सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पानझड… ☆ सौ शालिनी जोशी

पत्ता बोले वृक्ष से, सुनो वृक्ष वनराय

अबके बिछुडे ना मिले, दूर पडेंगे जाय

जीवनातलं एक शाश्वत सत्यच संत कबीर या दोह्यात नमूद करतात. पान वृक्षाला सांगते, वनराज वृक्षा ऐक. आता मी तुला सोडून जातो. पुन्हा न भेटण्यासाठी, दूर कुठेतरी मी पडून राहीन.

पानझडीच्या काळात प्रत्येक पानाला मातृवृक्षाचा वियोग सहन करावा लागतो. तो टाळणे ना झाडाच्या, ना पानाच्या हातात. निसर्ग नियमाप्रमाणे हे होत असते. खरंतर पान हा वृक्षाचा अवयव. अन्न तयार करून वृक्षाला जगविणारा. मग त्याच्यावर अशी वेळ का यावी? यामागे विज्ञान आहे. काही झाडे एकदम सगळी पाने गळून टाकतात. त्यांना पानझडी वृक्ष म्हणतात. पानगळल्यामुळे झाडाला प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ऊर्जा व पाण्याची बचत करता येते. कमी पानांमुळे पाण्याचे उसर्जन कमी होते. झाडांना पाणी कमी लागते व त्यामुळे झाडे स्वतःला जिवंत ठेवू शकतात. झाडांना ऊर्जा प्रकाश संश्लेषणातून मिळते. ही क्रिया सूर्यप्रकाशात हिरवी पाने करतात. पानातील क्लोरोफिलच्या मदतीने झाडे सूर्यप्रकाशात पाणी व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड च्या साह्याने साखर तयार करतात. पण पानझडीच्या वेळी क्लोरोफिल मुळात व खोडात साठवले जाते. त्यामुळे पानांचे कार्य थांबते आणि ती आधि पिवळी मग लाल दिसू लागतात. मग गळून पडतात. तयार असलेल्या ऊर्जेचा उपयोग फुलांच्या बहरासाठी म्हणजे प्रजननासाठी होतो. म्हणून पाणझड होते तेव्हा वृक्ष फुलांनी भरून परंपरारक्षणाचे काम करतात. रंगीबेरंगी फुलांनी नटलेल्या झाडाचा सुखद अनुभव आपण घेतो. पाने नसल्यामुळे पूर्ण शक्तीनिशी हे कार्य करून फुला फळांच्या बहरातून पुनर् निर्मिती होते. योग्य काळी परत नवीन पाने फुटतात. असे हे चक्र सुरू असते.

अशा प्रकारे पाने झाडांचा निरोप घेऊन त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतात. आपल्या बळी देऊन झाडांना जगवतात. ‘उपजे ते नाशे’ हा जगाचा नियमच आहे. पण नाश आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळा गोंधळ माजला असता. नाश म्हणून नवनिर्मितीला शोभा आहे. तो नवसृजनाचा आनंद आपण भोगतो. फुलांनी भरलेले वृक्ष सृष्टीचे वैभव ठरतात.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted