श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “स्वप्नातल्या कळ्यांनो!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ती केवळ दहा वर्षांचीच आणि यापुढेही दहाच वर्षांची राहणार आहे… तिच्या आई-वडिलांच्या आणि त्याच्याही स्मृतींमध्ये. ती एका असाध्य विकाराने ग्रस्त आहे. ती म्हणजे तिचा नाजूक देह. मनाने मात्र ती एखाद्या फुललेल्या गुलाबासारखी टवटवीत… सुहास्यवदना! निष्पाप!
तिला प्रेमाचा एकच अर्थ इतक्या वर्षांत उमगू शकला आहे. आपल्या माणसाचं सान्निध्य… सततचं. मोठी माणसं त्यासाठीच तर लग्न करतात आणि एकत्रित राहतात… तिचं मन आपलं हे असा विचार करीत असायचं. तिला तो लहानपणापासूनच आवडायचा… एकत्र वाढले होते ते दोघं… रुसवे, फुगवे, भांडणे, खेळ आणि शाळा एकमेकांच्या हातांत हात गुंफूनच होत होती.
तिच्या मनातल्या परीराज्यात स्वप्नीचा राजकुमार दुसरा कुणी नव्हताच… हाच राजकुमार. ती मनात म्हणायची. लग्नगाठ बांधीन तर याच्याशीच. मोठ्या माणसांच्या लग्नसमारंभांना ती जायची याचसाठी की तिथं कसं असतं सगळं, काय काय करतात हे डोळ्यांत साठवून ठेवायचं आणि अगदी तसंच करायचं आपल्याही लग्नात. त्यांच्याकडे बाहुल्या असतात, आणि त्यांचीही लग्नं लावली जातात. पोरांच्या खेळांत!
पण तिला आता खूपच घाई झाली होती. आणखी आठ वर्षे थांबण्याची तिला परवानगी नव्हती. आणि ती मागणारही नव्हती. त्या जीवाला त्याच्या श्वासांची सीमा ठाऊक होती. पैलतीर खुणावतो आहे… आणि काळ त्याबाजूला तिला ढकलतो आहे… ! ही काही शाळा नव्हे… आज मी नाही जाणार शाळेला… असं आईला सांगायला. एकवेळ आई “रहा आजच्या दिवस घरी!” असं म्हणेलही… पण मृत्यूदेवतेचे दूत न्यायला येतातच… आणि मग जावंच लागतं!
रूग्णालयातल्या शय्येवर निजलेली असताना तिने एकेदिवशी तिच्या वडिलांचा हात हातांत घेतला.. आणि म्हणाली… ”बाबा, मला नवरी व्हायचं आहे. ! त्याच्याशी लग्न करायचं आहे.. तुम्हांला माहीत आहे ना तो… त्याच्याशिवाय मला करमत नाही. !”
डबडबल्या डोळ्यांनी या वधूपित्याने तयारी सुरु केली. काही काही कमी पडू दिलं नाही या कन्यादानात. पै-पाहुण्यांनी अंगण भरून गेलं. प्रत्येकाच्या चेह-यावरच्या हस-या मुखवट्याखाली एक ठसठसणारी वेदना होती. ती डोळ्यांतून डोकावत होती. खरं तर बापानं सर्वांना बजावलं होतं. माझ्या लेकीच्या आनंदाचा प्रसंग आहे… आसवांना थांबवून ठेवा… पुढे लवकरच त्यांनाही बोलावलं जाईल!
ती आणि तो… सजले.. धजले… आणि लाजलेही. तो सामोरा येताच ती मुग्ध होऊन त्याच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहिली.. तिचे एवढेसे दोन डोळे. त्याच्या प्रेमाचं सारं ब्रम्हांड साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. जागा पुरणार नव्हती… पण उरणारही नव्हती… ती चालत असलेली वाट मात्र सरणार होती.
त्याने तिचा हात हाती घेतला. टाळ्यांचा कडकडाट झाला. बापाचे थरथरते हात तिच्या खांद्यांवर आणि ओठ तिच्या क्षितिजाएवढ्या कपाळावर. ”सुखी जीवनाच्या शुभेच्छा, बेटा!” तो कसाबसा म्हणाला! आई तर वेदनेचा एक प्रवाह झाली होती. वाहत वाहत दूरवर चालली होती. तिने तिला घट्ट मिठी मारली.. न बोलता खूप काही बोलून गेली!
सोहळा खरं तर सोळा दिवस होत राहिला पाहिजे… पण चार दिवस आधीच तिच्या शरीरातल्या श्वासांनी प्रस्थान ठेवलं.. पण ती नवपरिणीत पोर सुहास्य वदनाने तिच्या माहेरी. दूर आभाळात निघून गेली.. पुन्हा न परतण्यासाठी!
… इकडे विल्यम शेक्सपिअर The marriage of true minds लिहित होते… ”दोन पवित्र जीवांच्या मिलनात कोणताही अडथळा यावा, असं कोणतंही कारण मला तरी दिसत नाही. प्रेम म्हणजे समुद्रात भटकणा-या जहाजांचा ध्रुवतारा. दिशादर्शक! खरं प्रेम काळाच्या तडाख्यात मोडून पडत नाही. ते जगाच्या अंतापर्यंत ताठ उभं राहतं… आणि माझं हे म्हणणं जर खरं ठरलं नाही तर असं समजा की मी कधीच काही लिहिलं नाही आणि या जगात कुणी कधी प्रेमच केलं नाही!”
– – – – इंटरनेट म्हणजे एक मोहाची दुनिया. इथं कधी कधी असलं काही हाती लागतं. आणि शब्द मनात थांबत नाहीत! गोष्ट परदेशातली आहे… एका दहा वर्षाच्या मुलीला असाध्य विकार आहे… तिच्याकडे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. तिला तिच्या बालमित्राशी खरंखुरं लग्न करायचं आहे… तसा तिचा हट्टच आहे म्हणा. मग तिच्या आई-वडिलांनीही आणि त्या मुलाच्याही आई-वडिलांनी तिला हा न भविष्यति अनुभव देण्याचं ठरवलं आणि तसं घडवूनही आणलं. ती वधू तिच्या वराच्या डोळ्यांत पाहताना तिच्या डोळ्यांकडे पहा. तुम्हांलाही काहीतरी निश्चित दिसेल… !
(छायाचित्र साभार. विल्यम शेक्सपिअर यांच्या कवितेचा मी लिहिलेला अर्थ मूळ अर्थाबरहुकुम असेलच असं नाही. केवळ संदर्भ दिला आहे.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



