श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ धैर्य आणि करुणेची कथा…  ☆ अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

(विविध माध्यमांतील इंग्रजी व हिंदी भाषेतील माहिती एकत्रित करून मराठी भाषांतर) 

जीवनाच्या धावपळीत, जिथे अनेकदा गोंधळाचे वातावरण असते, तिथे असे काही क्षण येतात जे आपल्याला मानवी करुणेच्या आणि जलद विचारसरणीच्या असाधारण शक्तीची आठवण करून देतात. असाच एक क्षण व थरार नाट्य रेल्वेच्या एका फलाटावर बघायला मिळाले.

रेल्वे स्थानकावर बहुतेक लोक फक्त तिथून जात असतात, त्यांचे डोळे घड्याळावर असतात, मन दुसरीकडे असते, घरी जात असते किंवा त्यांना कुठेतरी जायचे असते. झाशी स्थानकानेही, इतर कोणत्याही स्थानकाप्रमाणे, अशा हजारो कथा येता-जाता पाहिल्या आहेत. पण ५ जुलै २०२५ च्या दुपारी, ते क्षणभर थांबले. आणि त्या क्षणी, काहीतरी अनपेक्षित घडले.

भारतीय सैनिकांच्या स्वास्थ्यासाठी व युद्धभूमीवर आपात्कालीन वैद्यकीय मदत व औषधांमध्ये प्रशिक्षित आणि झाशीच्या लष्करी रुग्णालयात तैनात असलेले ३१ वर्षं वयाचे लष्करातील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी मेजर रोहित बचवाला हे ५ जुलै २०२५ रोजी, त्यांच्या गावी, हैदराबाद येथे आपल्या कुटुंबियांकडे एक महिन्याच्या रजेवर जाण्यासाठी विरांगणा लक्ष्मीबाई झांशी रेल्वे स्थानक येथे त्यांच्या गाडीची प्रतिक्षा करीत होते. त्यावेळी ते सैन्याच्या गणवेशात ही नव्हते किंवा त्या वेळेस कुठल्या कर्तव्यावर जाण्यासाठी नियुक्त ही नव्हते. इतर प्रवाशांप्रमाणेच सोबत बॅग घेऊन घरच्यांच्या भेटीला आतुर, त्यांच्या आठवणीत मग्न असे साधे प्रवासी होते.

मेजर रोहित बचवाला हे भारतीय हवाई दलातून स्काय डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून निवृत्त झालेले लघु चक्रधारी (ज्युनिअर वारंट ऑफिसर) बी. आर. विनोद यांचे चिरंजीव आहेत. कुटुंबाच्या संरक्षण क्षेत्रातील देशसेवेची परंपरा ते अभिमानाने पुढे चालवत आहेत.

रेल्वे स्थानकावर पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस (15066) ने उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे जाण्यासाठी प्रवास करीत असलेल्या अश्वरफलक कुरेशी नावाची महिला तिच्या कुटुंबासोबत प्रवास करताना तिला अचानक तिव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिचे पती मुहम्मद जुबेर कुरेशी यांनी रेल मदत ॲपद्वारे एसओएस पाठवला होता आणि उत्तरादाखल रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना झांशी येथे उतरण्यास सांगीतले होते. तेथे तिला वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करणार होते.

एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत असल्याचे दिसल्याने व जवळपास कोणतेही रुग्णालय नसल्याने परिस्थितीची गंभीरता ओळखून त्वरित हस्तक्षेप करीत मेजर रोहित बचवाला स्वयंस्फूर्तीने मदतीला धावले व कोणताही संकोच न करता, आणि जवळ कोणतेही वैद्यकीय उपकरण उपलब्ध नसताना, त्यांनी त्वरीत निर्णय घेऊन महिलेची यशस्वी प्रस्तुती करून खिशातील साध्या चाकूने नाळ कापली आणि केसांना लावण्याच्या चिमट्याने (क्लिपने) ती घट्ट बांधली. हे सर्व स्वच्छता आणि गोपनीयतेचे ध्यान राखत केले. त्यांच्या या जलद कृतीमुळे व वेळ न दवडता त्वरित निर्णय घेतल्यामुळे आणि मुख्य तिकिट पर्यवेक्षक लिली कुशवाहा व इतर महिला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका निरोगी कन्येला जन्म देण्यात ते यशस्वी झाले. सुरुवातीला बाळाने प्रतिसाद दिला नाही पण डॉ. रोहित यांच्या प्रयत्नामुळे ते जीवनात परत आले. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.

या प्रक्रियेत एका महिलेला सुरक्षितपणे बाळंत होण्यास मदत करण्यासाठी फक्त खिशातील चाकू, केसांची क्लिप आणि धोतर वापरून त्यांनी एका सामान्य रेल्वे प्लॅटफॉर्मचे आपत्कालीन प्रसूती कक्षात रूपांतर केले.

मेजर रोहित यांच्या धाडसाचे देशभरातून कौतुक झाले. संरक्षण प्रमुखांच्या कौतुकापासून ते ऑनलाइन सार्वजनिक कौतुकापर्यंत, त्यांच्याविषयी “डॉक्टर सतत ड्युटीवर असतात, रजेवर असले तरीही” असे म्हटले गेले.

मेजर रोहित स्वतः म्हणाले की, “डॉक्टर म्हणून, आपण नेहमीच आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे, अगदी प्रवासातही. मी दोन जीव वाचवण्यास मदत करू शकलो हे मला मिळालेले आशीर्वाद आहेत असे मी मानतो. “

मुख्य तिकिट पर्यवेक्षक लिली कुशवाहा यांनी नंतर रुग्णालयात या कुटुंबाला भेट देऊन जेवण व बाळाला कपडे आणि इतर उपयोगी वस्तू देऊन सहृदयता व माणूसकी दर्शवली.

मेजर रोहित बचवाला यांची कथा ही केवळ वैद्यकीय कौशल्याबद्दलची नाही – तर निस्वार्थीपणा, समयसूचकता आणि प्रतिकूल परिस्थितीत मानवतेबद्दलच्या कणवेची आहे. ती आपल्याला आठवण करून देते की खरे नायक हे परिस्थिती परिपूर्ण होण्याची वाट पाहत नाहीत – ते त्यांच्याकडे जे काही उपलब्ध आहे ते घेऊनच प्रसंगाला सामोरे जातात.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेजर रोहित बचवाला यांना त्यांच्या असाधारण धैर्य आणि निस्वार्थ सेवेबद्दल सन्मानित केले. मेजर रोहितचे कौतुक करतांना ते म्हणाले की “हे भारतीय सैन्याच्या भावनेचे आणि सेवेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपले सैन्य यासाठीच ओळखले जाते. ” ते पुढे म्हणाले की, “मेजर रोहितने जे केले ते केवळ कर्तव्य नव्हते तर ते मानवतेचे आणि सैन्याच्या खऱ्या परंपरेचे प्रतीक होते. भारतीय सैन्याचे सैनिक केवळ देशाची सेवा करत नाहीत तर ते सामान्य लोकांना प्रत्येक परिस्थितीत मदत करतात. “

मेजर रोहित यांच्या करुणेने त्या दिवशी दोन जीव वाचवले. त्यांची कहाणी ही आपल्या सर्वांना वेळप्रसंगी पुढाकार घेण्याची, उत्स्फूर्तपणे इतरांना मदत करण्याची आणि धाडसाला कधीही कमी लेखू नये यासाठी प्रेरणा देवो.

सैन्याला नावे ठेवणाऱ्यांनो, बघा जरा शौर्य, करुणा आणि व्यावसायिकतेचे हे खरे प्रदर्शन – मेजर रोहित यांचे हे कृत्य भारतीय सैन्याच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतिबिंब आहे.

जय हिंद। जय हिंद की सेना 🇮🇳

या लेखातील काही भाग तेलंगणा चे माजी सैनिक वुज्जीनी रविंद्र राव यांच्या फेसबुक वाॅल वरून व इतर सैनिकी आणि सामाजिक माध्यमांतून हिंदी व इंग्रजी भाषेतील माहिती एकत्रित करून भाषांतरीत केली आहे.

मराठी अनुवाद व प्रस्तुती : मेघःशाम सोनवणे, नाशिक.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted