श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ ग्रहणासंबंधित अतिरंजित दावे… ☆ श्री जगदीश काबरे ☆
– – ग्रहणासंबंधित अतिरंजित दाव्यांचा भांडाफोड
मानवजातीच्या इतिहासात आकाशातील नैसर्गिक घटनांनी नेहमीच कुतूहल निर्माण केले आहे. सूर्य अचानक काळवंडणे किंवा चंद्राचा पांढरट प्रकाश रक्तवर्णी होणे, ही दृश्ये आजही सामान्य लोकांना चकित करून जातात. आजच्या आधुनिक विज्ञानयुगात आपणास ठाऊक आहे की सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या पूर्णपणे खगोलशास्त्रीय घटना आहेत. परंतु हजारो वर्षांपासून समाजात यांच्याशी निगडित अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. ग्रहणावेळी वातावरण दूषित होते, प्राणिमात्रांवर अनिष्ट परिणाम होतात, गर्भवती स्त्रियांसाठी हा काळ धोकादायक असतो, राहू-केतू सूर्य व चंद्राला गिळतात अशा समजुती अजूनही लोकमानसात ठामपणे आहेत. भारतात तर शिक्षित मंडळीही ग्रहणासंदर्भात असे अनेक अतिरंजीत दावे करताना दिसतात. तेव्हा त्यांना शिक्षित म्हणावे का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण त्या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही हे विविध संशोधन आणि खगोलशास्त्रीय अभ्यासांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे.
१) सर्वप्रथम, “ग्रहणाच्या वेळी वातावरण अशुद्ध होते” हा दावा वैज्ञानिक दृष्टीने कसा चुकीचा आहे हे पाहू. सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण, हे आकाशीय घटनेमुळे घडते. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्या मधोमध येतो, तर चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. हे ज्ञान शालेय स्तरावर सगळ्यांना दिलेले असतेच. सूर्यग्रहणाच्या वेळी काही मिनिटांसाठी पृथ्वीवरील विशिष्ट भाग अंधारात जातो, परंतु याचा हवा, पाणी वा वातावरणाच्या गुणवत्तेवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही, असे नासाच्या (NASA) व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
The Astronomical Journal मध्ये जेम्स पासाचॉफ यांच्या संशोधनानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी वैज्ञानिकांना सूर्याच्या कोरोना (Corona) या बाह्य थराचे निरीक्षण करण्याची अनोखी संधी मिळते. वातावरण दूषित होण्याऐवजी विज्ञानाच्या दृष्टीने ही घटना अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. कसे ते समजण्याविषयी १९व्या शतकात भारतात घडलेल्या एका खगोलीय घटनेची माहिती देण्याचा मोह आवरत नाही.
१८ ऑगस्ट १८६८ रोजी भारतातून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण झाले होते. या ग्रहणाचे तत्कालीन बॉम्बे प्रेसीडेंसीतल्या विजयदुर्ग किल्ल्यावरून जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पियरे जॅन्सेन या फ्रेंच शास्त्रज्ञाने निरीक्षण केले. त्या काळात सूर्याच्या रचनेबद्दल फारशी माहिती नव्हती. जॅन्सेन यांनी स्पेक्ट्रोस्कोपच्या साहाय्याने सूर्याच्या प्रकाशाचे विश्लेषण केले. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा बाह्य थर म्हणजे क्रोमोस्फिअर दिसतो. जॅन्सेन यांनी त्यातून निघणाऱ्या प्रकाशात एक वेगळी पिवळसर रेषा पाहिली. ही रेषा हायड्रोजनच्या रेषेपेक्षा भिन्न होती. ही नवी स्पेक्ट्रल रेषा पृथ्वीवर ज्ञात असलेल्या कोणत्याही घटकाची नव्हती. जॅन्सेन यांनी तो घटक सूर्याच्या वातावरणात असावा असा अंदाज व्यक्त केला. जवळपास त्याच काळात इंग्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ नॉर्मन लॉक्यर यांनीही हाच स्पेक्ट्रल परिणाम नोंदवला. या नवीन अज्ञात घटकाला ग्रीक भाषेत सूर्य म्हणजे ’हेलिऑस’ या शब्दावरून नाव देण्यात आले—’हेलियम’. जर तुम्ही कधी विजयदुर्गला गेलात तर तिथे या प्रयोगासंबंधीची माहिती एका कळ्या रंगाच्या संगमरवरी शिलेवर नमूद केलेली वाचायला मिळेल.
असो. हे झाले थोडे विषयांतर, आता मूळ मुद्द्याकडे पुन्हा वळूया.
ISRO च्या २०१० मधील अहवालात स्पष्ट केले आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी काही मिनिटे प्रकाश कमी झाल्यामुळे पृथ्वीवरील तापमान किंचित घटते, परंतु त्या लहानशा बदलामुळे कोणताही प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच “अशुद्धता” ही धारणा केवळ अंधश्रद्धेवर आधारित आहे. एवंच पृथ्वीवरील हवेच्या रचनेवर, रासायनिक संयुगांवर किंवा ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइडच्या संतुलनावर कोणताही परिणाम होत नाही.
खालील संशोधनात ग्रहणावेळी फक्त सूर्यप्रकाश कमी होतो, वातावरण दूषित होत नाही, असे स्पष्ट केले आहे.
NASA. Eclipse 101: What Happens During an Eclipse? (NASA Official Website)
ISRO. Solar and Lunar Eclipses Explained. (Indian Space Research Organisation Publications)
Jay M. Pasachoff, The Solar Corona and Solar Eclipses, The Astronomical Journal, 2009
२) दुसरा दावा म्हणजे ग्रहणकाळात प्राणिमात्रांवर अनिष्ट परिणाम होतो. प्रत्यक्षात अनेक प्राणी व पक्षी नैसर्गिक प्रकाशावर अवलंबून असतात, त्यामुळे अचानक अंधार पडल्याने त्यांचे वर्तन थोडे बदलते. उदाहरणार्थ, सूर्यग्रहणाच्या वेळी काही पक्षी घरट्यात परततात किंवा कीटकांची हालचाल थांबते. मात्र हे बदल तात्पुरते असून त्यातून कोणताही दीर्घकालीन अपाय होत नाही. Journal of Astronomical Society of India मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हे केवळ पर्यावरणीय प्रकाशातील बदलांमुळे होते, वातावरणीय अशुद्धतेमुळे नव्हे. कारण प्रत्यक्षात काही प्राण्यांचे वर्तन प्रकाशावर अवलंबून असल्याने त्यांना तात्पुरते बदल जाणवतात. उदाहरणार्थ, बेडूक आवाज थांबवतात, फुलपाखरे गोंधळून जातात. मात्र हे बदल क्षणिक असतात. ग्रहण संपताच ते पुन्हा नैसर्गिक वर्तन करतात.
२०१७ मधील अमेरिकेतील पूर्ण सूर्यग्रहणावेळी NASA ने प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. प्राणीसंग्रहालयातील सिंह व माकडे काही मिनिटे अस्वस्थ झाले होते, परंतु लगेच पुन्हा नेहमीसारखे वागू लागले. याचा अर्थ असा की, ग्रहणामुळे प्राण्यांचे आरोग्य, जीवनशक्ती किंवा पर्यावरणावर काहीही अनिष्ट परिणाम होत नाही.
Sharma, R. et al. (2018). Animal Behaviour during Solar Eclipse in India, Journal of Astronomical Society of India. — यात स्पष्ट केले आहे की वर्तनातील बदल हे फक्त प्रकाशातील अचानक घटामुळे होतात.
अमेरिकेतील २०१७ च्या सूर्यग्रहणादरम्यान प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास…
NASA. Do Animals React to Solar Eclipses?
३) भारतीय समाजात विशेषतः गर्भवती स्त्रियांवर ग्रहणकाळात कठोर बंधने घातली जातात. “त्वचा नाजूक झालेली असते”, “गर्भावर दूषित वातावरणाचा परिणाम होतो” अशी कारणे सांगितली जातात. परंतु वैद्यकीय शास्त्र या दाव्यांना पूर्णतः नाकारते.
American College of Obstetricians and Gynecologists (ACOG) तसेच Indian Council of Medical Research (ICMR) यांच्या अभ्यासांनुसार गर्भवतींवर ग्रहणाचा काहीही दुष्परिणाम होत नाही. गर्भवती स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे आहार, स्वच्छता, मानसिक ताण, रक्तदाब, शारीरिक हालचाल, परंतु ग्रहणाचा त्याच्याशी संबंध नाही.
The Mayo Clinic च्या ‘Pregnancy Myths and Misconceptions’ या अहवालात स्पष्टपणे सांगितले आहे की, ग्रहणकाळात बाहेर पडल्यामुळे गर्भाला काही धोका निर्माण होत नाही. उलट, या भीतीमुळे स्त्रियांना मानसिक ताण येतो आणि तोच आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
थोडक्यात काय तर, गर्भवती स्त्रियांवरील बंधनांविषयीचे विधानही अंधश्रद्धेवर आधारित आहे. वैद्यकीय विज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्यावर योग्य आहार, व्यायाम, मानसिक शांतता आणि स्वच्छता यांचा परिणाम होतो, ग्रहणाचा काहीही परिणाम होत नाही.
गर्भधारणेशी संबंधित अंधश्रद्धांचा भंडाफोड खालील अभ्यासातून केलेला आहे.
American College of Obstetricians and Gynecologists (ACOG). Guidelines for Pregnancy Care. — ग्रहणाचा गर्भवतींवर कोणताही दुष्परिणाम होत नाही असे स्पष्ट.
Indian Council of Medical Research (ICMR). Health Myths and Facts in Indian Context. — “ग्रहणामुळे गर्भावर परिणाम होतो” ही धारणा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची असल्याचे स्पष्टीकरण.
Mayo Clinic, USA. Pregnancy Myths and Misconceptions.
४) शेवटी, भारतीय पुराणकथांमध्ये राहू-केतू हे दोन असुर ग्रहणकाळात सूर्य व चंद्राला गिळतात अशी कथा सांगितली जाते. परंतु खगोलशास्त्रात राहू-केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाहीत. म्हणून “राहू-केतू सूर्य-चंद्राला गिळतात” हा दावा खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीचा आहे. प्राचीन भारतीय गणितीय खगोलशास्त्रानुसार चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षेतील फरक ५ अंशाचा असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना ज्या दोन छेदनबिंदूत पृथ्वीच्या कक्षेला छेदतो त्या पृथ्वी व चंद्राच्या कक्षेच्या छेदनबिंदूंना राहू-केतू अशी नावे देण्यात आली. त्या ठिकाणी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आले की ग्रहण घडते. त्यामुळे “गिळणे” हा केवळ पुराणकथेतला रूपकात्मक उल्लेख आहे, वैज्ञानिक सत्य नव्हे. Meghnad Saha Institute of Science व Aryabhatta Research Institute of Observational Sciences (ARIES) यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनातही ग्रहणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिलेले आहे.
ग्रहणाचे शास्त्रीय स्वरूप व गणितीय विश्लेषण करत राहू-केतू हे प्रत्यक्ष ग्रह नसून चंद्रकक्षेचे छेदनबिंदू (Lunar Nodes) आहेत, हे खालील संदर्भ स्पष्ट करतात.
- Abhyankar, K.D. (1993). Concept of Rahu and Ketu in Indian Astronomy, Indian Journal of History of Science.
- Aryabhatta Research Institute of Observational Sciences (ARIES). Educational Notes on Eclipses.
(पुराणातील “गिळणे” हे रूपक असून खगोलशास्त्रात यामागील स्पष्ट गणितीय कारण दिलेले आहे.)
- Saha, Meghnad. Treatise on Eclipses and Celestial Mechanics.
अशा प्रकारे, ग्रहणाशी संबंधित वातावरणीय दूषितपणा, सर्व प्राणिमात्रांवरील अनिष्ट परिणाम, गर्भवतींसाठी विशेष धोका आणि राहू-केतू गिळणे या सर्व गोष्टी अंधश्रद्धा व पुराणकथांवर आधारित आहेत. आधुनिक खगोलशास्त्र व वैद्यकशास्त्र यावर ठामपणे शिक्कामोर्तब करते की ग्रहण हा केवळ आकाशीय घटकांचा परिणाम आहे; त्याचा आरोग्य, वातावरण किंवा प्राण्यांच्या दीर्घकालीन आयुष्यावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही, हे सिद्ध झालेले असतानाही भारतातील अनेक शिक्षित अंधश्रद्ध मात्र हा कुठलाही अभ्यास न करता अशा अनेक अंधश्रद्धा आपल्या मनाशी घट्ट कुरवाळून बसलेले असतात. हे अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी १९व्या शतकातील गोपाळ गणेश आगरकरलिखित ’सुधारक’ पत्रातील “आमचे ग्रहण अजून सुटलेच नाही.” हा लेख जरूर वाचावा आणि आपल्या डोक्यातील अंधश्रद्धेची जळमटे दूर करावीत.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





