श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्तीसूत्र २८ .
तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ॥ २८ ॥
अर्थ : त्या (भक्तीचे) ज्ञान हेच साधन आहे असे कोणी (आचार्य) म्हणतात.
विवेचन: भक्ती ही कर्म, ज्ञान, योग यापेक्षा श्रेष्ठ आहे. ती फलरूपा आहे असे मागील काही सूत्रात स्पष्ट सांगितले गेले आहे. जर ती फल म्हणजे साध्यच असेल तर तिला कोणत्या तरी साधनाची अपेक्षा असणारच. साधनाविना साध्यप्राप्ती होऊ शकत नाही.
आपल्याकडे चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. त्यात ज्ञानी भक्तच श्रेष्ठ असे मानले जाते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अनेक ठिकाणी या विषयाचा विचार केला आहे. ज्ञान नसेल तर भक्ती होणार नाही, असेही म्हटले जाते. ज्ञान नसेल तर भगवंताचे यथार्थ स्वरूप कळू शकणार नाही. अन्यथा मनुष्य क्षुद्र देवतांच्या भजनी लागू शकतो. समर्थांनी त्यांच्या काळात अशा क्षुद्र देवतांना मुक्ति दिली आहे असल्याचे आपल्या लक्षात येईल. भक्ति करण्यासाठी ज्ञान पाहिजे असे त्याचे म्हणणे असते असे काही चिंतकांचे मत आहे.
येथे ज्ञान हा शब्द थोडा संदिग्ध वाटतो. भक्तीचे जसे स्वरूप घेतले जाईल तसे ते ज्ञान ठरणार, नाही का? निराकार, निर्गुण परमात्मस्वरूपाची भक्ती मानली तर त्या स्वरूपाचे ज्ञान उपनिषदादी प्रमाणांवरून होते आणि सगुण साकाराची मानली तर त्याचे अनंत गुण, अनंत लीला, माधुर्य, सौंदर्य तसेच रूप, आकार, त्यांचे अनेक प्रकार इत्यादिकांचे ज्ञान मानावे लागते. मागील काही सूत्रांत व्यास-गर्ग-नारद याची मते आपण अभ्यासली आहेत. त्यावरून त्यांना केवळ निर्गुण-निराकाराचे ज्ञान येथे अभिप्रेत आहे असे जाणवत नाही. कारण त्या ज्ञानात मुक्ती हे साध्य आहे, भक्ती नाही. ज्ञान हे त्या भक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन असते तर गीता व भागवत एकादश स्कंधामध्ये भक्तीमध्ये अन्य साधनांचा निषेध केला गेला नसता.
यज्ञ-ज्ञान-तपें केली, वेदाभास ही साधिला|
तरी दर्शन हे माझे, न लाभले तुज||”
(गीताई ११.५३)
संत एकनाथ महाराज आपल्या भागवतात लिहितात की भक्तीनेच ज्ञानाची प्राप्ती होत असते.
“माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता ।
माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्भक्तां मद्भावें ॥५८॥
*
ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें ।
भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥
(एकनाथी भागवत अध्याय ११)
पुढील सूत्रात भक्ति मुळेच ज्ञानाची प्राप्ती कशी होते ते तपशिलात पाहू .
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। नारद महाराज की जय!!! ।।
– भक्ती सूत्रे क्र.२८
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





