सुश्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ कैकयी – लेख क्र. ८ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
तुम्ही… तुम्ही साऱ्यांनी मला खलनायक ठरवलंत. नाही नाही ते आरोप केलेत. कुणीही असा विचार केला नाही की मी हा निर्णय का घेतला असेल! अहो, भरता पेक्षा माझं रामावर जास्त प्रेम होतं आणि खरं म्हणजे हे साऱ्यांना माहिती होतं. तरी सुद्धा कुणाला काही शंका आली नाही. मला स्वार्थी ठरवणं सोपं होतं, तुम्ही ठरवून टाकलं. ती बिचारी मंथरा, कां मला असं काही सांगेल की ज्याचा परिणाम तिच्या राजवाड्यातल्या अस्तित्वावर होणारा होता. पण नाही तिलाही सहज दुष्टांच्या रांगेत बसवलंत.
या कैकयीला वारसा हक्काने फक्त रूपच मिळालं होतं असं नाही तर युद्ध कौशल्य, राज्य कारभार निपुणता, बुद्धिमत्ता, मुत्सद्दीपणा याही गोष्टी मिळाल्या होत्या. मला एक सांगा, महाराजांना पुत्रशोकांने मृत्यू येईल असा शाप मिळाला होता. याचा अर्थ काय होतो हो, महाराजांचा मृत्यू होण्यापूर्वी माझ्या एका पुत्राचा मृत्यू होणार, हे नक्की नां! जसजसं महाराजांचं वार्धक्य जवळ यायला लागलं तसतसं हे सत्य काळीज पोखरत होतं. आधीच पुत्रप्राप्ती महाराजांना फार उशिरा झाली. त्या भरल्या गोकुळात महाराज शापाचा विषय विसरून गेले. पण मी मात्र एकही दिवस सुखाने जागी झाले नाही की सुखाने झोपू शकले नाही. मुलांचे हसरे चेहरे पाहिले की पोटात कालवायचं. वाटायचं, या शापाशी या निरागस मुलांचा काय संबंध? त्यांना कां शिक्षा? कुणाही एकाला गमावलं असतं तर महाराजच काय, आम्ही सारे पुत्रशोकांने मेलो असतो. सगळे इतके आनंदी होते की या गोष्टीची कुणाला आठवण करून देण्याचं माझं धाडस झालं नाही. काही सुचत नव्हतं. काहीतरी जादू व्हावी असं वाटायचं आणि कोणत्याही पुत्राचा मृत्यू न होता महाराजांना पुत्र शोक व्हावा. कारण महाराजांचा मृत्यू तर अटळ होता. या रोजच्या भीतीने काळजाला घरं पडत होती. अखेरीस मी सरस्वतीला साकडं घातलं. मला मार्ग दाखव म्हणाले. तेव्हा ती मंथरेच्या तोंडून वदली की, ” एका मुलाला वनवासाला पाठव. ” कुणाला वनवासाला पाठवू? वयाने त्यातल्या त्यात मोठा, परिपक्व, वनवासात तग धरू शकेल, असा रामच होता ना!
देव व असूर यांच्या युद्धाच्या वेळी इंद्रदेवांनी महाराजांकडे मदतीची याचना केली. रावणाने देवांची केलेली अवस्था बघून मी महाराजांचं सारथ्य करायचं ठरवलं. कारण हे युद्ध शस्त्रांपेक्षा मुत्सद्देगिरीनं लढायला हवं होतं. शत्रू बलाढ्य होता. युद्धात रथाचं चाक तुटलं. तेव्हा मी ते बोटांनी उचलून धरलं, युद्ध संपेपर्यंत! त्यामुळे विजय प्राप्त होऊ शकला. तेंव्हा महाराजांनी मला दोन वर दिले. मी तर महाराजांची पट्ट राणी होते. काय मागणार, कसलीच कमतरता नव्हती.
वाली हा सुग्रीवाचा भाऊ. त्याच्यासमोर जो कोणी युद्धाला उभा राहील त्याची अर्धी शक्ती वालीला मिळणार असा त्याला वर मिळाला होता. त्यामुळे तो स्वतःला अजेय समजू लगला होता. वाली सगळ्यांनाच त्रासदायक झाला होता. महाराज व मी वनविहार करताना वाली समोर आला, युद्धासाठी ललकारू लागला. महाराजांनी हार पत्करली पण आपला मुकुट गमावला. नंतर तो मुकुट वाली कडून रावणाकडे आला होता. एवढा मोठा अपमान मी विसरू शकत नव्हते. वालीला धडा शिकवणं व तो मुकुट रावणाकडून हिसकावून घेणं किंवा त्याला लाचार करून माफी सह मुकुट परत करण्यास भाग पाडणे हेच माझं ध्येय होतं.
रावण पराक्रमी होता त्याच्याकडे मायावी शक्ती होती. त्यालाही अमर, अजेय करणारे वर मिळाले होते. तो गर्वांध झाला होता. त्याचा पुत्र मेघनाद याने इंद्राचाही पराभव केला होता. वालीसारखा योद्धा त्याच्याकडे होता. त्याला टक्कर देणं एवढं सोपं नव्हतं. मुलांचं युद्ध कलेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना असुरांच्या निर्दालनासाठी नेलं. त्यांनीही ताडका, सुबहू अशा राक्षसांचा वध केला. रामाने मारीच राक्षसाला एका बाणात थेट लंकेत फेकून दिलं. परत येताना अहिल्या उद्धार केला. शिवधनुष्य तोडून सीतेला जिंकलं. हे सारं पाहून रामा मध्ये असणाऱ्या फक्त शूरत्वाचीच नव्हे तर देवत्वाचीही जाणीव मला झाली. त्यामुळं वाली, रावण यांचं निर्दालन फक्त रामच करू शकतो, याबद्दल माझी खात्री झाली. अर्थात मुकुटाचा प्रसंग, शिकारीच्या वेळी मिळालेल्या शापाचा प्रसंग कुणालाच माहिती नव्हता. तो मी प्रथम रामाला सांगितला. त्याला सांगितलं की हा मुकुट परत मिळवणं सोपं नाही, हे मला माहित आहे. ते सोपं करण्यासाठी रावणाचा बलाढ्य साथी, वाली, तुला आधी नष्ट करावा लागेल. म्हणजे वानर सेना तुझी होईल. तिथल्या जनमानसात रावणविरोधी मत बनवावं लागेल. तिथल्या वनवासी लोकांना एकत्र करावं लागेल. आदिवासी लोक बहाद्दूर असतात. त्यांना मदतीला घे. जर तुला राज्याभिषेक झाला व मग वनवासाला गेलास तर राजा म्हणून ते वनवासात तुझ्याशी मैत्री करणार नाहीत. अयोध्येचं सैन्य रावणाच्या सैन्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. त्यामुळे तू वनवासाला जा. भरताचा राज्याभिषेक करूया. पण ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. याला प्रचंड विरोध होईल. अगदी अयोध्येचा जनसागर ही मागे राहणार नाही. त्यामुळे मी महाराजांनी मला दिलेल्या वचनांचा उपयोग करून घेते. कारण ‘प्राण गेले तरी वचन मोडणार नाही ‘ हे आपले तत्व सर्वांना परिचित आहे.
सगळं ठरवल्याप्रमाणे झालं. त्यातच शूर्पणखेचा अपमान झाला. त्यामुळे तिच्या भावाने युद्ध पुकारलं. त्यात तिचा भाऊ व बरेच राक्षस मारले गेले. याचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेला पळवून नेलं. त्यामुळे रामाला सर्वांची सहानुभूती मिळाली. रावणाचा विनाश करणं ही सगळ्या आदिवासींना आपली जबाबदारी वाटली. व रावणाचा शेवट झाला. आता या सगळ्यात सांगा बरं, मी काय चूक केली. महाराजांचा मृत्यू फार पूर्वीच लिहिला गेला होता, तरीही त्यांच्या मृत्यूला मला जबाबदार धरलं. मी एकाही पुत्राचा मृत्यू होऊ दिला नाही हे मात्र कोणालाच जाणवलं नाही. रामाचं वनवासाला जाणं, महाराजांचा मृत्यू या गोष्टींचा मानसिक त्रास सर्वांसारखाच मलाही होणार होताच ना? कां या दुःखापेक्षा भरताला राज्याभिषेक करणं मला जास्त आनंददायी होतं? माझ्या पोटच्या मुलानंही मला वैरीण ठरवलं. पुन्हा माझं तोंड बघायलाही तो आला नाही. याची मला आधी कल्पना नव्हती असं वाटतंय कां तुम्हाला? या घटनेनंतर आपलं काय होणार हे पुरेपूर माहीत असून मी काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला. तो केवळ पुत्राचा मृत्यू न होता पुत्र शोक व्हावा यासाठी, आणि वाली व रावणाकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. कारण हा अपमान फक्त माझा किंवा महाराजांचा नव्हता तर साऱ्या राज्याचा होता. वाईट एवढंच वाटतंय की माझं हे बलिदान व्यर्थ गेलं नसलं तरी ते कुणालाच कळलंही नाही!!!
(मुकुटाची कथा ‘ रामायणातील काही माहिती नसलेल्या गोष्टी ‘ या सदरात मिळाली. काहींच्या मते ही खोटी आहे असंही वाचनात आलं. पण रामाने वालीचा वध करून सुग्रीव याला राजा करण्याच्या कृतीला पुष्टी मिळण्यासाठी उपयोगी असल्याने लेखात घेतली आहे.)
– लेख क्र. ८
☆
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






