श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१७
☆ झाड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
माणूस
धर्तीवर जन्मला आला
अंगा पिंडाने वाढता वाढता
रांगू लागला
आई-वडीलांचे बोट धरून
चालू लागला
पराक्रमाने
आकाशाला भिडला
चंद्रावर गेला
पाण्यात उतरला
समुद्राचा तळ गाठला
पण त्याला
झाड होता आलं नाही
झाड
माती खाली
जन्म घेतं
वर येतं
वाढू लागतं
पण मातीला
विसरत नाही
जेवढं वर वाढतं
तेवढंच ते
मातीच्या
पोटात घुसतं
झाडं
मातीला सोडत नाहीत
ग्रीष्मात,
शिशिरात
आणि पावसात देखील
माणूस मात्र
माती, घर, नाती
सारं सोडायला तयार होतो
माणसाला
वाढता येतं
पण
त्याची ओढ
मूळाकडे कधीच नसते…
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






