श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ झपाटलेली माणसं… ☆ श्री जगदीश काबरे ☆

काल एका ध्येयवेड्या परिवाराशी गाठ पडली. सामान्य स्थितीत असलेला माणूसही जर समाजाप्रती सजग असेल तर तो किती उत्तुंग झेप घेऊ शकतो याचे हा परिवार म्हणजे जितेजागते उदाहरण आहे. या परिवाराला गरिबीचा तिटकारा असला तरी गरिबांच्या विषयी मात्र त्यांचे हृदय करुणेने ओथंबलेले आहे, याचा प्रत्यय ते करत असलेले कार्य पाहून आला.

श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, गौरगांव, ता. तासगाव संचलित माऊली बालाश्रम व वृध्दाश्रम ही एक सामाजिक बांधिलकीची, लोककल्याणकारी चळवळ आहे. माऊली बालाश्रम व वृध्दाश्रम हे नाव उच्चारले की, माऊलीच्या हस्तस्पर्शाची ऊब मनाला जाणवते. हा आश्रम म्हणजे फक्त एक दगडाच्या चीऱ्यांनी निर्माण होणारी इमारत नाही, तर समाजातील जखमी आत्म्यांना दिलासा देणारे ते एक जिवंत मंदिर होणार आहे. शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, व्यक्तिविकास आणि कौशल्यविकास या पाच भक्कम स्तंभांवर उभारलेले हे ध्येयविधान समाजातील उपेक्षित, वंचित आणि निराधार घटकांना नवजीवन देण्याची हमी देत आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना सुरक्षित आश्रय, उत्तम शिक्षण आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देणारी ही संस्था केवळ सेवाकार्यच करणारी नाही तर समाजाला दिलासा देणारे आश्वासन आहे. ऊसतोड कामगारांची लेकरं, निराधार व अनाथ बालकं, दिव्यांगांची लेकरं, एकल पालकांची मुलं – या सगळ्यांसाठी हा आश्रम म्हणजे काळोखातून उगवणाऱ्या प्रकाशाची किरणरेषा आहे.

जुगळाई मळा, गौरगांव येथे उभारण्यात येत असलेला हा आधुनिक निवासी आश्रम हे त्यांच्या कार्याचे ठोस प्रतिक आहे. इथे अनाथ, निराधार, दिव्यांग, ऊसतोड कामगारांची मुले, एकल पालकांची मुले अशा सर्व दुर्लक्षित गटातील बालकांना उबदार छत, उत्तम संस्कार आणि भविष्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचे ध्येय राबवले जाणार आहे. हा आधुनिक आश्रम त्यांच्या शिक्षणासाठी, व्यक्तिविकासासाठी, कौशल्यविकासासाठी आणि आरोग्यासाठी उभा राहणारा दिशादर्शक प्रकल्प ठरणार आहे. समाजात कोणताच आधार नसेल, कुटुंब नसेल, हातावर पोट असलेल्या पालकांची दारिद्र्याशी झुंज सुरू असेल तर अशा सर्व मुलांना हा आश्रम आईच्या मायेप्रमाणे कवेत घेणार आहे. केवळ मुलांचाच नाही, तर कुटुंबाच्या छायेशिवाय जगणाऱ्या वृद्धांसाठीही हा आश्रम एक आपलेपणाचा, समाधानाचा निवारा ठरणार आहे. ज्यांना कोणी आधार नाही, त्यांच्यासाठीही ही संस्था एक जिव्हाळ्याचे घर ठरणार आहे.

या उच्च ध्येयाला हृदयाशी कवटाळून झुंजार आणि प्रतिमा हे बहिण-भाऊ कामाला लागले आहेत. त्यांच्या डोळ्यांतली जिद्द, हृदयातली माया आणि समाजासाठीचा प्रखर विश्वास हे या कार्याचे खरे बळ आहे. आज अनेक जण समाजासाठी काहीच न करता फक्त तक्रारीच करत असातात. पण झुंजार आणि प्रतिमा यांनी मात्र कृतीचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या हातून सुरू झालेल्या या कार्यात उद्याच्या सुदृढ समाजाचे स्वप्न आहे, मातीतल्या शेतकऱ्यांच्या अश्रूंना पुसण्याची ताकद आहे, आणि असंख्य जीवनांना नवसंजीवनी देण्याची उमेद आहे. या बहिण-भावाच्या अथक प्रयत्नांना आणि दूरदृष्टीला मनःपूर्वक सलाम. त्यांची ही वाटचाल केवळ समाजकार्यासाठी प्रेरणादायी नाही, तर प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार योगदान देण्याची जाणीव करून देणारी आहे. म्हणूनच या समाजाचे आपण काही देणे लागतो असे समजणाऱ्या सजग व्यक्तींना मी आवाहन करत आहे की, त्यांनी या आश्रमाला सढळ हस्ते वस्तुरूपी वा रोख रकमेची देणगी देण्यासाठी पुढे यावे. (त्यांचा संपर्क क्रमांक :‪+91 9834018536) कारण त्यांचा हा प्रवास म्हणजे निराधारांच्या आशेचा, जिद्दीचा आणि सेवाभावाचा दीपस्तंभ ठरणारा आहे. समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ज्यांना कुठलाही आधार दिसत नव्हता, त्यांच्यासाठी हा आश्रम म्हणजे नवीन आयुष्याचे दरवाजे उघडणारा आहे. त्यांचे हे प्रयत्न काळाच्या ओघात महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीही आदर्श ठरणार आहेत. त्यांच्या या उज्ज्वल कार्याला मनःपूर्वक सदिच्छा.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted