श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ११ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
“लोके वेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधिषूदासीनता ॥ ११ ॥”
अर्थ : (भक्ताच्या) लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्मे करीत राहणे (म्हणजेच) त्याच्या विरोधी (प्रतिकूल) विषयात उदासीनता (ठेवणे) होय.
विवेचन : मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जिवाचे मुख्य कर्तव्य कोणते आहे याचा अभ्यास आपण मागील लेखांत केला आहे. त्यामुळे साधना पथावर चालू झालेल्या मनुष्याचे अंतिम ध्येय भगवंताची प्राप्ती हेच आहे किंवा हे ध्येय पक्के झाले आहे असे आपण समजून. इथून पुढे ध्येय म्हणजे अंतिम ध्येय अर्थात ईश्वराची प्राप्ती असे आपण समजूया.
मनुष्य जेव्हा कोणतेही ध्येय नक्की करतो, तेव्हा त्याला त्याच्या पूर्तीसाठी काही अधिक कर्मे करावी लागतात. तर काही नेहमीं करीत असलेल्या कर्मांचा त्याग करावा लागतो. शास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास त्या साधकाला काही विहित कर्मे करावी लागतात, तरी काही कर्मे त्याच्यासाठी निषिद्ध असतात, ती त्याला सोडावी लागतात, अर्थात त्यांचा त्याग करावा लागतो. विहित कर्मांमध्ये काही लौकिक असतात तर काही वैदिक असतात. इथे एक मुद्दा अथवा तत्व अंगीकारणे अतिशय महत्वाचे आहे असे वाटते. परमार्थ असो वा प्रपंच कोणताही निर्णय जर विवेकाने घेणे अतिशय आवश्यक असते, अन्यथा साधकाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यासाठी नित्यानित्यविवेक उपयुक्त ठरतो.
भगवतांच्या प्राप्तीसाठी भक्त प्रल्हादाने आपल्या (अर्थात भक्तीच्या आड येणाऱ्या)
वडिलांचे ऐकले नाही, भरताने त्यांना माता कैकयीचे ऐकले नाही, मिरेने विषाचा प्याला सहज तोंडाला लावला, आपले सोंग उघडे पडले तर आपला शीरच्छेद होणार आहे माहीत असूनही जीवा महाला छत्रपती रूपात पालखीत बसून गड उतरलाच, अहो ही भक्ती नव्हे तर काय? नव्हे! ही तर भक्ती साधनेतून निर्माण झालेली शक्ति.
वरील उदाहरणातून भक्ति करणे म्हणजे नक्की काय? आणि भक्तीची शक्ति कशी काम करते हे दिसून येते. अशी भक्ति करताना भक्त प्रल्हादाने भगवंताची प्राप्तीसाठी काय काय करावे लागते, ते आपल्या निदर्शनास येईल, नव्हे भक्तीसाठी जिवा महाला प्रमाणे आत्मार्पण ही करावे लागते, असे आपल्या लक्षात येईल.
सर्व संत सांगतात की भगवतांसाठी शक्य असेल ते सर्व करावे, प्राण देण्याची तयारी ठेवावी आणि साधना करताना प्राण गेला तर जीवनाचे सार्थक झाले असे समजावे…. !
(देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥)
(दास. ०४. ०८. ०८)
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः …
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






