अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ पद्मभूषण सई परांजपे! – लेखक : श्री सचिन देशपांडे ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆
एका रशियन चित्रकाराची ही मुलगी, एका कोकणस्थ ब्राम्हण बाईच्या पोटी जन्माला आलेली. आणि ती कोकणस्थ बाई सुद्धा अशी तशी कोणी नाही, तर रँगलर परांजपे यांची सख्खी मुलगी. तर ह्या पिठ्ठ गोर्या नी घार्या मुलीच्या जन्मानंतर… लगेच तिच्या रशियन बाबांनी घटस्फोट घेतला होता, तिच्या हिंदू ब्राम्हण आईशी. आणि हे चिमुकलं रोपट गेलं रुजायला, रँगलर परांजपेंच्या संस्कारांच्या कसदार मातीत. अशा तर्हेने शकुंतलाबाई परांजपेंच्या ह्या एकुलत्या एका लेकीवर, म्हणजेच ‘सई’ वर… अगदी लहानपणापासूनच उच्चकोटीचे संस्कार झाले.
गणितज्ञ आजोबांच्या बदल्यांमुळे, सई ह्यांचं शिक्षण भारतातील बर्याच शहारांतून झालं. काही काळ तर ऑस्ट्रेलियातही… जेव्हा आजोबा रँगलर परांजपे, भारताचे ऑस्ट्रेलियातील ‘हाई कमिशनर’ होते. अशा सरस्वती नांदणार्या घरीच मोठ्या होत असलेल्या सईंचं… स्वतः लिहिलेलं पहिलं पुस्तक प्रकाशीत झालं, त्यांच्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी… आणि पुस्तकाचं नाव होतं ‘मुलांचा मेवा’. अतिशय तल्लख बुद्धिमता असणार्या सई ह्यांनी, आपलं ग्रॅज्युएशन पुर्ण केलं दिल्लीच्या ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ (NSD) मधून १९६३ साली. मग ऑल इंडिया रेडिओ, पुणे येथून कार्यभार सांभाळत असतांना… त्यांना संधी मिळाली लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमांची रुपरेषा आखून, ते सादर करायची… आणि सईंनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं.
नजिकच्या काळात मग सई ह्यांनी… दूरदर्शनसाठी काही टेलीफिल्म्सही लिहिल्या, दिग्दर्शीत केल्या. १९७० साली सईंची ‘चेअरपर्सन’ म्हणून निवड झाली, ‘चिल्ड्रेन्स फिल्म सोसाईटी ऑफ इंडिया’ (CFSI) वर. भारत सरकार पुरस्कृत या संस्थेचा उद्देश होता… लहान मुलांसाठी शिक्षण अन् मनोरंजनाची योग्य सांगड घालत, दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती करणं. आणि सईंनी त्यांच्या येथील कार्यकाळात, चार यशस्वी बालचित्रपट बनवले.
पण आता सईंना खुणावत होतं एक विस्तिर्ण आकाश, भरारी मारण्यासाठी. आणि त्यांनी लवकरच आपले पंख पसरवलेही… स्वतःचा पहिला पुर्ण लांबीचा हिंदी चित्रपट लिहून, दिग्दर्शीत करुन… ‘स्पर्श’. नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमी ह्या जोडीने प्रमुख भुमिका निभावलेल्या ह्या अप्रतिम चित्रपटाला, १९८० सालची बरीच फिल्मफेअर पारितोषिकं मिळाली. आणि त्या खेरीज राष्ट्रिय पारितोषिकही पटकावलं होतं ‘स्पर्श’ ने. ह्याच चित्रपटात आधी, संजीव कुमार आणि तनुजा काम करणार होते… पण काही कारणांस्तव ते फिस्कटलं. तनुजा ने तिच्या एका मुलाखतीत… One of the great regrets of my life म्हंटलं होतं, ह्या हुकलेल्या संधीला. स्पर्श नंतरच्या दोन वर्षांत, दोन अतिशय दर्जेदार असे विनोदपट दिले सईंनी… ‘चश्मेबद्दुर’ आणि ‘कथा’. हे दोन्ही चित्रपट मैलाचा दगड ठरले होते, हिंदी चित्रपट सृष्टीतील. ‘चश्मेबद्दुर’ हा टिपिकल दिल्ली साईडचा, नाॅर्थ कल्चर दाखवणारा चित्रपट होता. तर ‘कथा’ होता मुंबईतील एका सर्वसामान्य चाळीची जीवनशैली दाखवणारा… चक्क ‘ससा नी कासव’ ह्या बालकथेवर आधारीत. यावरून सई ह्यांची, वेगवेगळ्या संस्कृतीच्या अभ्यासातील डेप्थ कळून येते. या दोन्ही चित्रपटांत सईंची आवडती जोडी होती, फारुख शेख आणि दिप्ती नवल. अभिजात कलाकृतीचा नमुना ठरले होते… सई ह्यांचे हे पाठोपाठ वर्षी आलेले, लागोपाठचे तिन्ही चित्रपट.
यापुढे सई वळल्या, चक्क छोट्या पडद्याकडे. आणि तिथेही त्यांचा अत्युत्तम दर्जा, कसोशीने राखला त्यांनी… ‘अडोस – पडोस’ आणि ‘छोटे – बडे’ सारख्या मालिका देऊन. त्यानंतर १९९०, १९९३, १९९७ साली सई ह्यांचे तीन हिंदी चित्रपट आले… अनुक्रमे ‘दिशा’, ‘पपिहा’ आणि ‘साज’. यांतील ‘साज’ तर चक्क मंगेशकर भगिनींच्या आयुष्यावर बेतला आहे, असं त्यावेळी प्रचारित झालं होतं… आणि त्यामुळेच बर्यापैकी वादग्रस्तही ठरला होता तो. ह्यात ‘लताबाई’ झाल्या होत्या अरुणा इराणी… तर ‘आशाबाई’ साकारलेल्या, शबाना आझमी ह्यांनी. तबलानवाझ झाकिर हुसैनही झळकले होते ह्या चित्रपटात, अभिनेता म्हणून. ह्या सहा प्रमुख चित्रपटांव्यतिरीक्त सईंनी ‘भागो भूत’, ‘चकाचक’ हे चित्रपट आणि ‘सुई’ ही डाॅक्युमेंटरी फिल्म ही बनवली… पण त्यांच्या ह्या कामांची मात्र, विशेष अशी दखल घेतली गेली नसावी. मध्यंतरीच्या काळात सई ह्यांनी ‘सख्खे शेजारी’ आणि ‘माझा खेळ मांडू दे’ अशा काही नाटकांद्वारे… मराठी रंगभूमीवरही आपल्या यशाची पताका, दिमाखात फडकावली होती. आत्ता हल्लीच… म्हणजे वयाच्या ८६-८७ व्या वर्षी, सईंनी ‘इवलेसे रोप’ ह्या व्यावसायिक नाटकाच्या लेखन – दिग्दर्शनाद्वारे… रंगभूमीवर पुनर्पदार्पण करून, जनसामान्यांना अचंबित करून सोडलं होतं.
तर अशा ह्या ‘एक्स्ट्राॅऑर्डिनरीली ब्रिलियंट’ बाईंनी… पंचावन्नाव्या ‘नॅशनल फिल्म ऍवाॅर्ड्स’ च्या पॅनेलवर, ज्युरी म्हणूनही काम पाहिलेलं आहे. सई ह्यांच्या योगदानाची योग्य दखल घेत…
२००६ साली त्यांचा, ‘पद्म भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
भारतीय चित्रपटसृष्टीत अमुल्य कामगीरी करणार्या स्त्री शक्तीतील, एक निर्विवादपणे अग्रणी असलेलं नाव म्हणजेच ‘सई परांजपे’… ज्यांना आज ८८ वर्ष पुर्ण झालेली आहेत. अशा ह्या अद्वितीय बाईला, जन्मदिनाच्या कोट्यावधी शुभेच्छा.
लेखक : सचिन श. देशपांडे
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





