सुश्री सुनिता जोशी
इंद्रधनुष्य
☆ खारीचा वाटा … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆
खारीचा वाटा ही रामायणातील कथा सर्वश्रुत आहे. प्रभू रामचंद्राला सेतुबंधाच्या कामात एका लहानशा खारीने तिच्या परीने केलेली मदत आणि प्रभू रामचंद्राने या छोट्याशा मदतीचे केलेले कौतुक आणि तिच्या कार्याचा गौरव यावरून खारीचा वाटा हा वाक्प्रचार रूढ झाला. कारण मदत जरी छोटी असली तरी त्या मागील भावना ही फार महत्त्वाची.
मात्र काही भाषा अभ्यासकांच्या मते खारीचा वाटा म्हणजे काही छोटी मदत नाही. त्यांच्या मते खार हे पूर्वीच्या काळातील मापन प्रमाणक असून आता जसा किलोचा वाटा, एकराचा वाटा आहे, तसा पूर्वी खारीचा वाटा असे. यासाठी त्यांनी गीर्वाण लघुकोशातील मुष्टिका, निष्टिका, अष्टिका, कुडव, प्रस्थ, आढकी, द्रोण आणि खार या मापन प्रमाणकांचा संदर्भ दिला. त्यानुसार खार म्हणजे १ कैली माप. उदाहरणादाखल धान्य मापन करावयाचे असल्यास ते असे –
४ मुठी = ४ मुष्टिका = १ निष्टिका
८ मुठी = २ निष्टिका = १ अष्टिका
१६ मुठी = २ अष्टिका = १ कुडव
६४ मुठी = ४ कुडव = १ प्रस्थ
२५६ मुठी = ४ प्रस्थ = १ आढकी
१०२४ मुठी = ४ आढकी = १ द्रोण
२०४८० मुठी = २० द्रोण = १ खार
यावरून १ खार धान्य म्हणजे २०४८० मुठी धान्य. जर १ मूठ धान्य अंदाजे ५० ग्रॅमच्या स्वरूपात धरल्यास २०४८०/५० = १०२४ किलो धान्य होते.
गणितीय पध्दतीतील ही अष्टमान पध्दत पुढे संगणकीय प्रणालीमध्ये वापरली गेली.
जसे 1024B = 1 KB, 1024 KB =1 MB, 1024 MB = 1 GB
… इतके दिवस “ खारीचा वाटा “ म्हणजे “ अगदी लहान वाटा “ असेच वाटायचे….. पण ‘खार‘ हा शब्द म्हणजे फक्त एका लहानशा प्राण्याचे नाव नाहीये, तर ‘खार‘ हे काही मोजण्याचे एक ‘मापक’ किंवा एक ‘प्रमाण’ आहे.. आणि “ खारीचा वाटा “ म्हणजे “ खूप मोठा वाटा “ हे मला तरी नव्यानेच समजले.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






