ज्योत्स्ना तानवडे
चित्रकाव्य
– पुन्हा नांदावे गोकुळ – ☆ ज्योत्स्ना तानवडे ☆
☆
पुनर्विकास करण्या
वाडा पाडला जाणार
त्याचे पूर्वीचे स्वरूप
डोळ्यापुढे हो साकार ||
*
सायंकाळी तुळशीत
दिवा दारापुढे लागे
अमंगला दूर सारी
श्रद्धा भक्तीचेच धागे ||
*
तीन पिढ्या नांदणाऱ्या
सानथोरांनी भरला
गुण्यागोविंदाने नांदे
जीव जिवाशी जोडला ||
*
बिऱ्हाडाशी नातेजोड
सारे जीवलग होते
घरादाराशी सलगी
घट्ट माणुसकी नाते ||
*
दारापुढे वटवृक्ष
झुलणारी फांदी फांदी
घरी नांदते गोकुळ
होता प्रत्येक आनंदी ||
*
काळ मोठा बिलंदर
नव्या वाटा देत गेला
शिकणाऱ्या पोरा बाळा
दूरदेशी नेता झाला ||
*
गेले वैभव लयाला
वाडा सारा ओस पडे
जाती नांदत्या आनंदा
नवे जीवघेणे तडे ||
*
शान मोठी आजोबांची
अति रम्य आठवणी
पुन्हा नव्याने रुजावी
नवी आनंद पेरणी ||
☆
© ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






