श्री विष्णू सोळंके

? इंद्रधनुष्य ?

☆ शिवटेकडी… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

इंद्रपुरी अमरावती आणि सामाजिक, सांस्कृतिक ऐतिहासिक वैभव जपणारी शिवटेकडी……..

अमरावती या शहराला आधी उमरावती, असे सुद्धा म्हणायचे. इंद्रपुरी अमरावती असा सुद्धा इतिहासात उल्लेख आढळतो. अशाप्रकारे मग आज ही अमरावती महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे.

इथे या शहरात आहे ही प्रसिद्ध ‘ शिवटेकडी ‘. यापूर्वी याच टेकडीला मालटेकडी म्हणून सुद्धा लोक म्हणायचे. पूर्वी या टेकडीवर मोठ्या प्रमाणावर उंची दगड होते. सकाळ आणि संध्याकाळी येथे शेकडो माणसे, बालके आणि स्त्रिया फेरफटका मारायला येतात. शहराच्या अगदी मध्यभागी ही एक टेकडी आहे.

पुढे १९९१ मधे या टेकडीवर तत्कालीन राष्ट्रपती श्री निलमसंजीव रेड्डी साहेब यांचे हस्ते शिवाजी महाराज यांचा एक सुरेख पुतळा उभारण्यात आला. तर काही मुस्लिम बांधवांनी एका बाजूला त्यांची मजार सुद्धा बांधली आहे. आजही अनेक मुस्लिम समाज बांधव हे दर गुरुवारी तसेच शुक्रवारी येथे दर्शनासाठी येतात ही वस्तुस्थिती आहे.

तसेच या शिवटेकडीचे नावाने एक संवर्धन समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचे माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी म्हणून करण्यात आली आहे. हे स्थळ एक आत्मिक समाधान व आनंद देणारे अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर ही माता रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. तर भगवान श्रीकृष्ण यांनी रुख्मिणीचे हरण येथे केल्याची आख्यायिका सुद्धा सांगीतली जाते.

अशा शिवटेकडी येथे मी अनेक दिवसांपासून पहाटे जात असताना मनात एक विचार आला. कारण हे गाव संत गाडगेबाबा यांचे गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छता अभियान राबविले. अनेक गोरगरीब यांना आपल्या दशसुत्रीचे माध्यमातून सामाजिक बांधिलकी आयुष्यभर जपली. तर

दुसरे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा आपल्या गीताने देशातील सैन्य यांना प्रेरणा दिली. चीनच्या युद्ध प्रसंगी ते सीमेवर गेले हा एक इतिहास आहे.

अमरावती येथे अंबादेवी मंदिर अतिशय पुरातन काळापासून आहे. नवरात्रात संपूर्ण महाराष्ट्रातील लोक येथे 

मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. तर स्व. अंबादासपंत वैद्य यांनी हनुमान आखाडा १९१४ मधे स्थापन केला. आज त्यांचेनंतर पद्मश्री श्री. प्रभाकररावजी वैद्य साहेब हे या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनात काम करीत होते. ते सुद्धा येथे राहत होते. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी सुद्धा या व्यायाम प्रसारक मंडळात तेव्हा येऊन गेले होते. आज अमरावती जिल्ह्यातील हे व्यायाम प्रसारक मंडळ जागतिक स्तरावर काम करीत आहेत. येथे अनेक राष्ट्रातील खेडाळू आहेत. १९१४ ते १९४७ या जवळपास ३३ वर्षात अनेक कार्यकर्ते येथे येऊन राहत होते. स्वातंत्र लढ्यात त्यांचा सहभाग होता. वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी त्या काळात कृष्ठरोगी माणसांची सेवा अहोरात्र केली. आज तपोवन नावाने ही संस्था अनेक वर्षेपासून हे काम करीत आहे.

डॉ पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिले कृषीमंत्री होते. ते सुद्धा अमरावती जिल्ह्यातील. तर संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गझल देणारे कविवर्य सुरेश भट यांचा जन्म अमरावती येथील. सुरेश भट यांनी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी गझल पोहचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. अनेक चित्रपटगीते सुद्धा भटांनी लिहिले आहे.

अशा प्रकारे माझे समोर ही सारीच माणसं एकत्र येऊ लागली. आणि हा एक विचार मनात आल्यानंतर या शिवटेकडी संदर्भात असलेल्या सुंदर अशा कवितेचा जन्म झाला. मला कोणत्याही प्रकारे कल्पना नव्हती की, ही कविता अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत गुडेवार साहेब यांनी एका शिलालेखात शिवटेकडी येथे जवळ जवळ साठ हजार रुपये खर्च करून अमरावती महानगरपालिका यांच्या माध्यमातून लावली. हा माझा मोठा सन्मान मी समजतो.

आज या नवीन पिढीचे वाचन कमीच झाले आहे. साहित्याकडे वाचकांचा ओढा कमी होत आहे हीच माझी खंत आहे. तरी सुद्धा जेव्हा एखादी कविता जन्माला येत असते तो आनंद काही वेगळाच असतो. अमरावती जिल्ह्यातील व अमरावती शहरातील हे सर्व साहित्यिक, सामाजिक, ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय जळणघडण व वैभव यांचा या कवितेत समावेश आहे. आयुष्यात शेवटी आठवणीच शिल्लक राहतात. माणूस हा निघून जात असतो. ही कविता अमरावती जिल्ह्यातील येणाऱ्या नवीन पिढीला सुद्धा एक मार्गदर्शक ठरेल हे मात्र खरे आहे…… अशाप्रकारे ही कविता अमरावती जिल्ह्यातील सर्वच नागरिक यांना अर्पण करतो आहे.

जवळपास वीस वर्ष पासून सुरेश भट यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मला लाभले आहे. अमरावती येथे सुरेश भट यांचे स्मारक शासनाने करावे यासाठी मी पाच वर्ष पासून सातत्याने शासकीय स्तरावर पाठपुरावा करीत आहो. शासनाने हे स्मारक अमरावती येथे करावे अशी जाहीर विनंती सुद्धा मनापासून करतो. कारण तेव्हा तरुण भारतचे संपादक म्हणून काम करीत असताना स्व. वामनराव तेलंग म्हणायचे की विष्णू, हे गाव लेखक कवी साहित्यिक कलावंत यांचे गाव आहे. मग ते सुरेश भट, मधुकर केचे, उद्धव शेळके, विद्याधर गोखले, के. ज. पुरोहीत, विश्राम बेडेकर, राम शेवाळकर, तर आजही भारताचे सरन्यायाधीश म्हणून श्री. भुषण गवई साहेब काम करीत आहेत.

तर असे हे अमरावती गांव सामाजिक बांधिलकी जपणारे म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदू मुस्लिम एकतेची नांदी असलेले हे गाव आहे. दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या कामाचे गाव म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते.

आणि इथली ही शिवटेकडीही त्याप्रमाणेच प्रसिद्ध आहे.

मला ही शिवटेकडी आयुष्यात नेहमीच सोबत करते हे मात्र खरे आहे…….

इंद्रपुरीच्या वैभवाची साक्ष ही शिवटेकडी 

छत्रपतींच्या समतेची ज्योत ही शिवटेकडी…

*

अंबामाता इंद्रपुरीचे दैवत आहे खरे आहे 

पटवर्धन तुकडोजींच्या छायेची शिवटेकडी…

*

गाडगेबाबा, पंजाबराव खापडैची इंद्रपुरी 

हिंदू मुस्लिम एकतेची नांदी ही शिवटेकडी…

*

फुले आंबेडकर शाहूंच्या समतेचे गाव हे

लहान थोरा इथे सावली देते ही शिवटेकडी…

*

हनुमान आखाडा हे भुषण सा-या देशाचे 

सुरेश भटांच्या गझलेची साक्ष ही शिवटेकडी…

*

माणसांच्या आयुष्याची कथा व्यथाच ही ऐकते 

सुख दुःखाच्या वळणावरची सोबत ही शिवटेकडी…

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted