श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी…” ☆ श्री संभाजी बबन गायके

भारतरत्न श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी

खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी!

ओम… शुक्लांबरधरंविष्णू शशिवर्णम चतुर्भुजं… 

कौसल्यासुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते

उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम…

– – – तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द आधुनिक ध्वनिमुद्रण आणि ध्वनिप्रक्षेपण सुविधेच्या मत्कारामुळे देशभरातल्या सर्वसामान्य लोकांच्या घरा-घरांत घुमू लागले तेंव्हा पहाटवेळा रोमांचित होऊ लागल्या! याला यावर्षी उणीपुरी ३० वर्षे पूर्ण होताहेत.

पण गाण्याची ही काही तिची पहिलीच वेळ नव्हती. १६ सप्टेंबर १९१६ रोजी जन्मलेली ही कन्या कुंजम्मा… म्हणजे गोड मुलगी म्हणून संबोधली जायची. तिच्या नावातला पहिला इंग्रजी M तिच्या जन्मस्थळाचे मदुराईचे नाव मिरवतो. तर S म्हणजे ष्णमुखावदिवू अर्थात सहा मुखांनी सुशोभित कार्तिकेय. स्त्री असूनही पुरुष देवतेचे नाव धारण करणारी ही कुंजम्माची माता. वीणा वाद्य खूप उत्तमरीतीने वाजवणारी कलाकार. सुब्बुलक्ष्मी म्हणजे धनाची देवी. जन्माने देवदासी अर्थात देवाच्या सेवेत काया-वाचा-मन आणि नृत्यगीताच्या माध्यमातून समर्पित जीवन.

आई, शक्तीवेल नावाचा एक भाऊ आणि वदिवंबल नावाची एक बहीण असे चौघांचे कुटुंब मदुराईत हनुमन्तायार कोईल गल्लीत राहायचे. समाजाने गरीब महिलांवर लादलेलं हे देवदास्य पुढे औपचारिकरीत्या संपुष्टात आले असले तरी देवदासी महिलांचा उदरनिर्वाह आरंभी प्रामुख्याने गायन, वादन आणि नृत्यावरच चालत असे. एम. एस. यांना शालेय शिक्षण फारसे लाभले नाही. मात्र गाण्याचे शिक्षण मात्र सहजी मिळाले… एक नवी देवदासी तयार होत होती. वयाच्या दहाव्या वर्षी एम. एस. ने पहिले सार्वजनिक गायन सादर केले आणि काहीच वर्षांत तिची पहिली ध्वनिमुद्रिकासुद्धा निघाली! अर्थात देशाच्या इतर भागांत एम. एस. ची कीर्ती पोहोचायला आणखी काही वर्षांचा अवकाश होता.

गोष्ट १९३२ मधली आहे. कुंभकोणम मध्ये महामखम महोत्सव सुरु होता. के. सुब्र्हमण्यम नावाचे चित्रपट दिग्दर्शक मुख्य आयोजक होते. मुख्य गायकांना यायला काहीसा उशीर होत असल्याचे बघून एम. एस. च्या मातोश्रींनी आयोजकांना गळ घातली आणि बालिका एम. एस. पहिल्यांदा हजारो लोकांसमोर गायल्या…. त्यादिवशी त्यांना आणखी एकदा गाण्याची संधी मिळाली… मोठमोठे गायक उपस्थित होते त्या मंचावर. एम. एस. चे नाव झाले!

मदुराईमधील मंदिरांचा आणि तिथल्या श्रीमंत पुरुषांचा आश्रय सोडून एम. एस. आणि त्यांची आई मोठ्या संधीच्या शोधात चेन्नई (तत्कालीन मद्रास) शहरात आल्या. चौदा वर्षांच्या सुब्बुलक्ष्मी त्यांच्या अंगभूत गायनकौशल्यामुळे आणि सौंदर्यामुळे लवकरच लोकांच्या नजरेत भरल्या. तिथल्या एका मोठ्या संस्थेसाठी गायल्यामुळे तर त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. आनंद विकटन नावाच्या एका मासिकाने त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्याचे ठरवले. मुलाखत घेतली टी. सिवदासन नावाच्या एका व्यक्तीने. त्या मासिकाचे हे जाहिरात प्रतिनिधी त्यावेळेच्या इंग्रज सरकारविरोधात क्रांतिकार्य करीत असत आणि त्यासाठी त्यांना तुरुंगावासही घडला होता. सिवदासन यांनी मुलाखतीतून एम. एस. च्या पूर्वायुष्यातही डोकावले..

के. सुब्र्हमण्यम यांनी १९३८ मध्ये सेवासदनम नावाच्या चित्रपटात एम. एस. यांना संधी दिली आणि तो चित्रपट यशस्वी झाला.. आता कुंजम्मा अभिनेत्री झाल्या होत्या. तोवर सिवदासन यांनी एम. एस. यांच्याशी संपर्क वाढवला होता. त्यांनी एम. एस. यांना आणखी एका चित्रपटात संधी मिळवून देण्यात हातभार लावला… ‘शंकुतलाई’ नावाचा हा चित्रपट सिवादसन यांच्याच कंपनीने काढला होता… हाही चित्रपट चालला आणि एम. एस. मद्रासमध्ये सुस्थापित होण्याच्या मार्गावर अग्रेसर झाल्या!

दरम्यान एम. एस. यांच्या आईने त्यांचा विवाह एका श्रीमंत व्यक्तीशी करण्याचे ठरवले…. देवदासीपणाला जणू त्या शरण जाऊ पाहत होत्या… मात्र एम. एस. यांनी यावेळी बंड पुकारले…. तत्कालीन समाजव्यवस्थेतील छुप्या महिषासुराला या आधुनिक लक्ष्मीने दिलेले हे जणू आव्हानच होते!

…. सुब्बुलक्ष्मी यांनी ठाम नकार दिला.. पण तरीही मातोश्रींनी आग्रह सुरूच ठेवल्याने त्या थेट सिवदासन यांच्या घरी रहायला गेल्या…. हे एक मोठे धाडस होते. दोघांच्या वयात बऱ्याच वर्षांचे अंतर होते. शिवाय सिवदासन विवाहितही होते.. त्यांना दोन कन्याही होत्या! पुढे सिवदासन च्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांनी एम. एस. यांचेशी विवाहगाठ बांधली. आता एम. एस. एका प्रतिष्ठित माणसाच्या पत्नी झाल्याने देवदासीपणाचा शिक्का पुसला गेला. एम. एस. यांनी नारदाची भूमिका असणारा आणखी एक चित्रपट केला… त्यातही त्यांनी अभिनय आणि गाण्याची चमक दाखवली….

…… इथून पुढे एम. एस. यांचा मीरा होण्याकडे झालेला प्रवास विलक्षण ठरला! संत मीरा यांनी विषाचा प्याला केवळ भक्तीच्या जोरावर पचवला…. देवदासीपण, सामाजिक कुचंबणा, मनाविरुद्ध लग्न ठरवलं जाणं याला एम. एस. यांनी जोरदार विरोध केला…. आणि एका अर्थाने विषाच्या प्यालाच हाती घेतला….. ही मीरा बंडखोर निघाली… पण हिचे बंड स्वरांनी, भक्तीने पुरेपूर भरलेले होते… या स्वरांनी पुढे भक्तीसंगीताच्या जगतात प्रचंड इतिहास घडवला! मूळ दाक्षिणात्य भाषेत असलेल्या मीरा नावाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत एम. एस. मीरा बनल्या आणि पुढे जणू ख-याखु-या आयुष्यात त्या मीराच झाल्या! शास्त्रीय गायन करणा-या एम. एस. सुब्बुलक्ष्मी पुढे प्रामुख्याने भजन, भक्तीसंगीत गायिका व्हायच्या होत्या हे विधिलिखित होते!

सिवदासन यांनी पुढे स्वत:चे मासिक काढले परंतु ते लवकरच कर्जबाजारी झाले. कर्ज फेडण्यात त्यांना त्यांची मोठी संपत्ती विकावी लागली आणि ते भाड्याच्या जागेत राहण्यास गेले. आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. पण त्याचवेळी प्रत्यक्ष भगवान बालाजी व्यंकटेश त्यांच्या साहाय्याला धावले असे म्हणावे, अशी घटना घडली… आध्यात्मिक क्षेत्रातील काही ज्येष्ठ लोकांनी देवस्थानला सुब्बुलक्ष्मी यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटाची कल्पना दिली. पण देवस्थान थेट आर्थिक मदत देऊ शकणार नव्हते. त्यावर एक उपाय अंमलात आणावे असे ठरले. भजनाची ध्वनिमुद्रिका काढायची, विकायची आणि त्याचे मोठे मानधन सुब्बुलक्ष्मी यांना द्यायचे!

… बालाजी देवस्थानचे अधिकारी एम. एस. यांना भेटायला त्यांच्या घरी पोहोचले. देवस्थानला आर्थिक मदत व्हावी, यासाठी भजन, श्लोक असलेली ध्वनिमुद्रिका काढायची आहे, असे त्यांनी सांगितले. भगवान बालाजींची एक प्रतिमा त्यांनी भेट म्हणून सुब्बुलक्ष्मी यांना दिली. सुब्बुलक्ष्मी यांचे वय आणि एवढे मोठे जबाबदारीचे काम करणे अवघड आहे, जमणार नाही असे शिवदासन यांनी सांगितले… पण सुब्बुलक्ष्मी यांनी ही देवसेवा विनाविलंब स्वीकारली… पण सुब्बुलक्ष्मी यांनी पैसे घेण्यास स्पष्ट नकारच दिला! त्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना त्यांनी केवळ परमेश्वराचे काम म्हणून पैशांना नकार दिला! पण खूपच आग्रह झाल्यावर, देवाचा प्रसाद म्हणून, अगदीच नाईलाज म्हणून त्यांनी त्यातील अगदी मोजकी रक्कम स्वीकारली. त्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका ‘बालाजी पंचरत्नम’ खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध झाली. त्यातून बालाजी देवस्थानला प्रचंड उत्पन्नही झाले. एम. एस. यांनी त्यांना मिळालेल्या मानधनाचा खूप मोठा भाग सेवाकार्यासाठी दान केला!

शास्त्रीय संगीत गायन ही त्यांची मूळची आवड आणि खासियत. मात्र कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या गायनात भक्तीसंगीताचे प्रमाण अधिक राहिले… आणि त्यात त्या तल्लीनही होऊन गात. संसारिक समस्या, पूर्वायुष्य, पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत होणारी मानसिक कुचंबणा या गदारोळात त्यांना स्वत:लाही भक्तीसंगीत मन:शांती देत गेलं असावं. सिवदासन यांच्या राजकीय कार्यातील संबंध आणि सी. राजगोपालाचारी या मोठ्या नेत्याच्या सहकार्यामुळे असेल पण एम. एस. पुढे राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्याशी त्यांचा परिचय वाढला. वैष्णव जन तो आणि अशा अनेक भजनांच्या गायनामुळे एम. एस. म्हणजे सुंदर भक्तीसंगीत ही प्रतिमा अधिकाधिक ठळक होत गेली. त्यात त्यांची समरसता, चेह-यावरील सात्विक भाव, प्रभावी व्यक्तिमत्व आणि आवाजातील वेगळेपण यांमुळे त्यांची भजने लाखो घरांत अगदी पहाटेपासून ऐकली जाऊ लागली.

पुढे त्यांनी म्हणलेलं विष्णूसह्स्र्नाम आणि तत्सम धार्मिक मंत्र संपूर्ण देशात पोहोचले आणि गाजले. सलग चाळीस दिवस एम. एस. यांच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने विष्णू सहस्त्रनामाचा जप झाला… एम. एस. यांनी तो मन लावून ऐकला… आणि संपूर्ण तयारी झाल्यावरच त्यांनी ध्वनिमुद्रण केले. आज इतक्या वर्षांनंतरही जगात कुठे न कुठे तरी लाखो घरांत, मंदिरांत एम. एस. सुब्बुलक्ष्मी भक्तीगीते, श्लोक ध्वनीमुद्रिकामधून गात असतात… त्यांचा धीरगंभीर आवाज पहाटवेळा पवित्र करीत जातात. जगभरातील हिंदू धार्मिक लोकांना ही भजने, स्तोत्रे, मंत्र पाठ झाली… पाहिजे तेंव्हा ऐकता येऊ लागली!

आंतरराष्ट्रीय पातळीवरही एम. एस. गाजल्या. भारताच्या धार्मिक परंपरेच्या त्या जणू राजदूतच बनल्या. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, संगीत कलाशिखामणी, कालिदास सन्मान सारखे पुरस्कार त्यांच्यापर्यंत चालत आले… पण सर्वांत संस्मरणीय ठरला तो भारतरत्न पुरस्कार. संगीत क्षेत्रातील व्यक्तीला दिला गेलेला पहिला पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला!

एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांनी त्यांना भजन गायनातून मिळालेल्या पैशांचा खूप मोठा भाग धार्मिक संस्थांना दान केला. पती शिवदासन यांनी त्यांच्या कारकिर्दीला त्यांना हवे तसे वळण दिले… खरं तर कोणत्याही कलाकाराला कुणी त्याच्या कलेत हस्तक्षेप केलेला भावत नाही. पण यानिमित्ताने आपल्या स्वरांतून देवाची सेवा होते आहे, दान करता येईल एवढे पैसे मिळत आहेत आणि समाजाची सेवा करता येते आहे.. हे लक्षात घेऊन एम. एस. यांनी सर्व कष्ट उपसले.

देवाच्या नामस्मरणाने त्यांच्या संपूर्ण चरित्रात पावित्र्य आले. अन्यथा त्या केवळ एक गायिका आणि फार तर अभिनेत्री म्हणून आणि एक देवदासीकन्या म्हणून जगल्या असत्या! पण भगवंत पतितपावन आहेत.. हे सिद्ध झाले!

‘देवदासी ते देवाची स्वरदासी’ हा सुब्बुलक्ष्मी ऊर्फ कुंजम्मा यांचा प्रवास मोठा प्रेरणादायी ठरला… परमेश्वराचे नामचिंतन त्यांना घडले आणि ते स्वर आजही जिवंत आहेत.

– – नवरात्री निमित्ताने या लक्ष्मीचा हा प्रवास थोडक्यात मांडला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments