डॉ. धनंजय देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा – –
— — दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी
चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा…. क्रमशः स्वरूपातील ही सिरीज! आधीच्या पोस्टवॉल वर “लुप्त होणाऱ्या पाऊलखुणा” या फोल्डरमध्ये आहेतच.
पूर्वीच्या काळी जशा श्रीमंतांसाठी काही गोष्टी होत्या तशाच गरिबांनाही समाजात सामावून घेण्यासाठी काही सुंदर उपाययोजना होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही आजची पाचवी पोस्ट!! बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेलच पण आज सांगतोय…. “दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी” या संकल्पनेबद्दल!
*एका वाक्यात सांगायच तर “दंडाचं लुगडं किंवा दंडाची साडी” म्हणजे दोन वेगवेगळ्या अर्ध्या साड्या एकत्र शिवून बनवलेली एक अखंड साडी! *
हे पाहण्याआधी थोडा या साडी किंवा लुगडे याचाही धांडोळा जो मी घेतला तो आधी सांगतो.
पाच किंवा सहा वारी लुगड्याला गोल साडी किंवा गोल लुगडे म्हणतात. सहा ते सात वारीला दंडिया म्हणतात मात्र दहावारीला काय म्हणतात हे तामिळी माणसाला विचारावे लागेल. दक्षिणेकडे दोन तुकड्यांची साडीदेखील असते, तिला तामिळी पावडा म्हणतात. अर्थात हि म्हणजे मी सांगतोय ती महाराष्ट्रातील “दंडाची साडी” नव्हे. गंमत म्हणजे पूर्वी साडी हा शब्द तितका प्रचलित नव्हता तर सर्रासपणे साडीला “लुगडं” म्हटलं जायचं. लुगडे हा बहुतकरून महाराष्ट्रीयन पेहराव आहे. मात्र लुगडे ‘एखादेवेळेस’ साडी म्हणून नेसता येऊ शकेल पण साडी लुगडे म्हणून नाही. कारण लुगडे नेसण्याची पद्धत ही धोतरासारखी असते तर गोलसाडी नेसण्याची पद्धत लुंगीसारखी. त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक वातावरणास अनुसरुन ही पद्धत वापरण्यात येते.
आतापर्यंत नऊवारी म्हणजे स्त्रीसौंदर्य खुलवणारे लुगडे असा माझा समज. पण एकदा वाचनात आले की संत तुकारामांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, ‘धुवीन मी संतांची लुगडी. ’ त्यावरून कुतूहल जागृत झाल्यामुळे ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त दिलेला अर्थ पाहिला तर तो असा आहे: ‘साधारणपणे वस्त्र (पुरुषाचेसुद्धा); मानाचा पोशाख; कापड; देशमुख-पाटील ह्यांना पूर्वी वस्त्रे देत त्यांना ‘लुगडी’ अशी संज्ञा होती. ’
मराठी संतांच्या साहित्यात ‘लुगड्या’बद्दल असे अनेक उल्लेख आहेत. एवढेच काय, ते ताम्रपटातही आढळतात. उदाहरणार्थ, खातेगावच्या ताम्रपटातील उल्लेख पाहा:
‘तुमासि आमिं थानेमाने लुगडिं विडा गंध आकेत दिधले’
स्वराज्यकाळी व पेशवाईतही ह्याच अर्थाने ‘लुगडे/डी’ शब्द वापलेला आढळतो. वानगीदाखल पाहा:
लुगडी दिली हेजीबाला l हेजीब बेगी रवाना झाला l
(संदर्भ: केळकर, य. न. , ऐतिहासिक पोवाडे, १९२७ पृष्ठ १३)
(हेजीब म्हणजे वकील, मध्यस्थ, बोलणी करणारा)
‘दंडाची साडी’ बद्दल अजून एक माहिती हाती आली ती म्हणजे हा शब्दप्रयोग “दंडा” किंवा “काठाची” साडी याला उद्देशून वापरला जातो अशी काहीठिकाणी नोंद आहे. ही साडी तिच्या “दंडा” किंवा काठावरच्या विणलेल्या नक्षीकामामुळे ओळखली जाते, अर्थात आजच्या या “दंडाची साडी” एपिसोडमध्ये मी ज्या साडीबद्दल सांगतोय ती दोन जोडांची साडी असली तरी त्या दोन्ही साड्या काठपदरच्याच असायच्या. कारण मुळात चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत रोजच्या वापरातील जवळपास सर्व साड्या या काठ पदर टाईपच्याच होत्या.
आता साडी म्हणायच की लुगडं? हाही प्रश्नच! मात्र “लुगडे” या शब्दाची उत्पत्ती शोधायचा प्रयत्न केला असता मजेशीर माहिती सापडली. तलम कापड, रेशमी वस्त्र या अर्थाने संस्कृतमध्ये त्याला ‘दुकुलम’ शब्द आहे. त्यावरून पुढं मग ‘दुगुल…. दुगुल्ल…. डगुलम…. लुगडं अशा क्रमाने तो मराठीत आला. असं श्री. कृ. पा. कुलकर्णी यांनी “व्युत्पत्तीकोशात” म्हंटल आहे.
असो
साडी की लुगडं? यात पडण्यापेक्षा “दंडाची साडी / लुगडं” म्हणजे काय ते सांगतो.
गरीब, कष्टकरी महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे एखादी साडी फाटली / विरली तर लगेच नवीन दुसरी घेणे शक्य नसायचे. तर एक साडी अशी फाटली तर ती व्यवस्थित धुवून घडी करून पेटीत ठेवून दिली जायची. आणि काही दिवसांनी / महिन्यांनी दुसरी एखादी साडी जेव्हा फाटायची / विरायची तेव्हा मग त्या साडीचा जिथे फाटले आहे तिथून पुढचा भाग कापून बाजूला काढला जायचा. म्हणजे उदा. नऊ वारी साडीच्या पदाराकडील भाग फाटला असेल तर तो पदर (सुमारे एक वार, म्हणजे एक मीटर) ते कापड कापून बाजूला ठेवायचं, म्हणजे बाकी साडी ओके असते तिचा आता जीर्णोद्धार करायचा म्हणजे काय तर पहिली जी साडी फाटलेली पेटीत ठेवलेली असते ती बाहेर काढायची अन त्यातीलही फाटका भाग कापून टाकायचा,. आणि मग त्याची शिल्लक राहिलेली साडी आणि दुसरी साडी (जी अशीच कापून घेतलेली) या दोन्ही एकत्र घेऊन मधोमध शिवून एक साडी करायची,. थोडक्यात काय तर दोन अर्ध्या साड्या मिळून एक पूर्ण नऊवारी साडी त्यातून करायची. आणि वापरायला घ्यायची. (दोन साड्यांचे जणू हे जॉईंट व्हेंचर….. गरिबी झाकणारे) यात ज्या दोन अर्ध्या साड्या शिवल्या जायच्या त्या शिवणकामाला आमच्या मराठवाड्यात तरी “दंड घालणे” असं म्हणतात. त्यावरून कदाचित “दंडाची साडी” असा शब्दही रूढ झाला असावा.
त्यातही दंड लावलेली साडी (म्हणजे जोडलेली) ती त्या दुसऱ्या साडीला मॅचिंग असेलच असं नसायचं. अगदी विजोड रंग पण असायचे. मात्र दोन्ही साड्याची कंडिशन (फाटका भाग काढल्याने) आता चांगली झालेली असायची. तरी त्यातल्या त्यात मग दोनपैकी चांगला कलर ज्या दोनपैकी एका साडीचा असायचा तो भाग वरच्या बाजूला येईल आणि विजोड दुसरा भाग आतल्या बाजूला (निऱ्या वगैरेमध्ये) जाईल अशी ती साडी नेसली जायची.
तर अशी हि पूर्वीच्या काळची एक उत्तम अशी प्रथा होती जी गरिबीलाही सामावून घेऊन पुढे जायची. आता अशात मी ग्रामीण भागातील काही मित्रांना विचारलं की “अजूनही तिकडे अशा दंडाच्या साड्या नेसतात का? ”
त्यावर बहुतेक लोकांनी “नाही” असं उत्तर दिले. एकाने तर सिक्सर शॉट उत्तर दिलं… म्हणाला, “डीडी, आजकाल काही न करता घरबसल्या महिलांना “लाडकी बहीण” मध्ये दीड दीड हजार रुपये येतात. मग फाटक्या दोन साड्या एकमेकांना जोडून कोण शिवत बसणार अन नेसणार रे बाबा? “
मात्र भटक्या जमातीत (धनगर मेंढपाळ) अशा काही मध्ये अजून काहीजणी अशा दंडाच्या साड्या वापरतात हेही कळलं. मात्र ते प्रमाण वरचेवर कमी होत जातेय हे नक्की!
असो… कालाय तस्मेय नमः!! तर अशी हि दंडाच्या साडीची लुप्त होत जाणारी प्रथा!
डॉ. डीडी क्लास : कोणतीच गोष्ट टाकाऊ नसते…. फाटली तरी पुन्हा वापरात आणता येते…. हि खरी आपली संस्कृती ज्यातून दंडाची साडी हि संकल्पना आली असावी. दुसरं उदा. द्यायच तर त्याच दंडाच्या साड्या बनवताना जुन्या साडीचा जो फाटका भाग बाजूला काढून ठेवलेला असायचा तोही फेकून दिला जात नसे. असेच चार पाच तुकडे एकत्र करून त्याचे मग लहान बाळासाठी दुपटे (पांघरूण) केले जायचे नाहीतर मग शेतात जाताना यात भाकरी भाजी बांधून नेलं जायचं किंवा मग दारात किमान पायपुसणी तरी याची केली जायची! एकेक तुकडा पण कामाचा…. हि भावना तेव्हा होती जी आता लुप्त झालीय.
त्या फाटक्या जुन्यातलं फाटक तेव्हढं बाजूला ठेवून चांगलं तेव्हढं घेऊन पुढं जाणे हा देखील त्या संस्कृतीचा संदेश होता. जुन्यातलं वाईट टाकून देऊन आणि चांगलं घेऊन पुढं जायचं…. किती छान न! हीच फिलॉसॉफी आज जगण्यातही लागू पडते. जी लुप्त होत जातेय.
कारण आता वापरातील कपड्याला थोडं जरी फाटलं तरी रफ़ू करत कुणी बसत नाही. सरळ फेकून दिले जाते.
आणि ब्रँडेड कंपन्या मात्र फाटक्या जीन्स चौपट किमतीत बाजारात आणतात तेव्हा तरुणाईच्या त्यावर उड्या पडतात. याचे मात्र नक्की हसू येते. गेल्या महिन्यात एका मॉलमध्ये असेच सहज चक्कर मारायला गेलेलो तर तिथं प्लाजो (लेडीजसाठीचा ढिलाढाला पायजमा) तिथल्या पोस्टरकडे लक्ष गेलं. का लक्ष गेलं तर त्या पोस्टरमधील मॉडेलच्या अंगावर चक्क दोन वेगळ्या रंगाचे कपडे एकत्र करून शिवले होते आणि किंमत? चक्क अडीच हजार रुपये!
मग आमची ती “दंडाची साडी” मागची कल्पना काय वेगळी होती? दोन रंगाच्या दोन साड्या मिळून एक नव्यासारखी साडी घरीच तयार व्हायची अन इथं मात्र मॉलमध्ये अशाच दोन भिन्न रंगाचे कापड वापरून एक वस्त्र विकले जातेय. क्या बात है!
दंडाची साडी बद्दल सांगायचे एक महत्वाचे कारण म्हणजे… मागच्या पिढीने काही चांगल्या चालीरीती जपल्या होत्या, त्या आताच्या काळात आपण कालानुरूप बदल करून का होईना पण जपल्या पाहिजेत त्यासाठी आधी त्या माहित तरी करून घेतल्या पाहिजेत म्हणून हा पोस्टप्रपंच!
असो.
भले ठिगळ लावलेली दोन साड्याची मिळून हि “दंडाची साडी” असेल पण चेहऱ्यावर मात्र मस्त स्माईल असायचं त्या महिलांच्या! हेही आपण पाहिलं पाहिजे अन त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे!
धन्यवाद! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या पाऊलखुणांबद्दल!
🙏
तोवर स्टे ट्यून!
© डॉ. धनंजय देशपांडे (dd)
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
1) Global Cyber Crime Helpline National Award winner
2) Digital Hero of the year National Award winner
3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State
4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








दंडाची साडी छान लेख! विदर्भात त्याला दांड म्हणायचे.जुन्या आठवणी.