उज्ज्वला केळकर
☆ मी एकविसाव्या शतकातील स्त्री… ☆ उज्ज्वला केळकर ☆
मी दोन हजार सव्वीसच्या काळातील स्त्री. मी सुशिक्षित आहे. सुसंस्कारितही आहे. मी सुजाण आहे. संवेदनाशील आहे. इतरांची सुख-दु:ख मला माझी वाटतात. मी अशी आहे… तशी आहे… हे काही मीच माझं वर्णन करत नाही. माझ्या आस-पासचे, भवतालचे लोक याची खात्री देतील. विचारा वटलं तर माझ्या शेजार्या – पाजार्यांना.
मी २०२२मधील स्त्री. मला हवं आहे, मोकळं निरभ्र आकाश, मनमुक्त विहार करण्यासाठी. मला हवा आहे, माझा मोकळा अवकाश, ज्यात मी माझ्याशी संवाद कारेन. माझे आनंदक्षण गोंजारत राहीन. माझी दु:खे कुरवाळीन. मी कोणती चांगली कामे केली, इतरांच्या दृष्टीने उपयुक्त असं काय केलं, हे मी तिथे आठवेन. तिथे मी माझ्या चुकांचा मागोवा घेईन. त्यावर विचार करेन. माझ्या भविष्याच्या योजना आखेन, असा मोकळा अवकाश (स्पेस) हवाय मला. पण खरंच का असं निरभ्र आकाश आणि मोकळा अवकाश मला उपलब्ध आहे?’
मला वाटलं, माझ्या आईच्या आणि त्याहीपेक्षा आजीच्या काळातील स्त्रियांच्या तूलनेत, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धा आणि उत्तरार्धापेक्षा माझं आकाश अधीक मोकळं आणि स्वच्छ आहे. निरभ्र आहे पण जसजसा विचार करू लागते, तसतसं लक्षात येतं, माझ्याही आकाशात समस्यांचे ढग आहेतच. माझ्या आजीच्या काळातील स्त्रियांचा वावर अंगणापलीकडे मंदिर, पापड-कुरडया करण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी मैत्रिणींकडे जाणं, एवढाच मर्यादित होता. माझ्या आईच्या काळातील स्त्रिया अंगण ओलांडून बाहेर पडल्या. नोकरी करू लागल्या. पण घर-संसार, मुलं-बाळं, नवर्याचं, असतील तर सासू-सासरे यांचं सगळं सांभाळून नोकरी करायची अशी पूर्वअट होती. नोकर्या बहुतेक शिक्षिकेच्या किंवा कार्यालयात कारकुनाच्या असत. बदली नोकर्यांना घरच्यांचा विरोध असे. तिचीही मानसिकता नव्हतीच. तिनेही आपलं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ते सारं सहन केलं. त्यावेळेपर्यंत विभक्त कुटुंबपद्धती समाजात रूळली होती.
आजच्या स्त्रीला त्या मानाने कमी कष्ट करावे लागताहेत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे घरात मिक्सर, गीझर वगैरे सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अलीकडे पुरुषही घरकामात मदत करू लागले आहेत. पूर्वीच्या तूलनेत माझं आजचं जीवन अधीक आरामदायी झालं आहे.
आजच्या काळात घरोघरी एक किंवा दोन मुले पुरेत, असा दृष्टीकोण दिसून येतो. सहजच मनात येतं, पुढच्या पिढीला काका, मामा, मावशी, आत्या ही नाती तरी समजावून सांगता तेथील का? अलीकडे मुलांच्या जन्मापासून पालक त्यांच्या करिअरचा विचार करू लागली आहेत. त्यांचं जीवन करियरकेन्द्रित होतय. आता मुली, मुलांच्या बरोबरीने शिकताहेत. ही गोष्ट चांगलीच आहे. शिक्षण झालं की त्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागते. उत्तम पगार मिळतो. त्यांना घर, शहरच नव्हे, तर राज्य आणि अनेकदा दुसरं राज्यही सोडून, दुसर्या देशात जाऊन रहावं लागतं. मुले-मुली अशी स्वतंत्रपणे राहू लागल्याने आता समाजाची वाटचाल एकल कुटुंबाच्या दिशेने होऊ लागली आहे. एकेकटे रहात असतील, तर त्याला कुटुंब तरी म्हणायचं का? असा प्रश्न आहे.
कुटुंबात एकेकटी मुले असल्याचे प्रमाण खूप आहे. त्यांना तडजोडीची सवय, दुसर्याचा विचार करण्याची सवय लहानपणापासूनच लागलेली नाही. त्यामुळे विवाहानंतर घरस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. एरवी स्त्री-पुरुष समान, असं आग्रहाने म्हणणार्या मुलींना आपला जोडीदार मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पगारदार हवा असतो. तिच्या आई-वडलांचीही तशीच इच्छा असते. इथे कुठे तरी वैचारिक विसंगती नाही का वाटत?
मुला-बाळांसाठी, त्यांच्या संगोपनासाठी करिअरमध्ये तडजोड कुणी करायची, आईने की वडलांनी हाही प्रश्न दिवसेंदिवस आ वासून उभा आहे. मुलांचे आजी-आजोबा मुलांकडे बघणारे नसतील, तर मुलंच नकोत. दोघंच मजेत राहूयात, असं म्हणण्याची वृत्ती बाळवतेय. हातात भरपूर पैसा असल्यामुळे ऐशोआराम, चंगळवादी वृत्तीही वाढीला लागलीय. मुलंच नको, या विचारांच्या दिशेने समाजाची वाटचाल होऊ लागली, तर पुढच्या पिढ्या तरी कशा निर्माण होणार? लग्नच नको, लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असं म्हणणार्या मुला-मुलींचे प्रमाणही वाढते आहे. अनुरूप जोडीदाराच्या वाढत्या अपेक्षेमुळेही मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढते आहे. हे सारे बघू जाता मला प्रश्न भेडसावतो, पुढच्या पिढीचे काय? हे सगळे लगेच घडेल, असे नाहीच, पण जीवनाचा प्रवाह त्या दिशेने वाहू लागलाय, एवढं निश्चित. हे दिसतं समाजाच्या एका घटकाचं चित्र. माझ्या पिढीतील मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातलं हे चित्र. पण हा एक घटक म्हणजे काही सगळा समाज नव्हे.
समाजाच्या आणखी काही घटकांमध्ये दिसतं, मुलं- मुली शालांत परीक्षा पास झालीत. कुणी कुणी पदवी मिळवलीय. कुणी व्यावसायिक शिक्षण घेतलय. मिळेल, ती नोकरी-व्यवसाय, मुलं- मुली करताहेत. काहींच्या घरात शेती आहे, पण शेती असूनही अनेक मुलांना शेती करायची नाही. त्यांना नोकरीच करायचीय, मग ती किती का सामान्य असेना. शेतीचं अनिश्चित उत्पन्न हे एक कारण असेल, पण महत्वाचं कारण म्हणजे शेतीत काबाड-कष्ट जास्त करावे लागतात. त्या तूलनेत नोकरी आरामाची. मुलींनाही शेतकरी नवरा नकोय. नोकरदार हवाय, मग तो शिपाई का असेना. घरात शेती म्हंटलं, की कष्ट आलेच. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ‘श्रमप्रतिष्ठा’ या मूल्याचा भाषण-लेखनातून खूप गवगवा होतोय, पण श्रमप्रतिष्ठेला जेवढं महत्व त्यापूर्वी होतं, तेवढं नंतर राहिलेलं दिसत नाही. याबाबतीत ज्ञान आहे, पण त्याचं उपयोजन होताना दिसत नाही. मुलांचा दृष्टीकोण बदलत नाही. आपला देश कृषिप्रधान आहे, पण पुढची पिढी शेतीपासून लांब पळते आहे, ही शोकांतिका माझ्या मनाला वेदना देते. बळीराजाचा गौरव फक्त पुस्तका-मासिकांपुरता होताना दिसतोय. शेतकर्यालाही आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटताना दिसत नाही. मुली बळीराजाची राणी होण्यापेक्षा शिपायाची शिपाईण होणं पसंत करतात.
बर्या परिस्थितीतील मुलींचे आई-वाडील मुलीसाठी स्थळ शोधताना, घर-दार, शेती-भाती, शिक्षण-नोकरी असं सगळंच हवं, असा आग्रह धरतात. घरात शेती हवी, पण मुलाने मात्र शेती न करता नोकरीच करावी, असं त्यांना वाटतं. आता शेती करायचीच नाही, तर शेतीचा आग्रह का? मुलगा चांगला मिळवता आहे, एवढं पुरेसं नाही का? शिवाय, लग्नाच्या वेळी घर-दार नसलं, तरी नंतर तो आपल्या कर्तृत्वाने घर घेऊ शकेल, पण तेवढा काळ जाऊ द्यायला मुलीच्या वडलांना धीर नसतो. घर-दार, शेती-भाती यातून मिळणारी प्रतिष्ठा मनात कुठे तरी घर करून राहिलेली असते. मुलावर घरच्यांची, आई-वडील, भावंडे यांची फारशी जबाबदारी नको, अशीही मानसिकता असते. आता आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मुलीकडच्यांनी असाच विचार केला तर? तर आपण कुठे जायचं? हे तेव्हा का लक्षात येत नाही? मुलगी नोकरी करत असेल, तर एकत्र रहाण्याची तिची तयारी असते, पण कारण असतं, पुढे मुलाला सांभाळायला घरातील हक्काची माणसं मिळावित. अशा अनेक अपेक्षा. अपेक्षा वाढतात, तसं लग्नाचं वायही वाढतं. अर्थात ही समस्या या घटकांमध्ये पहिल्या घटकाइतकी गुंतागुंतीची अजून तरी झालेली नाही.
या घटकांमध्ये लग्नात अलीकडे रुखवत हे मोठेच प्रस्थ झाले आहे. डबल बेड, कपाट (तिजोरी), ड्रेसिंग टेबल, सोफा या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत. मुलीकडच्यांना ते परवडो की न परवडो, मुलाच्या घरी ते सारं ठेवायला जागा असो की नसो, लग्नात या गोष्टी द्यायच्याच. ऋण काढायचं पण रुखवत साजरं करायचं. अनेक ठिकाणी मुलींचाच हट्टाग्रह असतो, की आई-वडलांनी या गोष्टी आपल्याला द्यायलाच हव्यात. मुली काही अडाणी नव्हेत. चांगल्या शिकलेल्या. पण शिक्षणाने सुजाणता, सामंजसपणा येतोच, असे नाही ना!
माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं पाच वर्षापूर्वी लग्न झालं. तिची तीन खोल्यांची जागा. त्यात डबल बेड, सोफा, टेबल असं सगळं होतं. तिने मुलीच्या आई-वडलांना सांगितलं, जो रुखवतासाठी तुम्ही खर्च करणार, ते पैसे मुलीच्या नावे बँकेत ठेवा. गरजेप्रमाणे ती त्याचा उपयोग करेल. बेड, सोफा घेण्यात खर्च करू नका. घरात या गोष्टी आहेत. पण तिच्या सुनेला सगळं नवं कोरं हवं होतं. तिने मनाप्रमाणे नवा बेड, सोफा, टेबल करून घेतलं. शेवटी मैत्रिणीला आपल्या घरातल्या या जुन्या वस्तू शेजारी नेऊन ठेवायला लागल्या. ही मानसिकता बदलण्यासाठी काय करायला हवं, माझ्यासारखीला प्रश्न पडतो.
सगळं आई-वडलांनी किंवा सासू –सासर्यांनी द्यावं अशी अपेक्षा करताना, मी माझ्या कर्तृत्वाने मिळवेन, हा अभिमान, ही आत्मनिर्भरता कमी होत चाललीय का, असंही आताशी वाटू लागलय. काही प्रथा-परंपरा वरच्या स्तरातून खालच्या स्तराकडे झिरपत येतात. हुंडा आणि डोईजड रुखवत ही प्रथादेखील दुसर्या स्तराकडून तिसर्या, खालच्या स्तराकडे झिरपत आलीय. हा घटक श्रमजीवी लोकांचा. कामवाल्यादेखील आपल्या मुलींना लग्नात डबलबेड, कपाट, पंखा, खुर्च्या, मिक्सर वगैरे देताना दिसतात. अर्थात हा खर्च त्यांना परवडत नाही. कर्ज काढायचं, पण वस्तू द्यायच्याच. नाही दिलं तर? लोक काय म्हणतील? समाज नावे ठेवेल, ही धास्ती. एकीने मुलाकडच्यांना सांगितले, तुम्ही आम्हाला पंचवीस हजार रुपये द्या आणि आम्ही रुखवत मांडतो. आमच्याकडे पैसे नाहीत. मुलाकडचे म्हणाले, आम्ही पैसे देत नाही. तुम्ही रुखवत मांडू नका. आम्हाला काही नको. त्यावर तिचं म्हणणं असं की पण लोक काय म्हणतील? काही दिलं नाही, म्हणून आम्हालाच नावं ठेवतील ना! आता बोला! लोक काय म्हणतील, म्हणून न परवडणार्या आणि न पटणार्या गोष्टी करायच्या या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. पण कसा आणि कधी? मी संभ्रमात आहे. मला जिथे, जसं समजावून सांगता येईल, तेवढं मी सांगत असते. पण मला माहीत आहे, माझे हे प्रयत्न अगदीच अपुरे आहेत. शिवाय मला हेही ऐकून घ्यावं लागतं, ‘आमच्या चालत न्हाई तसं! लोकं नावं ठेवत्यात!’
आणखी एक प्रश्न, प्रत्येकाला हव्या असणार्या स्पेसचा. माझ्या मुला-मुलींना, सुना, नातवंडांना वाटतं, त्यांना हवी असणारी स्पेस त्यांना मिळायला हवी. पण त्याच वेळी त्यांच्या हे लक्षात येत नाही, की त्यांच्या आई-आजीलाही त्यांच्यासारखीच स्पेस हवी असते. मी ती मिळवायचा प्रयत्न करते, पण अनेकदा मुला-सुनांचं, नातवंडांचं त्यावर आक्रमण होतं. माझ्या रिकाम्या वेळेत, मुलांना-सुनेला बाहेर जायचं असतं. मी घरातल्या मुलांकडे बघावं किंवा त्यांच्यासाठी मी एखादी गोष्ट करावी, ही त्यांची अपेक्षा असते. मला हव्या असलेल्या रिकाम्या वेळेचा विचार त्यांच्या मनात येत नाही. मी त्यांना स्पष्टपणे ‘नाही’ही म्हणू शकत नाही. मग वाटतं, दुसर्यांचा विचार करण्याची सवय लावण्यात आम्ही कुठे कमी पडलो का?
असे अनेक प्रश्न. अनेक समस्या मनाचं आभाळ झाकोळून टाकताहेत. दोन हजार बावीसच्या थांब्यावर आज उभं राहून, घेतलेल्या अनुभवांचा मागोवा घेताना आणि भविष्याचा कानोसा घेताना, जे विचार मनात आले, जे बोलावसं वाटलं, त्यापैकी काही गोष्टी इथे लेखरूपाने मांडल्या आहेत. आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून मी केला आहे.
© उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





