श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तीस्तोत्र २५.

सा तु कर्मज्ञानयोगेभ्योऽप्यधिकतरा ॥ २५ ॥

अर्थ : परमप्रेमा भक्ति कर्म, ज्ञान व योगापेक्षाही श्रेष्ठ आहे.

विवेचन: मानवाच्या उद्धाराकरिता शास्त्रादिकातून जी साधने सांगितली जातात त्याचे अधिकारपरत्वे तीन विभाग पडतात. कर्म, ज्ञान व योग.

काही लोकांना कर्ममार्ग श्रेष्ठ वाटतो. येथे कर्म म्हणजे ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेले विहित कर्म, अर्थात त्याने स्वीकारलेला व्यवसाय आणि भरणपोषण होण्यासाठी करावी लागणारी सर्व कर्तव्य कर्म.

जीवाचा जन्म झाला की तो तात्काळ कर्म बंधनात अडकतो. दूध पिणे, रडणे, थोडा मोठा झाल्यावर रांगणे, पुढे शिक्षण, नोकरी, प्रपंच इतर अनुषंगिक कर्मे त्याची पाठ काही सोडत नाहीत आणि हे चक्र त्या मनुष्याच्या मृत्यूपर्यंत अव्याहत चालू रहाते. गीतेमध्ये भगवंत देखील म्हणतात की मी एक क्षण जरी कर्म करायचे थांबवले तर सृष्टीवर हाहाकार माजेल, पण भगवंत करीत असलेले कर्म आणि सामान्य मनुष्य करीत असलेले कर्म यात मूलभूत फरक आहे. मनुष्य प्रत्येक कर्म आसक्तीने, फळाची अभिलाषा मनात ठेऊन कर्म करीत असतो, तर भगवंत हे कर्तव्य म्हणून कर्म करीत असतात. थोडक्यात सांगायचे तर भगवंत किंवा संत हे परमात्म्याशी तादात्म्य पावलेले असतात आणि त्याची इच्छा म्हणून कर्म करीत असतात, तर सामान्य मनुष्य देहबुद्धी ने प्रत्येक कर्म करीत असतो आणि प्रत्येक कर्माच्या फलाशेने आपापली देहबुद्धी कमी करण्याऐवजी वाढवत असतो, हे मनुष्याच्या ध्यानातच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, “मनुष्य आपल्याला भौतिक लाभ मिळावा म्हणून अनेक व्रतवैकल्ये, कुळाचार पार पाडत असतो. पण इथे सुद्धा लक्ष फळाकडे असल्याने त्याचे चित्त स्थिर रहात नाही. ” श्री. चंद्रशेखर गोखले यांनी एका चारोळीत हे अगदी मार्मिकपणे मांडले आहे.

देवळांत जाऊन माणसं

दुकानात गेल्यासारखी वागतात

चार-आठ आणे ठेवून

काही न काही मागतात

या अशा सवयींमुळे मनुष्याला ना कर्म केल्याचा आनंद मिळतो ना कर्मफळाचा लाभ!! म्हणून समर्थ म्हणतात,

येथासांग रे कर्म तेंही घडेना।

घडे धर्म ते पुण्य गांठीं पडेना।

आपल्या धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे विविध मार्गआहेत. सामान्य माणसासाठी भक्ती मार्ग सांगितला गेला आहे. आपण नऊ प्रकारे भक्ती

करून देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. यातील नामस्मरण सोडले तर प्रत्येक भक्तीला काही न काही कर्मकांड करावे लागते. कर्म म्हटले की काही ना काही नियम असतातच. पण, बरेच वेळेला नियम पाळण्याच्या अट्टाहासापायी मनुष्य त्या

कर्मामागील मर्म विसरतो. आपले कर्म ‘पूजा’ न होता, आपली पूजा हेच कर्म’ होते. प्रत्येक कर्माला धर्मशास्त्रात विशिष्ठ फळ सांगितले आहे. देश, काल, परिस्थिती (आर्थिक किंवा सामाजिक) सोडली तरी आपण केलेल्या कर्मांत काही ना काही न्यून राहते आणि अपेक्षित फळ आपल्याला प्राप्त होत नाही. पुण्याचा लाभ न होता फक्त दमछाक आणि पैशाचा व्यय मात्र नक्की होतो. जगाला आपण किती ‘धार्मिक’ आहोत. हे मात्र यामुळे दाखविता येते. पण मुख्य उद्देश ‘चित्तशुध्दी’ बाजूला राहतोे आणि आपली ‘देहबुध्दी’ मात्र वाढते. घरातील मंगल कार्यात एखादा अयाचित भिकारी आला तर यजमान त्याला विशेष ‘दया’ दाखवून घरातून हाकलून देत असल्याचे आपण बघितले असेल. खर तर नामस्मरणानी विनासायास भगवंत भेटतोे, पण सोप्या गोष्टी मनुष्याला करायला आवडत नाही आणि कर्ममार्ग आचरता येत नाही. अशा सर्व गोंधळात मनुष्याच्या हातून उपयुक्त असे काहीच घडत नाही.

आता हे वाचून कोणाच्या मनात येईल की कर्म करायचेच नाही का? तर सर्व संत सांगतात की सुरुवात काम्य कर्मांनीच करावी. पण जसजशी साधना वाढेल, समज वाढेल तसतसे मनुष्याने आपले कर्म भगवंतांस अर्पण करायला शिकावे आणि अंतिम ध्येय मात्र ‘कर्मसंन्यास’ हेच असावे. थोडक्यात संत ज्याप्रमाणे स्वतःला भगवंतांचे उपकरण समजतात तसे आपण भगवंताला संपूर्ण शरण जावे आणि त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून टाकावी, आपण भगवंताच्या हातातील बाहुले व्हावे.

जिहासा, जिज्ञासा, चिकित्सा, शोक, भय व अतृप्ती या चित्ताच्या सहजप्रेरणा आहेत. या जसजशा जागृत होतात, तसतशा इंद्रियांच्या व्यापारास उद्युक्त करतात. प्रेप्सा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी असे वाटणे, तर कधी कशापासून तिटकारा वाटून त्यापासून दुःख होणे, ती जिहासा. काहीतरी नवे ज्ञान मिळावे ही ज्ञानलालसा म्हणजे जिज्ञासा. काही तरी करावे असे वाटणे म्हणजे चिकित्सा. अनिष्ट गोष्टींचा मनात होणारा खेद म्हणजे शोक, भविष्यातील संकटाबाबत वाटणारी कातरता म्हणजे भय. कितीही विषयसेवन केले तरी समाधान न होणे म्हणजे अतृप्ती होय. आपल्या देहइंद्रियांचे जे जे व्यापार होतात ते याच सहज प्रेरणेमुळे. कोणत्याही कामात शुद्धता नसेल, ते नीट केले नसेल तर ते पापकर्मच ठरते. जे नित्य कर्म पूर्ण श्रध्देने केले जाते ते यथासांग म्हणता येईल. दुर्दैवानं हा रीपुंच्या आधीन होऊन मनुष्याचे ना कर्म धड होते नामस्मरण. म्हणून अट्टाहासाने प्रत्येक कर्म करतेवेळी त्यास नामाची जोड द्यावी. प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे यातून लाभ होत असतो, असे सर्व संत सांगतात.

ज्ञानमार्ग हाही श्रेष्ठ असा वेद, उपनिषदे, सूत्रादी ग्रंथातून सांगितला आहे. विना ज्ञानाचा मोक्ष प्राप्त होतच नाही असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. ज्ञानमार्ग हा सामान्य मनुष्यासाठी कष्टदायक सांगितला जातो. कारण त्यात अनेक गोष्टी येतात. अनेक नीतीनियम पाळून ज्ञान प्राप्त केले तर त्यातून अभिमान वाढण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात.

योगयागविधी येणे नोहे सिद्धी।

वायाचि उपाधी दंभ धर्म।।१।।

(माउलींचा हरिपाठ)

संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगात इतर साधनांचा निषेध करून भावभक्तीचे श्रेष्ठत्व व सत्संगतीची आवड प्रतिपादन करतात. श्री ज्ञानेश्वर माऊली यमनियमादी अष्टांग योग मार्गास नित्य नवा ‘अग्निप्रवेश’ असे म्हणतात.

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची प्रमुख आठ अंगे होत. हे सर्व पाळणे सामान्य मनुष्याला शक्य होतेच असे नाही. अनेक वेळा आपले ध्यान लागले असे मनुष्याला वाटते, परंतु त्यास त्यावेळी झोप लागलेली असण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात हा मार्ग तज्ज्ञ गुरूंच्या हाताखाली शिकण्याचा आहे. सामान्य मनुष्यासाठी नक्कीच नाही. याग म्हणजे यज्ञ. यज्ञाचा खर्च सामान्य मनुष्याला न परवडणारा… , समजा पैसे गोळा केले तरी त्यातून विधी विधानाप्रमाणे यज्ञ पार पडेल याची शाश्वती नाही, यास मुख्य कारण म्हणजे सद्यस्थिती. सध्या एकूणच धर्मावरील विश्वास क्षीण झाला आहे आणि यज्ञ करण्यास लागणारी साधन सामग्री मिळणेही मुश्किल झाले आहे. यज्ञ याग करायचे कशासाठी.? तर काहीतरी मिळण्यासाठी…. अर्थात सिद्धीच्या प्राप्तीसाठी… पुण्य वाढून स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी..

अनेक प्रकारच्या सिध्दी आहेत. परंतु यापैकी कोणतीही सिध्दी प्राप्त होऊन कधीही मोक्ष मिळत नसतो…. स्वर्गलोक प्राप्त झाला तरी पुण्य संपल्यावर इथेच जन्म घ्यावा लागतो, नरदेह प्राप्त करावा लागतो आणि त्यानंतर साधना करून मोक्ष प्राप्ती करून घ्यावी लागते, असे सर्व संत सांगतात. या योग यागाचा एक विपरीत परिणाम असा होतो की मी अमुक यज्ञ केले, मी योगी आहे असा अहंकार मनुष्याला होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महायोगी चांगदेव महाराज.

सध्याचा काळ दिखाऊपणाचा आहे. त्यामुळे देहाचा रंग गोरा करणारी औषधे कोणताही गुण न येताही मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. जसा आहे तसा न राहता, आहे त्यापेक्षा वेगळा (अधिक चांगला) दर्शवण्याचा प्रयत्न करणे, याला दंभ असे म्हणतात. भगवी कफनी घातली की लोकं त्या भगव्या वस्त्राला भुलतात. हा दंभ होय आणि तसे आचरण करणे हा दंभधर्म होय.

संत एकनाथ महाराज याचे वर्णन करतात.

पोटीं नाहीं परमार्थ । धरोनियां अर्थस्वार्थ । स्वयें म्हणविती हरिभक्त । या नांव निश्चित भजनदंभू ॥

(ए. भा. अध्याय २३. २३०)

आदरणीय महिपतिबाबा आपल्या भक्तलीलामृत ग्रंथात म्हणतात,

योगमार्ग बहुत कठीण। विरळा साधी लक्षांतून। भोळ्याभाळ्या सकळा कारण। नामचि पावन करितसे।।

जनसामान्यांसाठी नामजप हाच राजमार्ग सर्व संतांनी सांगितला आहे. समर्थ सुद्धा तेच सांगतात, “यथासांग रे कर्म तेही घडेना । घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥” (मनाचे श्लोक १००). जगात ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. अगदी सोप्या शब्दात सांगयचे झाले तर व्यक्ति तितक्या प्रकृती. जितकी माणसे तितके मार्ग. मागील शतकातील एक श्रेष्ठ संत श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात, “कलियुगात जीव अल्पायु असल्यामुळे आणि एकूणच काळ पूरक नसल्यामुळे अन्य मार्गांपेक्षा भक्तिमार्गच श्रेष्ठ आहे. ”

उत्तम भक्तांच्या लक्षणांत शुद्ध चित्त, शुद्ध भाव आणि आपपरभावाचा लोप ही प्रमुख लक्षणे सांगता येतील. पण सामान्य मनुष्यास ते तितके जमतेच असे नाही. त्यामुळे ना त्याला धड कर्म करता येते ना त्याला धर्म करता येतो, ना सर्वाविषयी भूतदया दाखविता येते. समर्थांनी व्यक्त केलेली ही खंत आहे. पण सर्वात सोपे, उपाधिरहीत असे नाम त्यास घेता येऊ शकते. म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा सश्रद्धेने नाम घेण्यास सुरुवात करू, अर्थात भक्तीमार्गच अधिक सुलभ म्हणगा येईल.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

 – भक्ती सूत्रे क्र. २५.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted