सुरेखा चिखलकर
मनमंजुषेतून
☆ कर्म हेच खरं धन… ☆ सुरेखा चिखलकर ☆
आज आयुष्यात मागे काय शिल्लक राहतं, याचा कधी विचार केलाय का आपण?
पैसा राहत नाही. बंगला राहत नाही. गाडी, दागिने, पद, प्रतिष्ठा… काहीच सोबत येत नाही. आणि खरं सांगायचं तर, माणूस गेल्यावर लोक यापैकी कशाचीच आठवण काढत नाहीत. मागे शिल्लक राहतात ते फक्त तीन गोष्टी – *चांगले विचार, चांगले आचार आणि आपले संस्कार. *
माणूस कितीही मोठा उद्योगपती असो, कितीही मोठा अधिकारी असो, कितीही श्रीमंत असो… तो लोकांच्या मनात राहतो तो फक्त त्याच्या कर्माने. त्याने कोणाला मदत केली, कोणाच्या अडचणीत धावून गेला, कोणाशी कसं वागला, यावरूनच त्याचं खरं मोजमाप होतं. आणि सर्वसामान्य माणूसही… ज्याच्याकडे काहीच नाही, पण ज्याचं मन मोठं आहे, जो दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख मानतो, तोच खरा मोठा ठरतो. कारण नाव पैशाने नाही, तर कर्माने घेतलं जातं.
कर्म करता जा, फळाची अपेक्षा करू नका.
हे गीतेतलं वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलंय, पण त्याचा खरा अर्थ आपण विसरतो. आपण चांगलं काम करतो आणि लगेच विचारतो मला याचं काय मिळणार, पण खरं हे आहे जे तुम्हाला मिळणार आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे मिळणार नाही, ते कितीही धावपळ केली तरी मिळणार नाही. म्हणून अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा. झाड लावणारा माणूस रोज विचारत नाही, फळ कधी येणार? ” तो फक्त पाणी घालत राहतो, काळजी घेत राहतो. फळ यायची वेळ आली की फळ येतंच. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. आज तुम्ही कोणाला एक चांगला शब्द बोललात, कोणाला धीर दिलात, कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलंत – तर समजा, तुम्ही तुमचं कर्म केलंत. त्याचं फळ कधी, कुठे, कसं मिळेल हे तुम्हाला माहीत नसेल, पण ते नक्की मिळेल.
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील, तर जगात कुणीही आपला पराभव करू शकत नाही.
पराभव म्हणजे काय? परीक्षा नापास होणं म्हणजे पराभव नाही. व्यवसायात तोटा होणं म्हणजे पराभव नाही. लोकांनी नावं ठेवणं म्हणजे पराभव नाही.
खरा पराभव म्हणजे आपले चांगले विचार सोडून देणं. आपले संस्कार विसरून जाणं. परिस्थितीला घाबरून चुकीच्या मार्गाला जाणं.
जोपर्यंत तुमच्याबरोबर चांगले विचार आहेत, चांगली माणसं आहेत, तुमचे संस्कार तुमच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत तुम्ही कधीच हरू शकत नाही. जगाने कितीही विरोध केला तरी, तुमचं चांगुलपणच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे.
पैसा कमवा, पण माणुसकी विकून नका.
मोठं व्हा, पण माणुसकी सोडून नका.
यश मिळवा, पण संस्कार विसरून नका.
कारण शेवटी…
नाव पैशाने नाही, कर्माने घेतलं जातं.
आणि माणूस श्रीमंतीने नाही, संस्काराने मोठा होतो.
चांगलं विचार करा, चांगलं वागा, चांगलं कर्म करा. बाकी सगळं आपोआप येईल.
☆
© सुरेखा चिखलकर
गोटखिंडी मो 8806913315
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






