श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ ध्यास… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
घडुन घडत नाही सर्व ही कष्ट वाया
झिजत शिणत राही व्यर्थ ही नित्य काया
फिरुन परत लागे यावया; बंद सारे
बुडवत हसणारे भेटलेले किनारे
*
फळत फुलत नाही स्वप्न.. आशा मनीची
छळत.. सलत राही धार ही श्रावणाची
टळुन टळत नाही दैव हे दु:खदायी
निसटुन पळण्याची जन्मत: सोय नाही
*
अवजड दिवसांचे घेऊनी नित्य ओझे
कण्हत.. थकत चाले, धापती श्वास माझे
हरतच जगण्याचे चालले खेळ सारे
मरणहि हुलकावी, वाकुल्या दावणारे
*
तरिपण विजयाचा सोडला ध्यास नाही
अवखळ जगण्याची सोडली कास नाही
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




