू लागले. नानांना प्रचंड टेंशन आलं. तडक नानीकडं गेले. वैतागलेला चेहरा पाहून नानींनी विचारलं “का हो? बरं वाटत नाहीये का”
“मी ठीकयं पण फार मोठा घोटाळा झालाय. ”
“काय झालं? ”
“घरातून निघताना गडबडीत तुझाच मोबाइल खिशात टाकला आणि माझा मोबाइल टेबलावरच राहिला. ”
“एवढंच ना. ”नानींनी हात झटकले. त्याचा नानांना फार राग आला.
“पासवर्ड सांग कॉल करून फोन घरीच राहिलाय याची खात्री करून घेतो. नानींनी पासवर्ड टाइप करून दिला. रिंग वाजत होती म्हणजे मोबाइल घरातच होता. नानांचा जीव भांड्यात पडला.
“रिलक्स!! ”नानी
“तुला काहीच कसं वाटत नाही. ”
“त्यात काय वाटायचं. एवढं हायपर कशाला होताय. मोबाइल घरीच राहिलाय हरवला नाही”
“म्हणजे तुझी इच्छायं का हरवायला पाहिजे. ”
“खरं तर… पण स्पष्ट बोलले तर तुम्हाला राग येईल. त्यापेक्षा जाऊ दे. ”
“एवढं सुनावलसं. अजून काही राहीलं असेल ते तेही बोलून टाक. मला मोबाईलशिवाय बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. ”
“खूपच!! . त्या बिचाऱ्या फोनलासुद्धा आज विश्रांती मिळेल. रोज चौदा-पंधरा तास काम करतो. ”
“टोमणे मारून झाले असतील तर उपाय सांग”
“सगळ्यात आधी माझा मोबाइल दया आणि आज मोबाईल उपास करा. कार्यक्रमाला आलोय. खा, प्या, गप्पा मारा. एंजॉय करा. घरी गेल्यावर परत सेवेला मोबाइल आहेच. ”
“उपदेश नको. उपाय सांग. ”
“मग काय करायचं ते करा. माझं डोकं खाऊ नका”तिथंच घुटमळणाऱ्या नानांकडे दुर्लक्ष करत नानी बहीणी बरोबर बोलू लागल्या. हातात फोन नाही म्हणजे शरीराचा एक भाग नाहीये असं नानांची भावना झालेली. खूप बेचैन झाले. कुणाकुणाचे कॉल आले असतील. महत्वाचे मेसेज आले असतील, आपल्याकडून उत्तर नाही गेलं तर गैरसमज होतील. मोबाइल विसरतो म्हणून सगळे चेष्टा करतील. स्वतःच्या वेंधळेपणाचा राग आलेले नाना खूप अस्वस्थ झाले. कार्यक्रमातलं लक्ष उडालं. डोक्यात फक्त फोनचाच विचार. धड बोलत नव्हते. कोणी भेटलचं तर बळेबळेच हसायचे, दोन शब्द बोलायचे. खुर्चीवर बसायचं, उठायचं, पाणी प्यायचं. पुन्हा पुन्हा खिसे चाचपायचे, येरझारा मारायच्या असं चाललेलं. कासावीस झालेल्या नानांच वागणं नानी पाहत होत्या. आत्ता काही बोलणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं होतं म्हणून नानी गप्प बसल्या. रात्री घरात पाऊल ठेवल्याठेवल्या नानांनी अक्षरश: मोबाइलवर झडप घातली. चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद होता. तब्बल पाच तासांनी हातात आलेल्या मोबाइलच्या आभासी विश्वात हरवलेल्या नानांकडे हताशपणे नानी पाहत राहिल्या.
लहान-थोर, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत सर्वांनाच मोबाइलनं पार वेडं केलंय. मोबाईलची नवी गुलामी सर्वांनी आनंदानं स्वीकारलीयं. तो सोबत नसेल तर आपलीही अवस्था नानांसारखीच होते.
“मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र” ही अत्यावश्यक गरज हे नक्की!!
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





