सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ सुखाचे शाॅटस्… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

शारदा दारातून आत आली. आणि म्हणाली, “ वहिनी या बघा नवीन बांगड्या काल घेतल्या.  दोनशे रुपयांना…” चकचकीत बांगड्यांनी तिचा हात खुलून दिसत होता…..आणि हातापेक्षाही चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता…

“ अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.”

“ नको नको “ ती लाजून म्हणाली

“ अगं तुझा नाही..  बांगड्यांचा काढते.  मग तर झालं….” मी फोटो काढला…

बांगड्यांवरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…

दिवसभर काम करूनही ती नेहमी आनंदातच असते…

देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब वाहिला आणि सरूची आठवण आली…

काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ‘ या काकू ‘ म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली “ काकू हा घ्या तुमच्या देवाला.. “  मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं….देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली .. ‘ दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी ठेव…’

साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फनफेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत होते… काल साहिलने सांगितले होते आजी आम्ही चीज रगडापुरी करणार 

आहोत “

“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीज….”

“ हो आमचं  तसच ठरल आहे..आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचं पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप फॅन्टा आणि स्प्राईट घालणार आहोत…त्याला आम्ही पाणीपुरी शॉटस् असं नाव दिले आहे. “

“ अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कुणी खाईल का? “

“ अगं टीचर पण म्हणाल्या.. तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा….

काय झालं असेल की…मी विचार करत होते तेवढ्यात ‘ नीता…’ अशी हाक आली

मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाई साहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…

विचारलं तर म्हणाली “ थंडीतच मजा येते..ही घे तुला एक कॅंडी जाताना खा. “ वर डोळा मारून म्हणाली

“ वन फाॅर द रोड  एन्जॉय इट.. घे ग कोणी बघत नाही….”

आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँडी खाताना गंमत वाटत होती….

फन फेअरला पोचले, तर तिथे खूपच मजा चालली होती.

नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती लोक धमाल करत होते.

पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…

आई बाबा आजी आजोबा पोरं… सगळे हसत होते .. ट्राय करून बघत होते…

मुलं मुली चीज रगडा पुरी बनवत होते, ते पण लोक आवडीने खात होते…

‘ कसली भारी आयडिया आहे ना…वाॅव…..’ वगैरे चाललं होतं

इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता

हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.

खूप वेळानंतर साहिल सांगायला आला, “ आजी आमचं सगळं संपलं तुला शॉट्स नाही मिळाले ना ..  आता उद्या घरी करू तेव्हा तू ट्राय कर…चालेल ? “…. 

मनात म्हणाले,  “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखाचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले.. 

त्याची चव ही दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “ 

खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू…

ते असतातच आसपास…बघायचे ठरवले तर दिसतात..

बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी….मग दिसतील आपले आपले सुखाचे शॉटस्

मग ठरलं तर…’ अशा शॉटस्ची मजा घेत आयुष्य जगायचं .. अगदी आनंदानी…’ 

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted