सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७७ / १ – ग्रँड कॅन्यन ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ग्रँड कॅन्यन.

असं म्हणतात की तुम्ही अगदी जाज्वल्यपणे एखादं स्वप्न बाळगलं असेल तर कधीतरी ते प्रत्यक्षात साकार होतंच.

अॅरीझोना स्टेट अमेरिका येथील ग्रँड कॅन्यन कधीतरी पहायला मिळावंं हे माझं अगदी शाळेत असतानापासूनचे स्वप्न होते. आणि ते अगदी अलीकडेच म्हणजे २०२२ साली माझी अमेरिकास्थित लेक ज्योतिका हिच्यामुळे प्रत्यक्षात अवतरले.

आतापर्यंतच्या भ्रमंतीतली ही वेगळाच अनुभव देणारी, निसर्गाचा निराळाच अविष्कार दाखवणारी अविस्मरणीय सफर होती. माझी नात सायरा, ज्योतिका, मी आणि विलास अटलांटाहून अमेरिकन एक्सप्रेसच्या विमानाने अॅरिझोना स्टेट मध्ये फ्लॅगस्टाफ या गावात आलो. आमच्या प्रवासात डॅलसला चार तासाचा हाॅल्ट होता.

 

ग्रँड कॅन्यनला जाण्यासाठीचे हे पर्यटन स्थळ आहे.

इथल्या स्थानिक वेळेनुसार आम्ही रात्री साडे नऊला पोहचलो. ज्योतिकाने कार रेन्ट केली. सुंदर, मोठी ऐसपैस कार.

डलासला आम्ही डिनर घेतलेच होते. एग रोल्स, फ्राईड राईस, चिकन नुडल्स वगैरे.

फ्लॅगस्टाफला हाॅलीडे इन मध्ये बुकींग होतेच.

छान आरामदायी हाॉटेल.

लगेच झोपेच्या अधीनच झालो. प्रवासाने थकवा आलाच होता. अटलांटा आणि अॅरीझोनाच्या वेळेत तीन तासाचा फरक आहे.

दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. ज्योतिकाने दिवसभराची भटकंती योग्य पद्धतीने आखलेली होतीच.

ब्रेकफास्ट घेउन आम्ही लगेच निघालो. ज्युस, दही सीरीअल्स, आॅम्लेट वगैरे अमेरिकन ब्रेकफास्ट होता.

आजचे ध्येय होते *हाॉर्स शू बेन्ड हिल्स.. *

ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. अॅरीझोना म्हणजे जगातील सर्वांत मोठे वाळवंट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला विस्तीर्ण ओसाड प्रदेश. मध्ये मध्ये दिसणारी खुरटी पण हिरवट झुडुपे. गडद पिवळ्या रंगाची रानफुले. लालसर रंगाचे गवत. लांबच लांब पसरलेले पर्वत. अगदी निरभ्र निळे अथांग आकाश. निसर्गाचं एक अत्यंत निराळं पण देखणं रुप पाहून विस्मयीत झालो. भारतातले कच्छचे रणही आठवले. वाटेत अनेक नैसर्गिक सँड ड्युन्स दिसले. अगदी रचून ठेवलेल्या वाळूच्या ढिगार्‍यासारखे दिसत होते. आता आम्ही संपूर्ण डोंगरांच्या विळख्यातच होतो जणू जिथे पहाल तिथे हे लाल रंगांचे दगडी कॅन्यन. या डोंगरांमध्ये निसर्गानेच अनंत आकाराची शिल्पेच बनवली आहेत जणू! इतकी रेखीव आणि आकृतीबंध! बघणार्‍याच्या नजरेने त्या शिल्पांना कुठलीही नावे द्यावीत. महाल, मंदीरे, कळस, मखर, गाभारे नृत्यांगना, राजे, प्राणी, काहीही. अतिशय रेखीव आणि कोरीव. आणि हे सारंं नैसर्गिक. मानवनिर्मीत शिल्पकला आतापर्यंत ठिकठिकाणी पाहिल्या. पण इथे एकमेव शिल्पकार, केवळ निसर्ग. आम्ही रस्त्यात थांबत, फोटो काढत या निसर्गाच्या अप्रूपतेच्या आठवणी साठवत होतो.

हाॅर्सशूबेन्ड हाही एक नैसर्गिक चमत्कारच आहे. एका उंच डोंगराभोवती घोड्याच्या नालेसारखी कोलॅरॅडो नदी वळसा घेत वाहते. आम्ही व्ह्यु पाॉईंट वरुन हे मनोहर दृष्य डोळ्यात साचवले. हिरवीगार संथ नदी. जणू इतस्तत:विखुरलेल्या डोंगरांची सखीच.

 

व्ह्युपाॅइंटपर्यंत बरेच चालावे लागले होते. रणरणतं उनही होतं. मात्र हवेत सुखद गारवा होता. वार्‍याच्या झुळकी आनंददायी होत्या. प्रदूषणरहित वातावरण. आणि डोक्यावरचे नितांत निळे आकाश. त्यामुळे उन्हातले चालणे सुद्धा अजिबात कष्टदायी नव्हते.

 

मी सहज म्हटलं, भारतात अशा ठिकाणी खाद्य पेयांच्या टपर्‍या असतात. इथे तसे काहीच नाही.

माझी नात लगेच म्हणाली”, here they dont want to ruin the nature–”

किती खरे आहे हे!!

इथे फक्त निसर्गाच्या सहवासात रहा. आनंद जपा, आनंद वेचा.

 

*ग्रँड कॅन्यन रेलरोडटुर* तर्फे केलेला आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पाही एक वेगळाच अनुभव देणारा होता. सकाळी आठ वाजता आमच्या हाॅटेलवर ट्रॅव्हल्सची व्हॅन घ्यायला आली.

व्हॅन एकदम आरामदायी होती. आम्ही दहा प्रवासी होतो.

निरनिराळ्या देशातील लोक होते ते. आमचा ड्रायव्हर एकदम हसतमुख आणि भरपूर बोलका होता. संपूर्ण प्रवासात तो अनेक किस्से, भौगोलिक माहिती आम्हाला पुरवत होता.

गेट टू ग्रँड कॅन्यन या रेल्वेस्टेशनवर आम्ही एका ट्रेनमध्ये बसलो. हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होता. गाडीत सर्व सुखसोयी आणि स्वच्छता होती. मधून मधून प्रवाश्यांची खबरबात घेणारा मदतनीसही होता. तो अॅरीझोना स्टेटचा इतिहासही सांगायचा. फोटोग्राफर होती. गिटारवादक होता. त्याने सुरेल संगीताने प्रवाशांचे मनोरंजन केले. पाईन ट्रीच्या जंगलातला हा आगगाडीचा संथ प्रवास अगदी अविस्मरणीय होता.

आम्ही ग्रँड कॅन्यन स्टेशनला पोहचलो. दोन तासाचा हा आगगाडीचा प्रवास कसा संपला ते कळलेच नाही.

इथे आमची व्हॅन व ड्रायव्हर हजरच होते.

प्रथम लंच घेतले. आणि नंतर प्रत्यक्ष ग्रॅड कॅन्यन ची सफर सुरु झाली. अतिशय सुंदर, रेखीव आखीव गाव. इथे रहाण्यासाठी बैठे बंगले असतात. पण त्यासाठी तीन वर्षे आधी बुकींग करावे लागते.

पहिल्या व्ह्यु पाॅईंटला आम्ही उतरलो आणि निसर्गाच्या त्या विस्तीर्ण, भव्यतेच्या दर्शनाने नि:शब्द झालो. अमेरिकेतल्या सात आश्चर्यांपैकी ग्रँड कॅन्यन हे एक नैसर्गिक भूगर्भीय आश्चर्य!

कॅन्यन म्हणजे दरी. खिंड. आणि या दरीतली पर्वतासमान भासणारी अनेक आकारांची नैसर्गिक शिल्पे.

कोलोरॅडो नदीचा प्रवाह इथे पहायला मिळतो. जमीनीतून वर झेपावणारे असंख्य खडक या नदीच्या पाण्याच्या दाबाने कातरत गेले. शिवाय वाराही या खडकांना सतत कापत असतो आणि त्यातून ही असंख्य शिल्पे तयार झाली आहेत. आणि मैलौन् मैल ती पसरलेली आहेत. बघणार्‍याच्या नजरेला जो दिसेल तो आकार. इथे राजवाडे, मंदीर दालने, गड किल्ले, गाभारे, माणसे प्राणी पक्षी अगदी गणपती, नंदीबैल, गरूड पक्ष्यांसारखे आकार इथे पहायला मिळतात. एक अॉस्ट्रेलिअन माझ्या जवळ आला, आणि म्हणाला, ”see over there, an indian temple of God Mahadeo” क्षणभर मलाही ते तसेच वाटले. आणि जगभरात भारतीयांचं इशप्रेम किती प्रसिद्ध आहे हे जाणवले.

 निसर्ग हाच किमयागार.

आम्ही इथे डक अॉन द राॅक या पाॅइंटवर उतरलो.

अक्षरश: एक धारधार चोचीचं बदक पंख आत गोळा करुन एका प्रचंड दगडावर बसलंय् आसाच भास होतो.

१९५० साली आयसेन हॉवरने या ठिकाणी भेट दिली होती.

त्यावेळी ते एक सामान्य नागरिक होते. त्यानंतर ते अमेरिकेचे प्रेसीडेंट बनले.

अर्थात हे सर्व आकार वारा वादळ पाण्यांनी बदलू शकतात.

शंभर वर्षानंतर इथे कदाचित हे आकार नसतील. ते बदललेले असतील.

ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याचा अनुभवच इथे जणू घेता आला.

एक घारीसारखा पक्षी आकाशात विहरत होता. क्षणभर मला वाटले यांच्या पंखावर बसावे आणि या भव्य दरीतली

ही निसर्गाची किमया न्याहळावी.

स्वर्ग म्हणजे आणखी वेगळे काय असेल.??

थोडे पुढे गेल्यावर वॉच टाॅवर पाॉईंटला कोलोरॅडो नदीचा प्रवाह पहायला मिळाला. याठिकाणी मात्र तिचा प्रवाह 

मलीन वाटला.

 

नोव्होवा नावाची एक इंडीअन जमात इथे आहे. त्यांनी त्यांचं हेरीटेज जपलेलं आहे. बदलत्या जगाचा भाग त्यांना 

व्हायचे नाही. अॅरीझोनाचा काही भाग हा त्यांचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून मानला जातो. तिथे अमेरिकन फेडरल रुल नसून

नोहोव्हा जमातीचे रुल्स आहेत. त्यांचा अध्यक्षही निराळा आहे. आम्ही ग्रँड कॅन्यनहून परतताना नोवोव्हा रीझोल्युशनला भेट दिली. तिथे मास्क घालणे सक्तीचे होते.

त्यांचे आर्ट आणि क्राफ्ट चे दुकान सुंदर होते. तिथे त्यांची

जीवनपद्धती दाखविणार्‍या कलाकृती पहायला मिळाल्या.

त्यांच्या जीवनाचे एकच ध्येय या पृथ्वीचे रक्षण. निसर्गाला 

मूळ स्वरुपातच सांभाळणे.

मनात आले, खरोखरच आज काळाची ही गरज आहे…

 

याच सफरीतले आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे. *lower Antelope canyon. *

आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.

इथूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने तिचे बुकींग दाखवले.

आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली, । इथे दोघांचच बुकींग दिसतय्”. सायराचे नावच नव्हते. ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे 

तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नोलाॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!

साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.

आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला.

– क्रमशः भाग ७७ / १ 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted