श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “बारा अमावस्यांचा हा गराडा सुटेल का कधी?” –  भाग – 1 ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

गेल्या २० वर्षांमध्ये प्रतापगडावर मी आजवर अक्षरशः शेकडो वेळा गेलो आहे. पौर्णिमेच्या रात्री गेलो आहे, दीपोत्सव करायला गेलो आहे,भर पावसात भिजत कुडकुडत गेलो आहे, गारठ्याच्या थपडा खात गेलो आहे, जावळीतून जंगलाच्या वाटेनं गेलो आहे, कुंभरोशी पासून गेलो आहे, निसणीच्या वाटेनं गेलो आहे, किनेश्वर पासून गेलो आहे, रडतोंडी मधून गेलो आहे. आंबेनळी, रडतोंडी, पारघाट हे सगळं अनेकदा पायी पालथं घालून झालं आहे. हे सगळं कशासाठी? फक्त एकच गोष्ट – शिवाजी महाराजांच्या अफाट बुध्दीवैभवाविषयीचं विलक्षण प्रेम..!

शिवाजी महाराजांच्या वयोमानानुसार त्यांच्या चरित्रातल्या घटनांचा आढावा घेतला तर मीच काय, प्रत्येकजण मुग्ध होईल. मानसशास्त्रातल्या शारीरिक वय आणि मानसिक वय या दोन्ही संकल्पना शिवचरित्रातल्या प्रसंगांना लावून पाहत गेलो की, प्रत्येक ठिकाणी असं वाटायला लागतं की, ज्या वयात महाराजांनी ज्या अवघड प्रसंगांना तोंड दिलं आणि विजय मिळवला, त्या वयात सर्वसामान्य व्यक्ती काय करतात? ज्या वयात मुलांना चेक अन् डिमांड ड्राफ्ट मधला फरकसुध्दा समजत नाही, ज्या वयात मुलांना वागण्या-बोलण्याचा पाचपोच येत नाही, त्या वयात शिवाजीराजे आपल्या असामान्य बुध्दीचातुर्याच्या बळावर चार-चार पातशाह्यांना साम-दाम-दंड-भेदावर अक्षरशः नाचवत होते. अख्खे च्या अख्खे नवे दुर्ग निर्माण करत होते. नवनवी हुशार, शूर, प्रसंगावधानी माणसं निवडून त्यांना आपलीशी करत होते. न्यायनिवाडे करत होते. गुन्हेगारांचे चौरंग करत होते. स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर जनमानसामध्ये स्वतः विषयी दृढ विश्वास उत्पन्न करत होते. दुष्टांना तातडीने शासन आणि सज्जनांचं, गुणवंतांचं प्रतिपालन करत होते. स्वराज्य म्हणजे नेमकं काय आणि त्याचे पैलू कोणकोणते असावेत हे ठरवत होते. हे सगळं उभं करताना केवळ तलवार नव्हें तर लेखणीही वापरत होते.

स्वराज्यनीती आखत असताना जे संकल्पचित्र त्यांनी स्वतःसमोर ठेवलं होतं, त्याची सुस्पष्टता एका रात्रीत आलेली नाही. कित्येक तास, कित्येक प्रहर, कित्येक रात्री त्यांनी स्वराज्यचिंतनात घालवलेल्या असतील. केवढा सकारात्मक स्वसंवाद साधला असेल, त्याची गणती नाही, नोंद नाही. तो महाराजांचा मनोव्यापार कुठंही नोंदवलेला दिसत नाही. तीनशे वर्षं गुलामगिरीत अन् अत्याचारात पिचत पडलेल्या महाराष्ट्राला स्वतंत्रतेची संजीवनी देणाऱ्या महाराजांची मानसिक तपश्चर्या आजवर कुणी मांडली आहे?

मी प्रतापगडावर गेलो की, सईबाईसाहेबांच्या निधनानं दुःखी झालेल्या आणि इच्छा असूनही त्यांचं अंत्यदर्शन घेऊ न शकणाऱ्या राजांनी गडावर कुठं उभं राहून स्वतःच स्वतःचं सांत्वन केलं असेल, हे शोधत फिरतो. आपल्या पत्नीच्या अकाली निधनाचा शोक व्यक्त करायला सुध्दा वेळ मिळू नये, अशा दैवगतीच्या विचित्र फेऱ्यातून राजे कसे बाहेर पडले असतील? तो त्यांचा स्वसंवाद कुठं मिळतो का, हे पाहत फिरतो. अगदी लहान वयात आईचं छत्र गमावलेल्या शंभूराजांच्या विषयी त्यांच्या काळजात किती गलबला सुरु असेल, त्याचे अंश कुठं दिसतात का, हे शोधतो. खानाला मारुन वाऱ्याच्या वेगानं गडाच्या दरवाजातून येणाऱ्या राजांच्या अंगाचे घामाचे थेंब तिथं पडले आहेत. कपाळीच्या वारातून झालेल्या जखमेतून एखादा रक्ताचा थेंब तिथं सांडला असेल.. मी तो लाखमोलाचा थेंब शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

पण पिठलं भाकरी, भरलं वांगं, मटकी उसळ, पुरणपोळी, मिसळपाव, वडापाव, कांदा भजी, ताक, लस्सी, सोलकढी, लिंबू सरबत, कोकम सरबत, टीशर्ट, टोप्या, गॉगल्स यांच्या दुकानांच्या गर्दीत मला ह्यातलं काहीच गवसत नाही. गेल्या पंधरा वर्षांत मला तिथलं इतिहासाचं अस्तित्वच पुसट होत चाललंय असं जाणवतं.

राजांच्या मनातला कुणालाही शब्दांत कधीच न मांडता आलेला एक अतिशय हळवा कोपरा याच गडावर आहे., हो.. अजूनही इथंच आहे.. त्यांचं मंत्रमुग्ध करणारं शौर्य जगापुढं आहे, पण त्यांचं पत्नीवियोगाचं मूक रुदन, त्यांचे अदृश्य अश्रू – जे इतिहासाच्या पानांनी स्वतःवर लिहून घेतलेले नाहीत, तेही इथंच आहेत..!

एका बाजूला पराकोटीचं दुःख अन् दुसऱ्या बाजूला स्वराज्यावरच्या संकटाला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये उभं केलेलं धैर्य… हे द्वंद्व उकलून सांगणारा, राजांची व्यथा उलगडून दाखवणारा एकही गाईड मला प्रतापगडावर आजतागायत दिसला नाही. पंताजी गोपीनाथ बोकीलांची वकिली सांगणारा गाईड मला आजपर्यंत प्रतापगडावर सापडला नाही. कान्होजी जेध्यांचं भक्कम इमान इथले गाईड सांगत नाहीत. बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्यातल्या माणसांची कामगिरी इथले गाईड सांगत नाहीत.

साक्षात् आई जगदंबेेनं दृष्टांत देऊन महाराजांना आशीर्वाद दिलेलं हे स्थान आहे. त्याचा साधा उल्लेखसुध्दा हे गाईड करत नाहीत. शिवप्रताप दिनाच्या आदल्या रात्रीची राजांची थोरली मसलत नेमकी कुठं झाली असेल, हे एकाही गाईडला दाखवावंसं वाटत नाही. अफजलखानाची कपटी आणि क्रूर वृत्ती हे गाईड सांगत नाहीत. साठ कबरा हे काय प्रकरण आहे, हे सांगत नाहीत. भेटीच्या वेळी पहिला दगा खानानं केला हेही प्रतापगडाचे गाईड अजिबात सांगत नाहीत. (पण जंजिऱ्यावरचे गाईड मात्र सिद्धीचं कौतुक गाताना घसा पार कोरडा झाला तरी थकत नाहीत. बोटीच्या अर्ध्या तासाच्या प्रवासात जंजिऱ्याचा नावाडी सिद्दी हा कसा लोककल्याणकारी होता आणि त्यानं प्रजेसाठी काय काय चांगलं केलं हे तो मनावर ठसवतोच. पद्धतशीर ब्रेनवॉशची पद्धत..!

जंजिऱ्यावर डोळ्यांवर गॉगल चढवून, सोबतच्या व्यक्तीचा हात हातात घेऊन, कुशीत घेऊन, मिठीत घेऊन फोटो काढण्यासाठी आलेली माणसं इतिहासाची पुस्तकं वाचून आलेली नसतात. ती ह्या गुणगानाला बळी पडतातच..!

जनीच्या टेंभावर सध्या जाता येत नाही. पण नेमकी लढाई झाली कशी अन् खानाच्या छावणीचा खुर्दा राजांनी उडवला कसा, हे समजावून सांगण्यासाठी प्रतापगडाचा एक गुंडाळी नकाशा सोबत ठेवून गाईड ही लढाई सांगू शकत नाही का? वाघनखाचं एक मॉडेल सोबत ठेवून ते दाखवू शकत नाही का? आपल्या सोबत एखादं चिलखताचं चित्र सोबत ठेवू शकत नाही का? “राजं, माझं एवढं मागणं ऐका. अंगाला सील करा.” असं राजांना अत्यंत काळजीनं सांगणारे कृष्णाजी बंककर लोकांना सांगावेत, हे त्या गाईडच्या कल्पनेतही नसतं. कुठल्याही मोहिमेवर असोत किंवा कितीही कामात असोत, पण राजांची रोजची देवपूजा आणि व्यायाम कधीही चुकला नाही, हे गाईडनं का सांगू नये?

एकाही गाईड जवळ दुर्बीण नाही. जावळीचा प्रदेश आणि प्रतापगडाच्या चारही बाजूंनी असणारे वेगवेगळे दुर्ग अन् घाटवाटा दुर्बिणीशिवाय कशा दाखवता येतील? सह्याद्री मधला एखादा दुर्ग लोकांना दाखवणाऱ्या गाईडकडं एखादी चांगली दुर्बीण असणं ही वन टाईम इंव्हेस्टमेंट असते. पण तेही नाही.

१९३२२४ हा पिनकोड तुम्हाला माहिती आहे का? जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यात किशनगंगा नदीच्या काठी भारतातलं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचं पोस्ट ऑफिस आहे. तिथं जाणारे अनेक पर्यटक त्या पोस्ट ऑफिस मधून स्वतःच्या घरच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पोस्ट करतात. म्हणजे, भारतातल्या या सीमेवरच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का असलेलं पत्र त्यांना घरपोच मिळतं आणि ती एक अविस्मरणीय आठवण त्यांच्या संग्रही राहते.

असंच एक पोस्ट ऑफिस प्रतापगडावर आहे. ४१२८०६ हा प्रतापगड किल्ल्याचा पिनकोड आहे. इथून पाठवलेल्या पोस्टकार्ड वर प्रतापगडाचं चित्र असलेला एक विशेष शिक्का मिळतो. पण गाईड हे सांगतच नाहीत. फक्त ५० पैसै किंमतीचं एक पोस्टकार्ड गाईडनं दिलं आणि दोन मिनिटांत त्यावर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असं लिहायला लावून ते पोस्ट करायला लावलं तर प्रतापगडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक उत्तम आठवण संग्रही राहील. एखाद्या उत्तम स्केच आर्टिस्ट कडून केवळ पोस्ट कार्ड्स वर शिवाजी महाराजांची छोटीशी स्केचेस, राजमुद्रा, कॅलिग्राफी मधली घोषणा किंवा आज्ञापत्रातलं एखादं वाक्य असं काही करुन घेऊन ती कार्ड्स स्वतःच्या पत्त्यावर पोस्ट केली तर कुठल्याही सेल्फी किंवा मोबाईलवर काढलेल्या फोटोपरीस त्या पोस्टकार्डचं महत्त्व सोन्याहून मोठं असेल…! पण प्रतापगड दुर्ग पर्यटनाकडे ती दृष्टीच नाही…!

– क्रमशः भाग पहिला

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.
0

खूप छान आणि भावुकतेनी लिहिलेली माहिती मयुरेशजी