श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ वारी ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
वारी म्हटली की शब्द आठवतो दिंडी. दिंडी म्हणजे माउली आणि तुकोबांच्या पालखी सोबत वारी करणारी असंख्य मंडळी आणि व्यावहारिक भाषेत बोलायचे झाल्यास वारकऱ्यांच्या विविध तुकड्या. शाळेतील वर्गाला कशा तुकड्या असतात अगदी तसेच… !!
वारीचा हेतू काय, तर परब्रह्म पांडुरंगाची गळाभेट घेणे, त्याला डोळे भरून पाहणे…
वारी अनेक शतके अव्याहत चालू आहे…. ! जगात अनेक उलथापालथी झाल्या, राजेशाही गेली, लोकशाही आली, पारतंत्र्य गेले, स्वातंत्र्य आले आणि अशा अनेक गोष्टी सांगता येतील….
पण वारी अव्याहत चालू….
वारीचा एक अर्थ असा घेता येईल की वारी म्हणजे प्रवास.
हा प्रवास मात्र थोडा वेगळा आहे. माउली, तुकोबांसारख्या महान संताच्या संगतीत पांडुरंग परमात्म्याची भेट होण्यासाठी प्रवास करायचा…. ! प्रवास आला की पूर्वतयारी आली. परदेशांत जायचे असल्यास लोकं किमान सहा महीने आधीपासून तयारी करतात. मग पांडुरंगाची भेट व्हायला हवी असेल तर तयारी किती करावी लागेल…. ?
इथे एक काम सोपे आहे. विठुमाउली आपल्या अन्य भक्तांकरवी प्रत्येकाच्या पोटाची व्यवस्था करीत असते. मनुष्याला फक्त मनाची तयारी करता आली तर उत्तम. ज्याला ती करता येते तो वारीत असतोच. कधी मनाने तर कधी देहाने….
आषाढी/कार्तिकी/ माघी वारी करता आली तर उत्तमच. पण दैनंदिन वारी करता आली तर…
आता ही वारी कशी करायची?
दिवस उजाडला की वारी सुरू आणि दिवस मावळला की वारी समाप्त. पहाटे उठलं की आपल्या आईशी बोलतो तसे विठुमाउलीशी बोलावे. तिच्यासमोर निवेदन करावे, माउली आज दिवसभरात जे जे माझ्या हातून घडेल ते ते तुझी वारी घडावी म्हणून करीत आहे. तूच माझ्याकडून योग्य ते करवून घे. प्रत्येक गोष्ट विठुमाउलीला सांगून करावी आणि झोपताना, दिवस सरताना दिवसभरातील सर्व बरीवाईट कर्मे माउलींच्या चरणी समर्पित करावीत. आणि निश्चिंत मनाने निद्राधीन व्हावे.
ही वारी भगवंताला नक्की आवडेल….!
आपण प्रयोग करून पाहू.
|| जय जय राम कृष्ण हरि ||
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








खूप छान लिहिलंय
आगळीवेगळी वारी छानच आहे