उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ दाह … (अनुवादित) – मूळ गुजराती लेखिका : गिरिमा घारेखान – हिन्दी अनुवाद : राजेन्द्र निगम ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर ☆
☆☆☆☆
‘मम्मी, चांगलं लागत नसलं, तरी आज दूध प्याच! प्लीज! ‘ सुनेचा आवाज ऐकून प्रतिमाने डोळे उघडले. समोर ऋचा दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. नुकतीच उलटी झाली होती. तिचा घसा अजूनही जळजळत होता. त्याबरोबरच उलटीचा आंबट वास घशात रेंगाळलेला होता. नाकातही तोच घाणेरडा वास भरलेला होता. त्यावर आता आणि हे दूध. तिने कित्येक वर्षे झाली, दूध पिणे बंद केले होते. त्या दिवशी ते घडलं त्यानंतर…
मम्मी आज थोडं थंड दूध प्याच. अॅसिडिटीसाठी खूप चांगलं. हळू हळू प्या. प्रतिमेच्या हातात ग्लास देत ऋचा म्हणाली. ऋचाच्या चेहऱ्यावर विखुरलेल्या हास्यासोबत, काळजाला स्पर्श करणारा स्नेहदेखील जाणवत होता. तिनेदेखील घशातील जळजळ विसरून तसंच हसण्याचा प्रयत्न केला.
सुश्री गिरिमा घारेखान
प्रतिमा ग्लासच्या आर-पार दिसणाऱ्या दुधाच्या सफेद रंगाकडे बघत राहिली. ऋचा किती प्रेमाने म्हणत होती, ‘दूध थंड आहे आई. ’ तिच्यासाठी दूध कधी थंड नव्हतंच. विशेषत: त्या दिवसांनंतर…
प्रतिमाचं मन आतादेखील असं फडफडत होतं, जसं काही कागदांवर वजन ठेवल्यावर कागदाच्या किनारी फडफडतात, तसंच. किती तरी वर्षांपासून फडफडणाऱ्या त्या कागदांच्या किनारींवर, आपल्या सुनेसाठी आपल्या भावनांचे थेंब उडवत, तिला भिजवणं, ती आता शिकलीय.
तिने ऋचाला विचारलं, ‘तुझ्यासाठी दूध शिल्लक आहे? आज संध्याकाळी इतके सगळे लोक अचानक आले, त्यांच्या चहा-पाण्यासाठी दूध लागलं असणार! तसंही तू दूध प्यायला हवंसच!
‘मम्मी, मी एक वेळ दूध प्याले नाही, म्हणून विशेष काही बिघडणार नाही. यावेळी तुम्हाला दुधाची अधिक गरज आहे. ’
‘या वेळी तुम्हाला दुधाची अधिक गरज आहे. ‘ ऋचाचं हे वाक्य प्रतिमाच्या डोक्यात जसा हातोडा मारू लागलं. एकदा… दोनदा… तीनदा… पण हे वाक्य, ‘आता मला आणखी दुधाची गरज आहे, ‘ या स्वरूपात आतल्या आत गुंजत राहिलं. वाटू लागलं की गळ्यातली जळजळ हृदयापर्यंत पोचते आहे. त्यावेळी त्या स्थितीत हे सामान्य वाक्य किती असामान्य होऊन गेलं होतं. एक ग्लास दूध काय, इतकी मोठी घटना किंवा त्रासाचं निमित्त बनू शकतं? एका निरंतर दुखऱ्या घावाप्रमाणे, हे वाक्य तिला जीवनभर पीडा देत राहिलं. कारण ती आपल्या काळजात वाहणारी जखम कुणालाच दाखवू शकत नव्हती. मग पुसणार आणि मलमपट्टी तरी करणार कोण? प्रतिमा वेगवेगळे बहाणे बनवत त्या दु:खावर डंख मारणार्या माशा दूर करून त्यांना उडवून लावायचा प्रयत्न करायची, पण त्या पुन्हा पुन्हा यायच्या.
प्रतिमाने ग्लासच्या आतील दुधाकडे नजर वळवली. अचानक ते पाण्यासारखं पारदर्शक झालं आणि त्यात तिला आपल्या सासऱ्याचा चेहरा दिसू लागला. त्यांचे ओठ कापत होते. ते म्हणत होते, ‘प्रतिमा, बेटा एक ग्लास दूध देशील? ‘
प्रतिमा तो दिवस विसरणं कधीच शक्य नाही॰ दिनेश ऑफीसच्या कामासाठी बाहेर गेला होता. घरात ती आणि पापाजी (तिचे सासरे) दोघेच होते. त्या काळात दिनेशच्या पगारात एक थैली दूधच परवडत होते. त्यात दोघांचा दोन वेळचा चहा तयार होई आणि जे अर्धा-पाऊण ग्लास दूध शिल्लक उरत असे, ते रात्री प्रतिमा पीत असे. शरीरात सुधांशुचं अस्तित्व जाणवू लागलं, तेव्हा ती आवर्जून ते शिल्लक ठेवायची.
त्या दिवशी रात्री ती वाचत होती. तिला पापाजींनी उलटी केल्याचा आवाज आला. संध्याकाळपासूनच अॅसिडिटी होत असल्याबद्दल ते बोलत होते. जेवणही केलं नाही. डोकं दाबत बसले होते. प्रतिमाने औषध घ्यायला सांगितलं. पण नेहमीसारखं ते नकोच म्हणाले.
रात्री रोजच्याप्रमाणे प्रतिमा दूध पिण्यासाठी स्वंयपाकघरात गेली. ती ग्लासात दूध काढतच होती, इतक्यात पापाजी येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर बेचैनी होती. त्यांनी अगदी हळू, पण याचना करणाऱ्या स्वरात म्हंटलं, ‘प्रतिमा बेटा, आज तू मला थोडंसं दूध देशील? खूप जळजळ होतेय. ‘ प्रतिमाचे हात कापू लागले. त्यावेळी सुधांशुने जशी काही कूस बदलली होती. मुलगा कदाचित भुकेलेला असेल. तिने एकदा पापाजींकडे पाहिलं आणि काहीशा रागाने आणि वैतागाने म्हणाली, ‘एवढच दूध आहे पापाजी आणि डॉक्टरांनी मला रोज यावेळी दूध प्यायला सांगितलंय. मग तिने पोटावर हात ठेवला. नजर वळवली आणि काहीशा निलाजरेपणानेच म्हटलं, ‘आत्ता मला दुधाची जास्त गरज आहे. असं असेल, तर मी उद्या दोन पिशव्या दुधाच्या घेईन. ‘
होळीच्या गरम ज्वालेप्रमाणे उच्छवास टाकत पापाजी तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रतिमाने दुधाच्या दोन पिशव्या घेतल्या. सकाळी चहा बनवून ती जेव्हा, त्यांना उठवायला गेली, तेव्हा, काल रात्रीचे याचनेच्या भावांनी भरलेले त्यांचे डोळे तसेच स्थीर होते. ते तसेच झोपलेले होते. त्यांच्या हृदयाची धडधड बंद होती.
त्यानंतर प्रतिमा दूध पिऊ शकली नाही. हातात दुधाचा ग्लास धरायची आणि अचानक त्यातून उठणाऱ्या वाफेमुळे तिचे हात भाजायचे. मग तिचे हात कापू लागायचे. जरी जबरदस्तीने दूध पिलं, तरी उलटी व्हायची. लोक म्हणायचे, दुधाचा उबग आला असेल. बाळंतीण झाल्यावर सगळं ठीक होईल. ‘
त्यानंतर सुधांशु जन्माला आला. मोठा झाला. त्याचं ऋचाशी लग्न झालं. ऋचाच्या पोटातही गर्भ राहिला. पण तोपर्यंतही तिला वाटणारा दुधाचा उबग जसाच्या तसाच कायम होता.
इतकी वर्षे झाली, ती त्या घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिली. ‘एक घोट दूध त्या दिवशी पिलं नसतं, तर चालला नसतं? तू अशी कशी स्वार्थी झालीस? ‘ पण मग एक दुसरी प्रतिमा तिचा बचाव करण्यासाठी सरसावायाची. ‘मी माझ्या मुलांसाठी स्वार्थी झाले होते. त्यावेळी मला जेवण जात नव्हते, तेव्हा डॉक्टरांनी मुद्दाम सांगितलं होतं, रात्री रिकाम्या पोटाने झोपता कामा नये. पोटात जेवण टिकत नसेल, तर एक ग्लास दूध पीत जा. मी तर पापाजींच्या पुढल्या पिढीसाठी चिंतीत होते. त्यामुळे माझ्या तोंडून असं बाहेर पडलं. आणि पापाजींचा मृत्यू यामुळे झाला, असं थोडच आहे? अॅसिडिटीमुळे माणसं मारतात, असं थोडच आहे? त्यांना तर रात्रीच अटॅक आला होता.
ती पहिलीवाली प्रतिमासुद्धा कुठे हार मानायला तयार होती. तिचे तर्क, आक्षेप चालूच असायचे.
‘हो! पण तुला हे कसं कळणार, की तुझं बोलणं ऐकूनच त्या कमजोर हृदयाच्या माणसाला अटॅक आला नसेल कशावरून? त्याने असं काय जास्त मागितलं होतं? फक्त एक ग्लास दूध तर मागितलं होतं.. तू त्याच्यासाठी एवढंही करू शकली नाहीस? त्यामुळे स्वतःला धोका देणं बंद कर आणि स्वीकार कर, की जे झालं, ते तुझ्या स्वार्थामुळेच झालं. तू एकदा दिनेशला तरी सांग. तो जे काही म्हणेल, ते ऐक. मग ठरव, यात तुझी चूक होती की नाही?
दिनेशला माहीत आहे, गर्भातच दोन मुले गेल्यामुळे, ती सुधांशूच्या बाबतीत किती अधीर झाली होती. तो मला समजून घेईल. तू गप्प बस. प्रतिमा पहिलीला घाबरवण्याचा प्रयत्न करायची. पण, पहिलीलीवाली प्रतिमा जणू तिच्या मागेच लागली होती. ती म्हणायची, इतकी तुला खात्री असेल, तर सांगत का नाही, की तुझ्या मनात पाप होतं. ‘
प्रतिमा कान बंद करून बसायची तिचे ओठ कापायचे. तिच्या आतील आई आणि सून सतत भांडायच्या. अखेर दोन दयाळू डोळे त्यांच्यामध्ये येऊन बसायचे. मग त्या दोघी गप्प बसायच्या. ते डोळे पहिल्यांदाच इतके दयाळू झाले होते, असं नाही.
मम्मीजी गेल्या तेव्हा, पापाजींकडे नीट लक्ष द्या, असं आवर्जून सांगून गेल्या. घरात एखाद्या व्यक्तीच्या रिकामपणाची जाणीव काही काळ होत राहते, पण तो स्नेह उकळून दाट होत नाही. दोन युवा हृदयांची मौज-मस्ती आणि जाणारा काळ, त्यावर थंड पाण्याचा शिडकावा करतो. ती दोघे नेहमी त्यांना घरी एकटे सोडून, आपल्या मित्रांसोबत बाहेर हिंडा-फिरायला जायची. छोट्या-मोठ्या आजारपणात थोडी बेपर्वाई व्हायची. मग पापाजींची नजर याचनामय व्हायची. ‘आता मी काय करू? ’ असं विचारणार्या त्यांच्या डोळ्यांकडे बघणं प्रतिमा टाळत असे.
काळ आणि परिस्थिती यांच्याशी तडजोड करत पप्पाजींचं अस्तित्व हळू हळू एका शिंपल्याच्या आवरणात सामावल्यासारखं झालं. खाणं -पिणं, कधी कधी बाहेर जाणं, चांगले कपडे घालणं, या सगळ्यातून त्यांनी आपलं मन काढून घेतलं. एक दिनेशमधून मात्र ते आपलं मन हटवू शकले नाहीत. तिसऱ्या पिढीच्या आगमनाची बातमी त्यांना भर दुपारी येणाऱ्या घनमेघासारखी वाटली. पण, त्या घनमेघाचं बरसणं पाहणं त्यांच्या नशिबात नव्हतं.
ते गेल्यानंतर, विशेषतः सुधांशुच्या आगमनानंतर, दिनेश आणि प्रतिमाचा माता-पित्याच्या रूपात जन्म झाला. आपल्या मुलांबाबत आई-वडलांच्या भावना कशा असतात, याची अनुभूती, गंगेच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे त्यांच्या हृदयात उचंबळू लागली. तेव्हा, पापाजींच्या बाबतीत आपल्याकडून झालेल्या अन्यायाची जाणीव काट्याप्रमाणे त्यांच्या हृदयाला टोचू लागली. विशेषतः प्रतिमाला. कारण दिनेश कामासाठी बराचसा घराबाहेर असायचा आणि जगाकडे प्रतिमेच्या नजरेनेच बघायचा. प्रतिमेच्या लक्षात आलं होतं, की पश्चात्ताप करायला आता खूप उशीर झालाय, पण ती आपली सून ऋचा हिच्यावर खूप प्रेम करायची. जणू काही पश्चात्तापाच्या आगीवर जलधारा बनून बरसत राह्यची. हृदयापासून झालेल्या पश्चात्तापाचा परिणाम असा झाला, की तिच्या शरिराने तिला अति प्रिय असलेल्या दुधाचाच त्याग केला.
आज कित्येक वर्षानंतर ऋचा हातात दुधाचा ग्लास देऊन गेली होती. तिला असंच वाटायचं, मम्मीला दूध आवडत नाही. त्यामुळे त्या पीत नाहीत. तिला, किंवा आणखी कुणाला, त्या सत्याचा पत्ता कसा लागणार?
प्रतिमाच्या गळ्याची जळजळ आता छातीपर्यंत गेली होती. तिला वाटलं, तिलादेखील पापाजींप्रमाणे… अॅसिडिटी जर जास्त वाढली, तर त्याचा परिणाम हृदयावर होईल का? मग काय तिला हे ओझं घेऊनच वर जावं लागेल का? ऋचा तिच्या किती जवळची होती. तिला एकदा सगळं सांगायचं का?
ऋचा पुन्हा खोलीत आली. ‘काय हे मम्मी आपण अजूनही हातातच ग्लास धरून बसलाय. आपल्याला दूध पसंत नसेल, तर गुलाबाचं सरबत घालून देऊ? ऋचाने तिच्या हातातून दुधाचा ग्लास घेतला. प्रतिमाला पुन्हा उलटी होऊ लागली. ती बेसिनकडे पळाली. तिला जाणवायला लागलं, की तिला उलटी होतेय आणि शरीरातील सगळा कडवटपणा बाहेर पडतोय. तिनं आपलं तोंड धुतलं. आरशात पाहिलं. डोळे पाण्याने भरलेले होते. त्या दोन तापाने लाल झालेल्या डोळ्यात पापाजींचा चेहरा दिसत होता. यावेळी त्यांच्या तोंडातून ‘एक ग्लास दूध देशील? ‘ हे शब्द बाहेर आले नाहीत. पापाजी म्हणत होते, ‘तुझी काही चूक नव्हती बेटा! तू तेच केलंस, जे एका आईने करायला हवं होतं. ‘
पोटातील पित्त बाहेर पडल्यानंतर प्रतिमाला जरा बरं वाटलं. ती स्वयंपाकघरात गेली. ऋचा तिच्या दुधाच्या ग्लासात चमचा ढवळत होती. दूध गुलाबी झाले होते. प्रतिमाने तिथला दुसरा एक ग्लास घेतला आणि दोन्ही ग्लासात दूध अर्ध अर्ध केलं. म्हणाली, ‘फिफ्टी फिफ्टी’ चल. आपण दोघी झोपाळ्यावर बसू आणि एकत्र मिळून दूध घेऊ. आज मी तुला; मी, सुधांशु आणि त्याचे आजोबा यांच्यातलं एक रहस्य सांगते.
दुधाचा गुलाबी रंग प्रतिमेच्या जिभेवर आणि गारवा तिच्या हृदयात परतला होता.
☆☆☆☆
मूळ गुजराती कथा – ‘दाह’ : लेखिका- गिरिमा घारेखान, मो. – 8980205909
हिंदी अनुवाद – ‘दाह’ : अनुवादक – राजेन्द्र निगम मो. 9374978556
मराठी अनुवाद : उज्ज्वला केळकर मो- 8369252454
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







