श्री मंजिरी येडूरकर
इंद्रधनुष्य
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
‘वर्डस्वर्थ‘ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.
टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.
आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.
टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.
—–
☆ गीत: ५८ ☆
LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and
waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of
pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत: ५८ ☆
*
आनंदाचे स्वर अखेरच्या
गीतात माझ्या पाझरावे
अवखळ या हरिततृणावर
धरणीने त्या उधळावे
*
जन्ममरणाच्या यमलासी
विश्वात त्याने नाचवावे
कमळाच्या अश्रुत बसोनि
ओघळणे थांबवावे
*
आनंदाने त्या आनंदाला
मृत्तिकेसम उधळावे
या गीतातून तुला अखेरी
मी आनंदा अर्पावे
*
भावानुवाद © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत : ५९ ☆
YES, I know, this is nothing but thy love, O beloved of my heart ⎯ this golden light that
dances upon the leaves, these idle clouds sailing across the sky, this passing breeze leaving its coolness upon my forehead.
The morning light has flooded my eyes ⎯ this is thy message to my heart. Thy face is
bent from above, thy eyes look down on my eyes, and my heart has touched thy feet.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत ५९ ☆
*
प्रकाश किरण सोनेरी
हिरवाई वरी नृत्य करी
*
जलद आक्रमिती नभा
शिरी घेऊनि अमृतकुंभा
*
तृप्तता होतसे जीवाची
मंद झुळूक येता वाऱ्याची
*
भरभरुनि मज देशी सारे
प्रेम यालाच म्हणती ना रे!
*
प्रभात किरणे घेऊन येती
तव संदेशा, मला सुखविती
*
आज सहज मी पाही तुला
ओणवुनि तू निरखिता मला
*
नजरानजर झाली आपुली
शतजन्मांची ओळख पटली
*
आणि त्याच अद्भुत क्षणी
सर्वस्व वाहिले तुझिया चरणी
*
भावानुवाद © मंजिरी येडूरकर
संपर्क: ९४२१०९६६११
—–
☆ गीत ६० ☆
ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.
They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.
They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.
The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.
On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,
ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the
seashore of endless worlds is the great meeting of children.
—–
☆ मराठी भावानुवाद : गीत: ६० ☆
*
अनंत विश्वात मुलांच्या गाठी,
खेळ चाले समुद्राकाठी ॥धृ॥
*
खाली बंडखोर सागर, वर अविचल आकाश
निरागस कोवळी मने, रचिती आनंदाची रास
वाळूचे घर, त्यावर सुंदर शिंपल्याची नक्षी
वाळल्या पानांच्या बोटी, लाटांच्या वक्षी
अनंत विश्वात मुलांच्या गाठी,
खेळ चाले समुद्राकाठी ॥१॥
*
वाळूत रेघोट्या, किड्यांमागे धावती
आत तांडव लाटांचे, किनारी मुले खेळती
रंगीत खडे गोळा करता, आनंद बाल जीवाला
सारी दौलत गोळा केली, उधळती सागराला
अनंत विश्वात मुलांच्या गाठी,
खेळ चाले समुद्राकाठी ॥२॥
*
मच्छीमार माशांसाठी, तर कप्तान व्यापारासाठी,
कुणा खजिन्याचा मोह, उडी पाण्यात मोत्यांसाठी
ना कसब पोहण्याचं, ना खजिन्याची आस
ना जाळं विणण्याची कला, खेळ चाले झकास
अनंत विश्वात मुलांच्या गाठी,
खेळ चाले समुद्राकाठी ॥३॥
*
वाटाहीन नभ अन् वादळ घुमे दिशाहीन
उध्वस्त बोटी, मृत्यूचे तांडव, पाणी मार्गहीन
लाटांचं हास्य क्रूर, शांत हास्य काठात
अंगाईचा झोका हले, क्रुद्ध लाटांच्या गीतात
अनंत विश्वात मुलांच्या गाठी,
खेळ चाले समुद्राकाठी ॥४॥
*
– क्रमशः भाग २०
मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.
भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







